जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला “ब्लॅकमेलींग”चे वळण !

खानदेशात भाजप चे लोकनेते एकनाथराव खडसे यांची भाजपाला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यांच्या ताज्या मुंबई भेटीत सावध हालचाली झाल्या. गेल्या पंधरवाड्यापुर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खान्देशातील नेत्यांची मनोगते जाणून घेतली. त्यात रा.कॉ. च्या जळगाव जिल्ह्यातल्या एका गटाने नाथाभाऊंना रा.कॉ. त घेण्याला तिव्र विरोध दर्शवल्याची बातमी बाहेर आली होती. त्यात जिल्ह्यातले दोन माजी पालकमंत्री, खासदार (माजी), यांनी विरोधी सुर लावल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर आता रा.कॉ.त येवू पाहणा-या भाजपातील नेत्याने जिल्ह्यातील रा.कॉ.तील काही नेत्यांना तुरुंगात घालण्याची खेळी कशी केली ते देखील पक्ष नेतृत्वासमोर सांगण्याचा प्रयत्न झाल्याचे बाहेर आले होते.

जे काही भुतकाळाचे राजकारण बाजूला ठेवून भविष्यातील रा.कॉ.पक्षवाढीचा विचार नजरेसमोर ठेवून नाथाभाऊंना रा.कॉ. त घेण्याबाबत ग्रीन सिग्नल असल्याचे लक्षात येताच रा.कॉ.च्या भुतपुर्व पालकमंत्र्यांनी विरोधाचा सुर बदलला. शिवाय त्यांनी विरोधी सुर बदलावा म्हणून आणखी काही हालचाली झाल्याचे समजते.

दरम्यान उद्याच्या संभाव्य राजकारणाचा अचूक वेध घेत रा.कॉ.चे गुलाबराव आप्पा देवकर यांनी जळगाव ग्रामीण एवजी आत्ताच जळगाव शहर मतदार संघावर दावा सांगितला आहे. अर्थात पक्षाने आदेश दिला तर आपण जळगावातून लढू शकतो हे सांगण्यास ते विसरले नाही.

निवडणूकीचे घोडा मैदान अजून लांबच आहे. असे असतांना आप्पांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या प्रायोजीत मुलाखतीत जळगाव शहर मतदार संघावर मात्र आपणास किंवा पुत्रास तिकिट मिळावे अशी “आरक्षणाची” सोय करुन ठेवल्याचे म्हटले जाते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे सध्या राज्यपातळीवर उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाने मागील काळात गाजवलेल्या कथित सिंचन घोटाळ्यात रा.कॉ.चे दुस-या फळीचे नेते अजितदादा पवार आणि सुनिल तटकरे यांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता.

भाजपाचे किरिट सोमय्या यांनी तटकरे यांच्या विरोधात हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराची बरीच आरडाओरड केली. तसेच अजितदादांविरोधात (खरे तर रा.कॉ.) बैलगाडीभर पुरावे असल्याचा देखावा मांडण्यात आला. तथापी महाविकास आघाडीची सत्ता येण्यापुर्वीच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतली. त्या कालावधीत सिंचन घोटाळ्याशी संबंधीत 9 गुन्हे गुंडाळणारी कृती दिसून आली. आता तर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कथीत 25000 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाची देखील हवा निघाली आहे.

एकीकडे रा.कॉ.त असे उत्सवी वातावरण असतांना भाजपाचे नाराज नेते नाथाभाऊंच्या रा.कॉ. प्रवेशाची हवा तापली आहे. नाथाभाऊंनी आता भाजपातून एक पाय बाहेर काढला असल्याचे चित्र त्यांच्या आक्रमक शैलीतून दिसून आले आहे. भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर नामोल्लेखासह त्यांनी आरोपांचा वार केला.

शिवाय भाजपातल्या मंत्र्यांच्या पी.ए.च्या अश्लील वर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स आपणाकडे आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे नाथाभाऊंकडे आणखी कुणाकुणाच्या व्हिडीओ क्लिप्स असतील त्याची चर्चा रंगली. त्यात आणखी भर घातली ती जामनेर तालुक्यातील लोढा यांनी. या लोढा यांचा दावा असलेला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. लोढा यांच्या व्हिडीओतील दाव्यानुसार त्यांना माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे पी.ए.रामेश्वर नाईक यांच्याकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

गेली बरीच वर्ष आपण महाजन गटात होते. परंतू नंतर भाजपा सोडून रा.कॉ.त आलो. जामनेरच्या ब-याच ब-यावाईट भानगडींशी परिचीत असल्यानेच आपणास जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आपल्याकडेही राजकीय क्षेत्राशी संबंधितांच्या अश्लील व्हिडीओ क्लिप्स असून त्याबाबत आपण एक बटण दाबताच जिल्हाभर नव्हे तर राज्यभर हाहाकार माजेल असेही लोढा म्हणत आहेत.

यात अनेक तरुणी – विवाहीतांचा समावेश असल्याने आपण सध्या गप्प बसल्याचे ते सांगताहेत. श्रीमान लोढा यांना गप्पच रहायचे होते तर त्यांची अश्लील व्हिडीओ क्लिप्सची आरडाओरड कशासाठी? असा नवाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

गेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी भाजपच्या जिल्हातीलच एका खासदाराची अश्लील व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांचे तिकिट कापण्यात आले. ही उठाठेव नेमकी कुणी केली? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

पडद्यामागचे सुत्रधार कोण असावे? याची अनेकांना कल्पना आहेच. विशेष म्हणजे सुमारे 25 वर्षापुर्वी भाजपाच्या नेत्यांनी विधानसभेत जळगाव जिल्ह्यातील सेक्स स्कॅंडलच्या कॅसेटस दाखवून कॉंग्रेसी राजवटीवर हल्ला केला होता. नंतर सेना भाजपा सत्तेवर आली होती. म्हणजेच अश्लील कॅसेटस किंवा व्हिडीओ क्लिपचा आता एक शस्त्र म्हणून वापर होवू लागला आहे.

जळगाव जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन ऑडीओ – व्हिडीओ क्लिप्स गेल्या वर्षापासून गाजताहेत. हे रणकंदन होत असतांना जिल्हा पोलिस दलात खांदेपालट झाली. नवे डीएसपी डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणी एकाच आठवड्यात जिल्ह्यातच तिन वेळा बदल्यांचा अनुभव घेणारे कुमार चिंथा सहायक पोलिस अधिक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत. हा जिल्हा व येथील क्राईम समजून घेण्यास त्यांना वेळ लागेल असे सांगितले जावू शकते.

जिल्ह्यात खून, मारामा-या, चो-यांचा धुमाकुळ आहेच. त्यात अश्लील व्हिडीओ क्लिप्स असल्याचे सोशल मिडीयावर  जाहीरपणे आव्हान देवून सांगणारे दिसून येतात. ज्यांच्याकडे अश्लील व्हीडीओ क्लिप्स असल्याचे ते स्वत:च सांगतात ती मंडळी  त्याचा कशासाठी वापर करणार आहेत? हा ब्लॅकमेलींगचा प्रकार तर नव्हे? खरे तर जिल्हा पोलिस दलातील बड्या अधिका-यांनी अश्लील व्हीडीओ क्लिप्सचा दावा करणा-यांना आत मधे घेवून त्या क्लिप्सची सत्यता पडताळून जनतेला सत्य काय ते सांगावे. गुन्हेगारांना त्यांची योग्य ती जागा दाखवावी असे जनतेला वाटते.

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव)

8805667750

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here