एमआयडीसी हद्दीत ११.१७ लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

On: September 1, 2026 3:56 PM

जळगाव : जिल्ह्यातील अमली पदार्थांची तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या धडक मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ लाख १७ हजार २०० रुपये किमतीचा ‘एफेड्रिन’ आणि गांजा, तसेच काळ्या रंगाची बर्गमॅन मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एमआयडीसी परिसरातील नारियलवाला बाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर एका व्यक्तीकडून ‘एफेड्रिन’ या अमली पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची पडताळणी केल्यानंतर एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहन काळे यांना कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या कायदेशीर परवानगीने तसेच राजपत्रित अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे आणि पंचांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४० वाजता दर्ग्यासमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी नूर मोहम्मद पटेल हा काळ्या रंगाच्या बर्गमॅन मोपेडवरून येताना आढळला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

मोपेडच्या डिक्कीची पंचांसमक्ष झडती घेतली असता पांढऱ्या रंगाची स्फटिकयुक्त पावडर असलेला एफेड्रिन, काड्या-पाने-फुले व बिया असलेला गांजा आणि बर्गमॅन मोपेड (क्र. एमएच-१९-ईके-४३०५) असा मुद्देमाल मिळून आला. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत रासायनिक पदार्थ हा एफेड्रिन आणि दुसरा पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक प्रभाकर जगदाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ९(अ), २५(अ), ८(क) सह २०(ब)(ii) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. अक्रम शेख, याकुब शेख, विजय पाटील, किशोर पाटील, प्रविण भालेराव, मुरली धनगर, महेश सोमवंशी, पो.कॉ. गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, प्रदिप सपकाळे, राहुल रगडे, फॉरेन्सिक पथक, पंच, प्रमाणित वजनकाटा धारक आणि फोटोग्राफर जयंत चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment