सळई कापण्याचे कटर बनले मान कापण्याचे हत्यार! – रामसिंगच्या संतापात राहुलचा जीव गेला आरपार!!

On: October 9, 2026 11:21 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : एखाद्याची गंमत अथवा मस्करी करणे हे जीवंतपणाचे लक्षण असते. एखाद्याची गंमत अथवा मस्करी केल्याने मन हलके होत असते. ज्या व्यक्तीला कुणी जवळचा अथवा विश्वासातील समजतो त्याच व्यक्तीची थट्टा मस्करी केली जाते. मात्र थट्टा मस्करी झालेल्या व्यक्तीला कधीकधी तो आपला अपमान वाटतो. वास्तविक कित्येकदा तसे नसते. आपली थट्टा ही आपल्याला चिडवण्यासाठी अथवा आपल्याला राग आणण्यासाठी केल्याचा एखाद्याचा समज होतो. वास्तविक थट्टा मस्करी करणा-या व्यक्तीच्या मनात कित्येकदा कोणताही द्वेष अथवा दुजाभाव देखील नसतो. मात्र समोरची व्यक्ती केलेल्या थट्टा मस्करीतून चिडते. एखाद्या प्रसंगात त्याच्या मुखातून एखादा अपशब्द निघतो अथवा त्याच्या हातून असा प्रकार होतो की त्याला जीवनभर पश्चाताप करावा लागतो. आपल्या कृत्याची घोडचूक त्याला जीवनभर त्रासदायक ठरते. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील के-हाळे बुद्रुक य गावी एका बांधकाम (सेंट्रींग) कारागिराने त्याच्या हातातील विजेवर चालणा-या सळई कापण्याच्या कटरने एका तरुण मजुराचा गळा चिरल्याची मन हेलावणारी दुर्दैवी घटना घडली.

जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील के-हाळे बुद्रुक हे एक गाव. या गावातील इंदीरानगर भागात राहुल रविंद्र कापडे हा तरुण रहात होता. राहुल हा अविवाहीत आणि घरातील कमावता तरुण होता. त्याचे आई वडील देखील मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवत होते. मिळेल तिथे मोलमजुरी करणारा राहुल उत्तर प्रदेशात केळीच्या गाड्या भरण्यासाठी गेला होता. काही दिवसांपुर्वी तो आपल्या मुळ गावी के-हाळे येथे आला होता. याच गावात रामसिंग चिंधु भिल हा साठ वर्षाचा इसम रहात होता. रामसिंग हा बांधकामावर सेंट्रिंगची कामे करत होता. बांधकामावर सेंट्रींग कामासाठी लागणा-या सळया विजेवर चालणा-या कटरने मापानुसार कापून त्यांची बांधणी करण्याचे काम रामसिंग करत होता. पत्नीचे निधन झाल्यापासून तो घरात एकटाच रहात होता.

मयत राहुल

गावी आलेल्या राहुलने रामसिंगसोबत गप्पाटप्पा करण्यास सुरुवात केली. बोलता बोलता राहुलने रामसिंगची गंमत घेण्यास अर्थात मस्करी करण्यास सुरुवात केली. राहुलच्या मस्करीने बघता बघता वादग्रस्त वळण घेण्यास सुरुवात केली. राहुल आपली मस्करी करत नसून आपल्याला चिडवत असल्याचा संशय रामसिंगला येण्यास सुरुवात केली. राहुलच्या थट्टा मस्करीचा रामसिंगला राग येण्यास सुरुवात झाली. विशीतला तरुण आपल्या साठीतील प्रौढाची मजा घेत असल्याचे बघून रामसिंगचा राग अनावर होण्यास सुरुवात झाली होती. बघता बघता “तु काय करुन घेशील?” असा खोचक प्रश्न राहुलने रामसिंगला विचारला. त्यावर मनातून चिडलेल्या रामसिंगने “तुझी मान कटरने कापून टाकीन” अशी राहुल यास धमकी दिली. मनातून संतापलेला रामसिंग खरोखरच आपली मान इलेक्ट्रीक कटरने कापेन असा विचार देखील राहुलने केला नसेल.

sanshayit ramsing

संतापलेल्या रामसिंगने घरात जावून सळई कापण्याचे कटर विज बोर्डावर लावून राहुल यास घरात बोलावले. गमती गमतीच्या ओघात राहुल हा रामसिंगच्या घरात गेला. मात्र तो रामसिंगच्या घरात नव्हे तर मृत्युच्या दारात जात असल्याचा त्याने विचार देखील केला नसेल. काही कळण्याच्या आत चिडलेल्या रामसिंगने राहुलच्या गळ्यावर कटर फिरवला. इलेक्ट्रीकवर चालणारे सळया कापण्याचे कटर मानेवर फिरल्याने राहुलची मान जखमी झाली. त्याला काही सुचेनासे झले. तो जीवाच्या आकांताने रक्तबंबाळ अवस्थेत दहा ते पंधरा पावले चालत रस्त्यावर आला आणि धाडकन जमीनीवर कोसळला. या घटनेची माहिती गावक-यांना समजल्यानंतर त्यांनी रामसिंग यास त्याच्या घरातच कोंडून ठेवले. लागलीच या घटनेची माहिती रावेर पोलिसांना देण्यात आली.

Sandip Patil PI

रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील आपल्या सहका-यांसह लागलीच घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात राहुल मरण पावला होता. राहुलच मृतदेह तातडीने रावेर येथे शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनकामी रवाना करण्यात आला. खोलीत कोंडून ठेवलेल्या रामसिंग यास ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले गेले. मयत राहुलचे वडील रविंद्र नारायण कापडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिस स्टेशनला रामसिंग भिल याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उस्मान तन्वीर शेख यांनी मयत राहुलचे शव विच्छेदन केले. या घटनेप्रकरणी अटकेतील रामसिंग भिल यास न्यायालयात हजर केले असता त्याला तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमुल बच्छाव यांच्यासह पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन, हे.कॉ. सुनिल वंजारी, योगेश महाजन, समाधान ठाकुर, पो.कॉ. प्रमोद पाटील व विकार शेख, तथागत सपकाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्य मार्गदर्शनाखाली अमुल बच्छाव करत आहेत.

गमतीचे रुपांतर शाब्दिक वादात होत गेल्याने दोघातील आवाज वाढला… आणि काही क्षणांतच रागाने रामसिंगचा विवेक ताब्यात घेतला. सळई कापण्याचे कटर एका क्षणात हत्यार बनले. त्यानंतर राहुल रविंद्र कापडे हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि मरण पावला. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या वादाने अचानक गंभीर वळण घेतले. कोणालाही कल्पना नव्हती की काही मिनिटांत याच वादाचा शेवट एका तरुणाच्या मृत्यूने होणार आहे.

एका आई-वडिलांचा राहुलच्या रुपातील आधार कायमचा हिरावला गेला. राहुल हा घरातील अविवाहित मोठा मुलगा होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. मजुरी करून मिळणाऱ्या पैशांतून तो घरखर्चाला हातभार लावत होता. आई-वडिलांसाठी तो केवळ मुलगा नव्हता. तर तो त्यांच्या भविष्याचा आधार होता. आपल्याच मुलाचा मृतदेह बघण्याची वाईट वेळ माता पित्यावर आली.

घरासाठी कमावणारा मुलगा गेला आणि मागे राहिल्या फक्त आठवणी, अश्रू आणि अनुत्तरित प्रश्न. पण खरा प्रश्न इथेच सुरू होतो. राहुलचा मृत्यू केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणारी घटना नाही. ही घटना समाजाला आरसा दाखवते. किरकोळ वाद किती भयानक रूप धारण करू शकतो, याचा हा धक्कादायक नमुना आहे. आज वाद झाला. उद्या मिटला असता.

दोन शब्द शांतपणे बोलले असते तर कदाचित राहुल आज जिवंत असता. पण त्या काही क्षणांत रागाने विवेकाचा ताबा घेतला. आणि एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. हातातले साधन हत्यार बनायला वेळ लागत नाही. बांधकामाच्या ठिकाणी असलेले कटर हे कामासाठी होते. पण संतापाच्या भरात तेच कटर मृत्यूचे कारण बनले. म्हणूनच प्रत्येक वादाच्या वेळी एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे—“हा वाद खरंच इतका मोठा आहे का, की त्यासाठी एखाद्याचे आयुष्य संपवावे?” राग काही मिनिटांचा असतो. पण त्यातून घडलेली घटना आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. एका व्यक्तीचा जीव जातो, दुसऱ्याचे आयुष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकते आणि दोन्ही कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. शेवटी उरते ती फक्त शांतता.

पोलिसांचा तपास सुरू आहे. कायदा आपले काम करेल. पण राहुलच्या घरातील शांतता पूर्वीसारखी होणार का? आईला मुलाचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही. वडिलांना घराचा आधार पुन्हा दिसणार नाही. आणि एका क्षणाच्या रागाची किंमत एक संपूर्ण कुटुंब आयुष्यभर मोजत राहणार आहे. म्हणूनच… वाद झाला तर थांबा. शब्दांनी सोडवा. कारण रागाचा एक क्षण संपल्यानंतरही त्यातून झालेली जखम आयुष्यभर राहू शकते. ही घटना आपल्याला एकच गोष्ट सांगून जाते—“रागाच्या क्षणी हात उचलण्यापेक्षा, दोन पावले मागे हटणे कधीही स्वस्त असते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment