जळगाव : जळगाव शहरातील भवानी पेठ परिसरातील दुकानातून चोरीला गेलेल्या ३ वेल्डिंग मशीन आणि १६ ग्राइंडर मशीन असा एकूण ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल शनीपेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जप्त केला. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी भवानी पेठ येथील नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशन या दुकानातून ३ वेल्डिंग मशीन बॉक्स आणि १६ ग्राइंडर मशीनचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत ६ ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. उपलब्ध माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित वसिम शेख हसन (वय २९, रा. मरीमाता मंदिराजवळ, भिलपुरा, जळगाव) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान चोरट्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या ३ वेल्डिंग मशीन आणि १६ ग्राइंडर मशीनचे बॉक्स, असा एकूण ₹ ५२,८०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत पोहेकॉ विजय खैरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास शनीपेठ पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल तसेच पोलीस कर्मचारी संतोष खेडकर, अभिषेक कटारे, योगेश जाधव, विजय खैरे, अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजित चौधरी, गणेश ढाकणे आणि योगेश सावळे यांच्या पथकाने केली.







