स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

On: July 15, 2026 10:19 PM

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) : सामाजिक सलोखा, गोसेवा आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने कार्यरत असलेल्या ॲड. विजय सुरजमलजी काबरा (जळगाव, महाराष्ट्र) यांना स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे “सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याबाबत काबरा यांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली असता या कामाबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

काबरा हे २००९ पासून अखंडपणे सुरू असलेल्या “सामूहिक गोसेवा – एक अनुष्ठान” या अभियानाद्वारे विविध धर्म, समाजघटक, व्यावसायिक व सामाजिक संस्थांना एकत्र आणून गोसेवा, पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि सामाजिक ऐक्याला चालना देत आहेत. त्यांच्या कार्याला अधोरेखित करून त्यांचा गौरव करण्यात आला. ॲड. काबरा यांनी उपक्रमातून हजारो नागरिकांना गोसेवा व पर्यावरण संवर्धनाशी जोडले आहे. रमजान, मोहरमसारख्या प्रसंगी विविध समाजघटकांचा सहभाग निश्चित करणे, तृतीयपंथीय समाजाला अभियानाशी जोडणे, आकाशवाणी तसेच शाळा-महाविद्यालयांद्वारे जनजागृती करणे हे काम ते करतात. सन १९९४ पासून नोंदणीकृत “पृथ्वी बचाव संस्था”च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करणे, या त्यांच्या उल्लेखनीय कार्यांचा समावेश आहे. स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांच्या या कार्याला “जगातील सर्वात दीर्घकाळ सातत्याने चालणारी बहु-समुदायिक सामूहिक गोसेवा आणि पर्यावरण जनजागृती मोहीम” म्हणून प्रेरणादायी उपलब्धी मानत गौरव केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment