नाशिकचा बेरोजगार तरुण वळला पिस्तुल विक्रीकडे

कल्याण : पिस्तूल आणि काडतूस बाळगल्याप्रकरणी नाशिकच्या तरुणासह त्याच्या साथीदाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सुशील भोंडवे (२७) इगतपुरी – नाशिक आणि गौरव खर्डीकर (२८) कल्याण अशी अटकेतील दोघा तरुणांची नावे आहेत. दोघांना कल्याण पश्चिम भागातील गौरीपाडा, योगीधाम परिसरातून काही दिवसांपुर्वी अटक करण्यात आली आहे.

दोघे तरुण पिस्तुलासह गौरीपाडा येथील गुरु आत्मन इमारतीसमोर येणार असल्याची गोपनीय माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. प्रीतम चौधरी यांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत सुशीलकडे पिस्तूल आणि गौरवकडे चार जिवंत काडतुसे मिळून आली.

पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल २१ हजार २०० रुपयांचा आहे. पिस्तुल व काडतुस विकणारे दोघे तरुण तो मुद्देमाल कुणाला विकणार होते याचा तपास सुरु आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनला या प्रकरणी रितसर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

लॉकडाऊन कालावधीत हाताला काम नव्हते. सहा महिन्यापासून बेरोजगार असल्यामुळे लवकर पैसे मिळवण्यासाठी हा पिस्तुल विक्रीचे काम केल्याची माहिती अटकेतील तरुणांनी पोलिसांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here