जळगाव – सराफ व्यावसायिकाच्या कुरिअर कर्मचा-याकडील रोख 25 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. या चोरी प्रकरणातील चौघांकडून चोरीचे 25 लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत या तपासाची विस्तृत माहिती दिली. दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री ढाब्यावर लक्झरी बस थांबली असतांना हा प्रकार घडला. जळगाव येथील सराफ व्यावसायीक प्रफुल भागचंद सुराणा यांचा खासगी कुरिअर कर्मचारी ही रोकड घेऊन कोल्हापुर येथे जात होता. त्याच्याकडे चांदी खरेदीसाठी 25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग होती.
प्रवासादरम्यान बस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर परिसरातील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबली. कुरिअर कर्मचारी नितीन वाणी यांनी रोकड असलेली बॅग बसमध्येच ठेवून जेवणासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी बॅग लंपास केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, गोपनीय सुत्रे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींचा अभ्यास करून पोलिसांनी मुख्य चोरटा सोनू उर्फ राम भगवान सारवण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत इतर साथीदारांची नावे सांगितली.
त्यानुसार पोलिसांनी शेख रेहमान शेख निसार, सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे आणि दशरथ सुरेश चौधरी यांना अटक केली. तपासादरम्यान चौघांकडून चोरीतील 25 लाख रुपयांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती डिझायर कार जप्त करण्यात आली आहे. चौघांन पुढील कारवाईकामी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत, डिवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आणी त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, संतोष पवार, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, अंमलदार राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, रविंद्र कापडणे, छगन तायडे, तांत्रिक विश्लेषण विभागातील अंमलदार गौरव पाटील, मिलींद जाधव, नेत्रम विभागातील मुबारक देशमुख पंकज खडसे व कुंदनसिंग बयास आदींनी या गुन्ह्याचा तपास केला.







