जळगाव : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाचे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्यावर आक्षेपार्ह कमेंट करणा-या नशिराबाद येथील होमगार्डला चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (ताजनगर, नशिराबाद) असे अटक करण्यात आलेल्या होमगार्डचे नाव असून त्याला चेन्नई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत चेन्नईला नेले आहे. मंगळवारी झालेल्या या कारवाईने परिसरात खळबळ माजली आहे.
एआयचा वापर करुन व्हिडीओ तयार करुन आक्षेपार्ह कमेंट केल्याची या होमगार्डविरुद्ध आरोप आहे. या प्रकरणी चेन्नई येथील आनंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चेन्नई सायबर पोलिसांनी केलेल्या तपासाअंती हा प्रकार जळगाव जिल्ह्याच्या नशिराबाद येथील होमगार्डने केल्याचे उघडकीस आले.







