ट्रॅक सायकलिंगमधे आकांक्षा म्हेत्रेला रौप्य पदक

On: November 24, 2026 6:21 PM

जळगाव : पंजाबमधील अमृतसर येथील गुरू नानक देव विद्यापीठात पार पडलेल्या ‘ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेत जळगावची सुकन्या आकांक्षा म्हेत्रे हिने चमकदार कामगिरी करत दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. ती जैन इरिगेशनचे सहकारी जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी विशेष कौतूक केले.

१८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुलींच्या गटातील वैयक्तिक ‘टाईम ट्रायल’ प्रकारात आकांक्षाने अत्यंत वेगवान कामगिरी करत पहिले रौप्यपदक पटकावले. हाच विजयी फॉर्म कायम राखत तिने दुसऱ्या दिवशी झालेल्या ‘टीम स्प्रिंट’ प्रकारातही आपल्या संघासह दुसऱ्या रौप्यपदकावर नाव कोरले.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी झालेल्या ‘केरिन’ (Keirin) प्रकारातही आकांक्षाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारत कडवी झुंज दिली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत तिचे पदक थोडक्यात हुकले आणि तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय स्तरावर दोन रौप्यपदके जिंकून जळगावचा आणि पुणे विद्यापीठाचा नावलौकिक उंचावल्याबद्दल क्रीडा वर्तुळातून आकांक्षाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment