जळगाव – जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकाची हत्या करून ही घटना अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने व वैज्ञानिक पद्धतीने तपास करून अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी रात्री गारखेडा येथे ५४ वर्षीय रामा थावरु बारेला यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना मृताच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या जखमा आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.
तपासादरम्यान मृताचा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २१) याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. याच वादातून संशयीत आरोपीने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार करून त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्याजवळ नेऊन टाकत अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रावेर पोलिसांनी तांत्रिक माहिती, भौतिक पुरावे आणि स्थानिक चौकशीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह डिवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या तपासकामी सहभाग घेतला. गुन्ह्याचा जलद आणि शास्त्रशुद्ध तपास केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.






