खासगी कंत्राटी वाहनावर बेकायदा दिवा! —- व्हीआयपी संस्कृतीचा कशासाठी देखावा?

On: September 25, 2026 2:29 PM

जळगाव : जळगाव मनपा आयुक्त आदित्य जीवने वापरत असलेल्या खासगी चारचाकी वाहनावरील दिवा सध्या चर्चेत आला आहे. खासगी वाहनावरील या दिव्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी स्थानिक प्रशासन ते मुंबई पर्यंत केली आहे. गुप्ता यांच्या तक्रारीची दखल जळगाव आरटीओ विभागाने घेतली आहे. गुप्ता यांनी शासनाच्या विविध पातळीवर एकाच वेळी केलेल्या तक्रारीनुसार शासकीय सेवेतील केवळ आपात्कालीन सेवा (पोलिस प्रशासन, रुग्णवाहिका, अग्नीशमन विभाग) वगळता कुणालाही त्यांच्या ताब्यातील शासकीय अथवा खासगी वाहनावर लाल, निळी, पिवळी बत्ती (फ्लॅशिंग लाईट) लावण्याचा कायदेशीर अधिकार नाही. केंद्र सरकारच्या 1 मे 2017 च्या ऐतिहासिक निर्णयानुसार देशातील व्हिआयपी संस्कृती पुर्णपणे मोडीत काढण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा शहराचे मनपा आयुक्त यांना देखील त्यांच्या ताब्यातील शासकीय अथवा भाड्याच्या खासगी वाहनावर असा दिवा (बत्ती) लावण्याचा अधिकार नाही.

dipakkumar gupta RTI activist

जळगाव मनपा आयुक्त सध्या वापरत असलेले खासगी वाहन (एमएच 18 सीएल 5286) पांढ-या नंबर प्लेटचे आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या त्यांच्या ताब्यातील वाहनावर बेकायदा दिवा लावण्यात आला असल्याचा आरोप दीपककुमार गुप्ता यांनी शासन स्तरावर केलेल्या तक्रारीत नमुद केला आहे. पांढ-या नंबर प्लेटचे हे खासगी वाहन व्यक्तीगत वापरासाठी शासन दप्तरी नोंदणीकृत करण्यात आले आहे. जळगाव मनपाच्या उपायुक्त कार्यालयाने हे वाहन 180 दिवसांच्या मुदतीवर मक्तेदार राहुल रामभाऊ माणीक यांच्याकडून भाड्याने घेतले आहे. खासगी पासिंग असलेल्या कोणत्याही वाहनाचा वापर भाडेततत्वावरील कामकाजासाठी करणे हा दंडनीय गंभीर गुन्हा असल्याचे गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. केवळ पिवळ्या नंबर प्लेट असलेल्या वाहनाचाच वापर शासकीय कामकाजासाठी अथवा भाडे तत्वावरील कामकाजासाठी करता येऊ शकतो. व्यावसायीक वाहनाच्या तुलनेत खासगी वाहनाचा रोड टॅक्स, परवाना शुल्क कमी प्रमाणात असतो. असे खासगी वाहन व्यावसायिक कामासाठी वापरल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे गुप्ता यांनी निदर्शनास आणले आहे. मुळातच खासगी भाडोत्री वाहन असतांना त्या वाहनाच्या बोनटवर मनपाचा लोगो असलेला ध्वज लावण्यात आला आहे. याबाबत देखील गुप्ता यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

या सर्व मुद्द्यांना अनुसरुन सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी काही मागण्या केल्या आहेत. वाहतुक शाखा, आरटीओ यांनी संयुक्त कारवाई करुन एमएच 18 सीएल 5286 या वाहनावरील बेकायदेशीर दिवा आणि फ्लॅशर त्वरीत जप्त करावा. खासगी वाहनाचा व्यावसायीक वापर केल्याबद्दल संबंधीत मालक – मक्तेदार यांच्याविरुद्ध रितसर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दंडात्मक कारवाई करावी. जेवढे दिवस हे वाहन जळगाव मनपाच्या सेवेत भाडे तत्वावर कार्यरत होते तेवढ्या दिवसांचा व्यावसायिक कर आकारुन शासनाचा बुडालेला महसुल वाहन मालकाकडून चक्रवाढ व्याजासह वसुल करण्यात यावा. भविष्यात मनपाने वैध वाहनेच भाड्याने घ्यावीत असे आदेश जळगाव मनपाला देण्यात यावे अशा मागण्या दीपककुमार गुप्ता यांनी शासन दरबारी वरिष्ठ पातळीवर केल्या आहेत. या प्रकरणी आरटीओ विभाग आता काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. आरटीओ विभागाच्या वायुवेग पथक क्रमांक दोन यांना एमएच 18 सीएल 5286 या क्रमांकाच्या वादातीत वाहनावर तातडीने कारवाई करुन तसा अहवाल तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे समजते. एकंदरीत या कारवाईकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment