जळगाव – भुसावळ शहरातील महावितरण कार्यालयात कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग-१) नितीन अभिमन्यू पाटील (वय ४९) यास दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी असून, संबंधित ग्राहकांच्या सोलर प्रकल्पांच्या मंजुरीसाठी व रिलिज ऑर्डर मिळवून देण्याचे काम सुरू होते. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी प्रत्येक प्रकरणासाठी १ हजार रुपये, अशा दोन प्रकरणांसाठी एकूण २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यामध्ये आरोपी अधिकाऱ्याने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात अटक केली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे आणि जळगाव एसीबीच्या पथकाने केली आहे.






