सहायक पोलिस निरिक्षकाची सर्विस रिव्हॉल्वर चोरी

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस निरिक्षक राहुलकुमार राऊत यांच्या घरातून त्यांच्या ताब्यातील सर्व्हिस रिव्हाल्व्हर चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीच्या घटनेप्रकरणी यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वि.कलम ३८० व १७१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरट्याने पोलिस युनीफॉर्म घालून चोरी केल्याचे सांगण्यात येत आहे.

बुधवारी दुपारच्या वेळी या घटनेत सर्विस रिव्हॉल्वरसह दहा राऊंड चोरीस गेले आहेत. पोलिस गणवेश घालून आलेल्या चोरट्याने हे कृत्य केले असल्याची तक्रार स.पो.नि. राऊत यांनी केली आहे. हे गुंतागुंतीचे प्रकरण नेमके काय व कसे याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. हे प्रकरण फिर्यादीवरच उलटणार की काय? अशी देखील चर्चा या निमीत्ताने सुरु आहे.

स.पो.नि. राऊत हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. आपल्या घरातून बुधवारी सायंकाळी सर्विस रिव्हॉल्वर चोरी गेल्याबाबत माहिती त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांना दिली. हा प्रकार समजल्यानंतर स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ (पाटील), उप विभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक धनंजय सायरे यांच्यासह एलसीबीच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली.

स.पो.नि. राहुलकुमार राऊत हे बांगरनगर परिसरातील एका अपार्टमेंटच्या दुस-या मजल्यावरील फ्लॅंटमधे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवार 21 ऑक्टोबरच्या दुपारी ते त्यांच्या पत्नीसह बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची मोलकरीण घरात हजर होती. दरम्यान मोलकरणीकडे विचारणा करत पोलीसाच्या गणवेशातील एक जण घरात आला.

त्या गणवेशधारी व्यक्तीचा संशय आल्याने मोलकरीण घराच्या मागच्या दाराने बाहेर पळून गेली. तिने पहिल्या मजल्यावर राहणा-या स,पो.नि.कोळी यांच्या पत्नीच्या कानावर हा प्रकार टाकला.

दोघे राऊत पती पत्नी आपल्या फ्लॅट्मधे येण्याच्या आत त्या गणवेशधारी तथाकथीत चोराने बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सर्विस रिव्हॉल्वर, दहा राऊंड व पाच हजार रुपयांची रोकड घेत पलायन केल्याचा घटनाक्रम स.पो.नि. राऊत यांनी शहर पोलिसांना कथन केला.

पोलिस अधिका-याच्या घरात पोलिसाच्या गणवेशातील अज्ञाताने हा चोरीचा प्रकार झाल्याचे स.पो.नि. राऊत सांगत असल्यामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी आज गुरुवारी स.पो.नि. राहुलकुमार राऊत यांच्या फ्लॅटवर फॉरेन्सिक पथक, श्वान पथक, बॉम्ब शोध पथक हजर होत त्यांनी सर्वत्र शोधकार्य केले. या कथित घटनेप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध भा.द.वि. ३८० व १७१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस दलात अकार्यकारी पदावर असलेले अधिकारी शक्यतो शस्त्र बाळगत नसल्याचे म्हटले जात आहे. ते शस्त्र शस्त्रागारात ठेवले जात असल्याचे सांगितले जाते. स.पो.नि.राऊत हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांनी संकेतानुसार त्यांनी त्यांच्या ताब्यातील सर्व्हिस रिव्हाल्व्हर घरी कसे ठेवले हा प्रश्न चर्चिला जात आहे. स.पो.नि. राऊत यांनी चोरी गेलेले रिव्हाल्व्हर कितीवेळा सर्विसिंगसाठी दिले होते? याचा देखील तपास या निमीत्ताने सुरु आहे. स.पो.नि. राऊत यांच्या तक्रारीची दखल घेत उलट तपासणी सुरु करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन, मोलकरीण सांगत असलेल्या वर्णनानुसार संशयीताचे स्केच तयार करण्यात येत आहे.

मुंबईतील एका वरिष्ठ महिला पोलीस अधिका-यासमवेत अश्लील चॅटिंग केल्याचा आरोप स.पो.नि. राहुलकुमार राऊत यांच्यावर असल्याचे समजते. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी पोलिस अधिक्षकांकडे आपला अहवाला सादर केला असल्याचे म्हटले जात आहे. या अहवालावनुसार स.पो.नि. राहुलकुमार राऊत यांना गुन्हा का दाखल करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

यापुर्वी मारेगाव पोलिस स्टेशनमधील लाच लुचपत प्रतिबंधक सापळ्यापासून स.पो.नि. राहुलकुमार राऊत वादात आणि चर्चेत आले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here