तिस हजाराचा तगादा लावत पत्नी गेली माहेरी — गळा आवळून लालाने वृद्धेला पाठवले देवाघरी

On: October 2, 2026 9:21 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : कधी कधी माणसाच्या आयुष्यात एखादी अडचण येते… आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी तो चुकीचा मार्ग निवडतो. कधी कधी मनुष्याच्या जीवनात पत्नीचा अवाजवी हट्ट पुरवण्याची वेळ येते. पत्नीचा अवाजवी हट्ट पुरवण्याच्या नादात आणि विचारात मनुष्याकडून एखादी घोडचुक होते. त्या घोडचुकीची शिक्षा आणि त्या एका चुकीच्या विचाराची किंमत किती भयंकर असू शकते, याची जाणीव होईपर्यंत अनेकदा सर्व काही हातातून निसटलेले असते. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील दोधे गावात घडलेली घटना अशाच एका धक्कादायक कथेला जन्म देते. एका बाजूला होते 77 वर्षीय निवृत्त पोलिस पाटील वसंत दयाराम पाटील आणि त्यांच्या आयुष्याची सोबती 72 वर्षीय ललिताबाई पाटील. वयाच्या या टप्प्यावर दोघांनी सुख-दुःखाची अनेक वर्षे एकत्र पार केली होती. घर, शेत आणि एकमेकांची साथ… एवढ्याच छोट्याशा विश्वात त्यांचे आयुष्य सुरू होते. पण 23 सप्टेंबर 2026 रोजी त्या घरात असा प्रसंग घडला, ज्याने वसंत पाटील यांच्या जीवनाला कायमची जखम दिली.

सेवानिवृत्त पोलिस पाटील वसंत पाटील यांच्या शेतावर लाला धर्मा भिलाला हा सालदार म्हणून काम करत होता. तो मुळचा मध्य प्रदेशातील रहिवासी होता. सालदार लाला भिलाला याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. तिला तिस हजार रुपये हवे होते. ही रक्कम मिळाल्याशिवाय ती सासरी परतणार नाही, असा तिचा हट्ट होता. लालासमोर प्रश्न उभा राहिला की पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी तिच्यासाठी तिस हजार रुपये आणायचे कुठून?” मनुष्याला सर्व प्रकारची सोंगे घेता येतात. मात्र पैशांचे सोंग घेता येत नाही हे आजच्या जीवनातील वास्तव आहे. त्याच्या मनात पैशांची चिंता घर करू लागली. त्याची पत्नी काही केल्या माहेरुन परत येण्याचे नाव घेत नव्हती.

दरम्यान त्याची नजर वयोवृद्ध मालकिन ललिताबाई यांच्या अंगावरील दागिन्यांवर गेली. ते दागिने पाहिल्यानंतर त्याच्या मनात चुकीचा विचार येण्यास सुरुवात झाली. “हे दागिने मिळाले तर… पत्नीची पैशांची मागणी पूर्ण करता येईल.” एका क्षणासाठी मनात आलेला हा विचार पुढे किती भयंकर वळण घेणार आहे, याची कदाचित त्यालाही कल्पना नसावी.

Lalitabai patil

23 सप्टेबरचा तो दिवस… घरात फक्त ललिताबाई होत्या. वसंत पाटील नेहमीप्रमाणे शेताकडे गेले होते. घरात वयोवृद्ध ललिताबाई एकट्याच होत्या. त्या नेहमीच्या कामात मग्न होत्या. घरातील भांडी घासत होत्या. बाहेरून पाहता तो दिवस इतर दिवसांसारखाच होता. पण घराच्या आत दबा धरून बसलेला धोका त्यांना माहीत नव्हता.

संशयित आरोपी लाला भिलाला

ललिताबाई घरात एकट्याच असून भांडी घासत असल्याची संधी साधत लाला भिलाला त्यांच्या पाठीमागून आला. आणि पुढच्याच क्षणी परिस्थितीने भयावह वळण घेतले. लाला भिलाला याने पॅंटच्या बेल्टने ललिताबाईंचा गळा आवळण्यास सुरुवात केली. 72 वर्षांच्या त्या वृद्ध महिलेने जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र वय आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचा प्रतिकार कमी पडत गेला. त्यांच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट होत गेला…त्यांना श्वास घेणे कठीण होत गेले…आणि काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

घरात काही क्षणांपूर्वी जिवंत असलेली व्यक्ती आता कायमची शांत झाली होती. ललिताबाईंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील तिन लाख विस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन लाला भिलाला पसार झाला.

एका बाजूला वृद्ध महिलेचा मृतदेह…आणि दुसऱ्या बाजूला गायब झालेले दागिने… घरातील हे दृश्य पाहून काही वेळाने तेथे परतलेल्या वसंत पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. आणि ज्याच्यावर घरातील कामासाठी विश्वास ठेवला होता, तो सालदारही गायब होता.

Sandip Patil PI Raver

ललिताबाई प्रतिसाद देत नव्हत्या. क्षणभरात त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. काय झाले? ललिताबाईंना कोणी मारले? दागिने कुठे गेले? आणि लाला कुठे गायब झाला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली.

वसंत दयाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून फरार लाला भिलाला याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्टर क्रमांक 432/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 309(4) अन्वये रावेर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सखाराम एकनाथ कांबळे करत आहेत.

पण या घटनेतला सर्वात मोठा प्रश्न वेगळाच आहे…तीस हजार रुपयांची गरज होती…आणि त्यासाठी लाखो रुपयांच्या दागिन्यांवर नजर गेली. पण त्या दागिन्यांपेक्षा मोठी किंमत एका माणसाच्या जीवाची होती. ललिताबाईंच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबातील व्यक्ती हिरावून घेतली नाही तर एका वृद्ध पतीची आयुष्यभराची सोबतही हिरावून घेतली.

ज्या व्यक्तीवर घर आणि शेतातील कामासाठी विश्वास ठेवला गेला…त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप या प्रकरणात आहे. पैशांची अडचण येते… पण प्रत्येक समस्येला चुकीचा मार्ग नसतो. या घटनेतून समाजासाठी एक कठोर संदेश समोर येतो. पैशांची गरज कोणालाही पडू शकते. कुटुंबात अडचणी येऊ शकतात. नाती तुटू शकतात. अपेक्षा अपूर्ण राहू शकतात. पण एखाद्या समस्येवरचा चुकीचा निर्णय दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो आणि स्वतःचे आयुष्यही कायद्याच्या कठोर परिणामांसमोर आणू शकतो.

पैसा पुन्हा मिळू शकतो…नोकरी पुन्हा मिळू शकते…नातेसंबंधही कधी कधी पुन्हा जुळू शकतात…पण गेलेला जीव कधीच परत येत नाही. ललिताबाईंच्या मृत्यूची ही घटना केवळ एक गुन्ह्याची बातमी नाही. ती विश्वास, लोभ, चुकीचा निर्णय आणि त्यातून होणाऱ्या अपरिमित नुकसानीची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो. तिस हजार रुपयांसाठी घेतलेला चुकीचा निर्णय… एका संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभराची शिक्षा ठरला का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment