जळगाव : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या भुसावळ येथील धान्य व्यापाऱ्याचा तिघांनी पाठलाग करून अंधाराचा फायदा घेत रस्त्यातच अडवले. डोळ्यांत मिरची पूड फेकल्यानंतर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून व्यापाऱ्याजवळील दोन लाखांहून अधिक रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून तिघे दुचाकीवरून पसार झाले. सोमवारी रात्री भुसावळ शहरातील टीव्ही टॉवर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
अजय प्रेमचंद कोटेचा हे त्यांचा पुतण्या मीत कोटेचा याच्यासह अण्णा भाऊ साठे मार्केटमधील दुकान बंद करुन मोटार सायकलने घरी जात होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भूमि अभिलेख कार्यालयासमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग केला.
टीव्ही टॉवरच्या मागील बाजूस असलेल्या निवासस्थानाकडे जात असताना बंद पथदिव्यांमुळे निर्माण झालेल्या अंधाराचा फायदा घेत तिघांनी अचानक कोटेचा यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. काही क्षणांतच त्यांना दिसेनासे झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि रोकड असलेली पिशवी हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला. सुरुवातीला त्यांना स्थानिक रुग्णालयात व नंतर अधिक उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचे म्हटले जात आहे.






