कॉलेजच्या वाटेवर उज्वल भविष्यासाठी तिचा प्रवास! – तरुणांच्या छेडखानीला वैतागून घेतला तिने गळफास!! 

On: September 30, 2026 11:03 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : सकाळची वेळ… हातात कॉलेजची बॅग… डोळ्यांत भविष्याची स्वप्नं… आणि रोजच्या एसटी बसने महाविद्यालय गाठण्याची धडपड. अवघ्या अठरा वर्षांची प्रिया (काल्पनिक नाव) ही तरुणी अशीच आपल्या भविष्याचा मार्ग शोधत होती. पण तिच्या या रोजच्या प्रवासात काहीतरी बदलत होतं…महाविद्यालयात जाण्याची तिची इच्छा कमी होऊ लागली. कॉलेज बुडू लागलं. घरच्यांनी विचारलं…“काय झालं? कॉलेजला का जात नाहीस?” तेव्हा प्रियाने आपल्या मनात दडवून ठेवलेली गोष्ट कुटुंबीयांना सांगितली.

कॉलेजमध्ये आणि बसच्या प्रवासात काही टवाळखोर तरुण तिची छेड काढत असल्याचे तिने कुटूंबियांना कथन केले. घरच्यांना काळजी वाटली. पण कदाचित त्यांनाही कल्पना नव्हती…की ही छेडछाड पुढे एका कुटुंबाला आयुष्यभर न विसरता येणाऱ्या दुःखासमोर उभं करणार आहे.

Vijaykumar Thakurwas Dysp

जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एक गाव. याच गावात प्रिया आपल्या कुटुंबासोबत रहात होती. घरची परिस्थिती साधी आणि बेताची होती. वडील आणि मोठा भाऊ मजुरी करत होते. एक भाऊ पर जिल्ह्यात खासगी नोकरी करत होता. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने संसाराला हातभार लावत होती. आणि प्रिया शिक्षण घेत होती. कुटुंबाच्या आशा तिच्याशी जोडल्या होत्या. तिला शिकायचं होतं. पुढे जायचं होतं. पण तिच्या वाटेत काही टवाळखोर तरुणांचा त्रास येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

सुरुवातीला कदाचित हा त्रास छोटा वाटला असेल…पण एखाद्या मुलीच्या मनावर रोज होणारी छेडछाड, टोमणे, पाठलाग किंवा भीतीचा परिणाम किती मोठा असू शकतो? हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा समाजासमोर उभा राहतो.

Shrikant Patil API

आणि मग आला तो काळा दिवस…26 सप्टेंबर 2026. प्रियाचा भाऊ पर जिल्ह्यात नोकरीवर होता. आई-वडील आणि भाऊ मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरात प्रिया एकटीच होती. सायंकाळी आई कामावरून घरी परतली. दरवाजा उघडला…आणि काही क्षणांतच तिच्या आयुष्याचा आधारच हिरावला गेला. प्रिया गंभीर अवस्थेत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने एरंडोल येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण प्रियाला वाचवता आले नाही.

बहिणीच्या मृत्यूची बातमी ऐकून तिचा पर जिल्ह्यातील भाऊ खासगी वाहनाने गावाच्या दिशेने निघाला…फोनवरील काही शब्दांनी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. “बहिण नाही राहिली…” बहिणीच्या मृत्यूची बातमी ऐकताच तिचा भाऊ गावाकडे निघाला. तो पोहोचेपर्यंत प्रियाची उत्तरीय तपासणी झाली होती. घरात आक्रोश होता. नातेवाईक होते. पण जिच्यासाठी सगळे जमले होते…ती मात्र कायमची निघून गेली होती.

तिच्यावर अंत्यसंस्कार झाले…पण तिच्या मृत्यूमागचे प्रश्न मात्र अजून जिवंत होते. अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांनी प्रियाचा मोबाईल तपासला. काही संदेश…काही संपर्क…आणि त्यामध्ये आढळला एक अनोळखी मोबाईल नंबर. कुटुंबीयांनी त्या नंबरची माहिती घेतली. तो नंबर कासोदा येथील महेश विठ्ठल मराठे याचा असल्याचे समोर आले. इथूनच या प्रकरणाने नवं वळण घेतलं.

महेशसोबत आणखी काही तरुणांची नावे समोर आली. अभिषेक सुनील उशीरे, रोहित महेंद्र मोरे, मनोज रामभाऊ गढरी, रुपेश आनंदा वारे. या तरुणांकडून कोमलला त्रास होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र या आरोपांची सत्यता आणि तिच्या मृत्यूशी त्यांचा नेमका संबंध काय, हे तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

यानंतर समोर आलं आणखी एक धक्कादायक कनेक्शन…26 सप्टेंबरचीच संध्याकाळ. साधारण चार ते पाच वाजण्याच्या सुमारास काही टवाळखोर तरुण प्रिया घरी एकटी असतांना घराच्या परिसरात फिरताना दिसल्याचे तपासात समोर आले. परिसरातील एका महिलेने त्यांना हटकले. “तुम्ही कोण? इथे कशासाठी आला आहात?” तरुणांनी गावा बाहेरच्या रस्त्यावर जायचं असल्याचे त्या महिलेला सांगितले.

मात्र हटकणा-या महिलेने त्या संशयीत तरुणांना सांगितले की त्या दिशेने पुढे जाण्यास रस्ता नाही. त्यानंतर ते आल्या पावली परत गेले. या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे तपासात समोर आले आहे. एकीकडे प्रियाच्या मोबाईलमधील अनोळखी नंबर…दुसरीकडे घराजवळ दिसलेले तरुण…आणि आधीपासून कुटुंबीयांना सांगितलेला छेडछाडीचा त्रास…या सगळ्या धाग्यांनी कुटुंबीयांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.

या प्रकरणात मयत प्रियाच्या भावाच्या फिर्यादीवरून कासोदा पोलिसांनी महेश विठ्ठल मराठे, अभिषेक सुनील उशीरे, रोहित महेंद्र मोरे, मनोज रामभाऊ गढरी आणि रुपेश आनंदा वारे या संशयीतांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. भाग 5 गु.र.न. 147/2026 नुसार अनुसुचीत जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पण या दुर्दैवी घटनेतील सर्वात मोठा प्रश्न गुन्ह्यापेक्षाही मोठा आहे…आपल्या समाजात एखाद्या मुलीला रस्त्यावर सुरक्षितपणे चालता येत नसेल, तर आपण नेमकं कुठे कमी पडतोय? छेडछाड करणाऱ्याला ती काही क्षणांची गंमत वाटू शकते. मित्रांसमोर स्वतःची दादागिरी दाखवण्याचा प्रकार वाटू शकतो. पण समोरच्या मुलीच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो? तिला रोज कॉलेजला जाताना भीती वाटते का? बसची वाट पाहताना ती आजूबाजूला घाबरून पाहते का? रस्त्यात कोणी पाठलाग करेल का, असा प्रश्न तिच्या मनात निर्माण होतो का?

आणि सर्वात महत्त्वाचं…ती आपल्या घरच्यांना हे सगळं सांगण्याआधी किती वेळ एकटीने सहन करत असते? या घटनेतील आरोप आणि त्यामागची वास्तविकता तपासातून स्पष्ट होईल. पण समाज म्हणून आपण या घटनेतून एक गोष्ट नक्की शिकू शकतो—छेडछाड ही “मस्करी” नाही.

एखाद्या मुलीला त्रास देणे, तिचा पाठलाग करणे, तिच्यावर शेरेबाजी करणे किंवा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणे याकडे “तरुणपणातील गंमत” म्हणून पाहणे धोकादायक आहे. कारण मानसिक त्रास दिसत नाही… पण त्याची जखम आत खोलवर असू शकते.

पालकांसाठीही ही घटना एक इशारा आहे…मुलगा किंवा मुलगी अचानक कॉलेजला जाणं बंद करत असेल… अचानक शांत झाला असेल…फोनपासून दूर राहत असेल…वारंवार भीती व्यक्त करत असेल…तर फक्त, “अभ्यास कर… कॉलेजला जा…”एवढंच म्हणू नका.

एकदा शांतपणे विचारा—“काय झालंय? कुणी त्रास देतंय का? आम्ही तुझ्यासोबत आहोत.” कधी कधी मुलाला समाधान देण्यासाठी मोठ्या भाषणाची गरज नसते. फक्त एवढी खात्री हवी असते की—“मी एकटा नाही.” आणि मुलांसाठीही एक संदेश… तुमच्या मित्राला एखाद्या मुलीची छेड काढताना पाहिलं तर हसणं सोपं आहे. पण त्याला थांबवणं ही खरी मैत्री आहे.

एखाद्या मुलीला त्रास देणाऱ्या व्यक्तीला साथ देऊ नका. “गंमत होती” म्हणून कोणाच्याही मनाला लागणाऱ्या कृतीचं समर्थन करू नका. कारण समोरची व्यक्ती काय सहन करत आहे, हे आपल्याला माहीत नसतं. प्रिया परत येणार नाही… पण तिची कहाणी प्रश्न विचारत राहील. प्रियाच्या घरात आता तिचा आवाज ऐकू येणार नाही. एस.टी. बस तिच्यासाठी थांबणार नाही….. कॉलेजची बॅग कदाचित घराच्या एखाद्या कोपऱ्यात तशीच पडून राहील. आईला मुलगी पुन्हा कधीच हाक मारणार नाही. भावाला बहिणीचा फोन पुन्हा कधीच येणार नाही.

पण प्रियाची कहाणी समाजाला एक प्रश्न विचारून जाते—“एका मुलीला सुरक्षितपणे शिकता यावं, कॉलेजला जाता यावं आणि घरी परतता यावं… एवढी साधी अपेक्षाही आपण पूर्ण करू शकत नाही का?” या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव उप विभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड करत आहेत. त्यांना कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि त्यांच्या सहका-यांचे सहकार्य लाभत आहे.

तपासातूनच या संपूर्ण घटनेमागील सत्य स्पष्ट होईल. पण तोपर्यंत…प्रिया सारख्या प्रत्येक मुलीला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे—“तुला कोणी त्रास देत असेल तर शांत राहू नकोस. आवाज उठव. घरच्यांना सांग. शिक्षकांना सांग. पोलिसांची मदत घे. मदत मागणं ही कमजोरी नाही… ती स्वतःला वाचवण्याची पहिली पायरी आहे.” (या कथेतील प्रिया हे नाव काल्पनिक आहे.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment