जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : 8 सप्टेंबर 2026 ची सकाळ…जळगाव शहराच्या रामेश्वर कॉलनीतील एका भाड्याच्या खोलीत कविता सुतार नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात करत होती. घरातील कामे सुरू होती. तिचा 18 वर्षांचा मुलगा कामावर जाण्याच्या तयारीत होता. त्याच्यासाठी डबा तयार झाला होता. सगळं काही नेहमीसारखंच दिसत होतं. पण काही मिनिटांतच कविताच्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार होती. तिला तिच्या ओळखीच्या नरेश सोनवणेचा निरोप आला—थोडं बाहेर एकांतात जायचं आहे, निवांत बोलायचं आहे. कविता घरातून बाहेर पडली. ना सामानाची तयारी…ना कुठे जाण्याची माहिती…ना कोणालाही संशय येईल अशी परिस्थिती…ती अंगावरील गाऊनवरच नरेशच्या मोटारसायकलवर डबलसीट बसली आणि निघून गेली. मुलाला वाटलं, आई कविता थोड्याच वेळात परत येईल. पण ती परतलीच नाही. आणि काही तासांनंतर सुरू झाला एका मुलाचा आईच्या शोधाचा आक्रोश…

कविता आणि नरेश एकाच परिसरात रहात होते. दोघांची ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. कविता पतीपासून विभक्त राहत होती. तिच्यासोबत तिचा मुलगाही होता. नरेश 28 वर्षाचा अविवाहित तरुण होता. याउलट कविता ही त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती. काळ जसजसा पुढे गेला, तसतसे दोघांचे संबंध अधिक जवळचे झाले. नरेश हा कविताला आर्थिक मदत करत असल्याचे तपासात समोर आले. घरखर्च, किराणा आणि भाड्यासाठीही तो पैसे देत असल्याचे सांगितले जाते.

मात्र काही काळाने या नात्यात प्रेमापेक्षा हक्क, अपेक्षा आणि पैशांचा ताण वाढू लागला. कविताकडून नरेशवर लग्नासाठी दबाव येऊ लागला. दुसरीकडे नरेशच्या कुटुंबीयांनी त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. याच टप्प्यावर दोघांच्या नात्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला. नरेशच्या कुटुंबीयांनीही हा वाद मिटवण्यासाठी कविताला पैसे देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.

काही दिवस शांतता राहिली…पण नातं पूर्णपणे संपलं नव्हतं. पुन्हा जवळीक… पुन्हा संघर्ष…. काही काळानंतर नरेश आणि कविता पुन्हा संपर्कात आले. नातं पुन्हा सुरू झालं. मात्र आता नरेशला लग्न करायचं होतं. त्यामुळे तो कवितापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. कविताला हा दुरावा मान्य नव्हता. आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक असे काही प्रसंग घडले, ज्यामुळे नरेशच्या मनातील संताप वाढत गेला.
एका प्रसंगात नरेशच्या आईला कवितासह तिच्या काही मैत्रिणींनी मारहाण केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या एका घटनेत कविताच्या मैत्रिणीने नरेशला व्हिडीओ कॉल करून कविताबाबत एक माहिती दिल्याचे म्हटले जाते. या दोन प्रमुख घटनांमुळे नरेश मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि संतप्त झाला असल्याचे पोलिस तपासातून समोर आले. आणि याच संघर्षातून त्याच्या मनात एक धोकादायक विचार आकार घेऊ लागला. कविताचा कायमचा ‘बंदोबस्त’ करण्याचा नरेशने निश्चित केल्याचे म्हटले जाते.

दिनांक 8 सप्टेंबर 2026 … कविताच्या जीवनातील शेवटचा दिवस नियतीने लिहून ठेवला होता. त्या दिवशी मात्र कविताला पुढे काय होणार आहे, याची कल्पनाही नव्हती. नरेशचा फोन वजा निरोप आला. एकांतात जाऊन बोलूया…कविताने होकार दिला. ती गाऊनवरच नरेशच्या मोटारसायकलवर बसली.

दोघे जळगाव शहरातून बाहेर पडले. शिरसोली…वावडदा…म्हसावद…प्रवास पुढे सरकत होता. दरम्यान कविताने तिच्या दोन-तीन मैत्रिणींशी फोनवर संपर्क साधून आपण नरेशसोबत असल्याचे सांगितले. कदाचित हा फोनच पुढे पोलिस तपासातील महत्त्वाचा धागा ठरणार होता. मोटारसायकल जंगलाकडे वळली…शहर मागे पडत गेले. रस्त्यावरची गर्दी कमी झाली आणि नरेश मोटारसायकल घेऊन पद्मालयच्या जंगल परिसराकडे वळला.

पोलिसांच्या तपासानुसार, नरेशने घरातून निघतानाच सोबत ब्लेड घेतले होते. जंगलातील निर्जन भागात पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. आणि अचानक परिस्थितीने हिंसक वळण घेतले. नरेशने कविताच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचा आरोप आहे. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तिने जवळ पडलेला दगड उचलून नरेशवर हल्ला केला. यानंतर नरेशनेही दगड उचलून तिच्यावर हल्ला केला. तिच्या छातीवर आणि डोक्यावर दगडाने वार करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले.


काही वेळातच कविता निश्चल पडली. एक नातं…एक संघर्ष…आणि एका महिलेचा जीव…जंगलाच्या एकांतात संपला. मृतदेह तिथेच… पण संशयीत आरोपीचा पुढचा डाव सुरू झाला. घटनेनंतर नरेशने कविताचा मोबाईल घेतला. त्याने घटनास्थळावरुन पलायन केले. जंगलात काही अंतरावर त्याने मोबाईल फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, कविताचा मुलगा घरी तिची वाट पाहत होता. आई घरी आली नाही. वेळ वाढत गेला. शेवटी त्याने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले.


आई कविता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली. सीसीटीएनएस क्रमांक 728/2026 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 140(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पुढील तपासाला वेग दिला. पण त्यावेळी पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता—कविता गेली कुठे?
एमआयडीसी पोलिसांनी सर्वप्रथम कविताच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. आणि एका महत्त्वाच्या ठिकाणी तपासाची दिशा बदलली. 8 सप्टेंबर रोजी कविता नरेशसोबत मोटारसायकलवर डबलसीट जातांना दिसली. पोलिसांनी जळगाव ते म्हसावद या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोघे दिसत होते. पण…म्हसावदनंतर ते कुठे गेले? पुढील कॅमेऱ्यांमध्ये त्यांचा मागमूस दिसत नव्हता.


पोलिसांनी एरंडोलच्या दिशेनेही फुटेज तपासले. तिथेही दोघे आढळले नाहीत. तपास काही काळासाठी पुन्हा थांबला. तेवढ्यात तांत्रिक तपासातून आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला. कविताचा मोबाईल म्हसावदजवळ बंद झाल्याचे स्पष्ट झाले. आता पोलिसांसमोर एक शक्यता होती. कविता कदाचित या परिसराच्या आसपासच असू शकते.
13 सप्टेंबर 2026 चा दिवस. पद्मालय परिसरातील एका जंगल भागात दुर्गंधी पसरू लागली. एका गुराख्याला संशय आला. त्याने जवळच्या एका दुकानदाराला याबाबत सांगितले. माहिती नजीकच्या एरंडोल पोलिसांपर्यंत पोहोचली. एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आणि तिथे पथकाला जे दृश्य दिसले, त्याने तपासाला आणखी गंभीर वळण दिले.


एका महिलेचा दगडाने चेहरा ठेचलेला मृतदेह पडला होता. चेहरा दगडाने विद्रूप झालेला होता. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. दुर्गंधी पसरत होती. महिलेची ओळख पटत नव्हती. एरंडोल पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा केला. मात्र एमआयडीसी पोलिसांकडे बेपत्ता कविता सुतार या महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार आधीपासूनच दाखल होती. तपासाची दोन टोकं आता हळूहळू एकत्र येऊ लागली होती.
मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटवणे अवघड होते. मात्र नातेवाईकांनी मृतदेहावरील गाऊन आणि शरीरयष्टी पाहून तो मृतदेह कविता सुतार हिचाच असल्याचे ओळखले. बेपत्ता कविता…आणि जंगलात सापडलेली अनोळखी महिला…दोन्ही एकच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला.

आता तपासाचा प्रश्न बदलला होता. कविताचा मृत्यू कसा झाला? आणि तिला जंगलात घेऊन गेले कोण? दिनांक 8 सप्टेंबरला कविता नरेशसोबत मोटारसायकलवर गेल्याचे अनेकांनी पाहिले होते. कविताने स्वतः काही मैत्रिणींना फोन करून आपण नरेशसोबत असल्याचे सांगितले होते. आणि आणखी एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली—कविता बेपत्ता झाल्यापासून नरेशही जळगाव शहरातून गायब होता.
आता संशय अधिक गडद झाला. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास सुरू ठेवला. मोबाईल लोकेशन…सीसीटीव्ही…प्रत्यक्षदर्शींची माहिती…आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळणारी माहिती…या सर्व धाग्यांना जोडण्याचे काम सुरू झाले.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संशयीत नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे याचा शोध सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण चौधरी, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ गिरीश पाटील, पोकॉ विशाल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास पुढे नेला.
आणि अखेर…जळगाव शहरात नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीदरम्यान त्याने कविताच्या खूनाची कबुली दिली. आता या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येत आहेत. नरेशला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे व त्यांचे सहकारी नरेंद्र मोरे हे करत आहेत.
पाच वर्षांचं नातं… शेवट रक्ताने का लिहिला? या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ प्रेमसंबंध, वाद आणि खून एवढ्याच चौकटीत पाहून चालणार नाही. या घटनेत अनेक गंभीर सामाजिक प्रश्न समोर येतात. नात्यात प्रेम असेल तर त्यात संमती, विश्वास आणि परस्पर सन्मान असणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीने नातं संपवण्याचा निर्णय घेतला तर तो निर्णय स्वीकारण्याची मानसिकता दोन्ही बाजूंनी असली पाहिजे.
पैशांचा व्यवहार, भावनिक दबाव, धमकी, ब्लॅकमेलिंग किंवा हिंसा—यापैकी कोणतीही गोष्ट नात्याचा पर्याय होऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नातं तुटलं म्हणून जीव घेण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. कविता ज्या परिस्थितीत पतीला सोडून रहात होती, तिच्या आयुष्यात कोणत्या अडचणी होत्या, तिच्या भोवतीचे सामाजिक वातावरण कसे होते—याचा स्वतंत्रपणे विचार होणे गरजेचे आहे.
एकटी महिला, आर्थिक असुरक्षितता, चुकीची संगत, भावनिक अवलंबित्व आणि नात्यातील संघर्ष या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की परिस्थिती किती धोकादायक होऊ शकते, हे या घटनेतून दिसून येते. पण कोणत्याही परिस्थितीत हिंसा हा उपाय नाही. वाद असेल तर संवाद करा. नातं बिघडलं तर कायदेशीर मार्ग स्वीकारा. धमकी किंवा ब्लॅकमेलिंग होत असेल तर पोलिसांची मदत घ्या. आणि हिंसेची शक्यता वाटत असेल तर एकटे सामोरे जाण्याऐवजी तातडीने विश्वासू व्यक्ती व कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणेशी संपर्क साधा. कारण कधी कधी एका क्षणाचा राग…एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.
काही गुन्ह्यांची सुरुवात बंदुकीच्या आवाजाने होत नाही…ती सुरू होते एका छोट्याशा ओळखीपासून. मग मैत्री होते…मैत्रीचं नात्यात रूपांतर होतं…नात्यात अपेक्षा निर्माण होतात…अपेक्षा हक्कात बदलतात…आणि हक्क, संशय व संतापाच्या आगीत जळू लागले की त्याचा शेवट कधी आणि कसा होईल, हे सांगता येत नाही. जळगावच्या कविताच्या प्रकरणातही काहीसं असंच घडलं.







