झोपलेल्या बालिकेवर महेंद्रने केला अत्याचार ! गुन्हा लपवण्यासाठी निष्पापांचे खून केले चार !!

जळगाव : कष्टकरी आदिवासी समाजातील जमालसिंग, मेहताबसिंग व जवानसिंग हे तिघे भाऊ रोजगाराच्या निमित्ताने मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आले होते. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील गढी येथील मुळ रहिवासी असलेले तिघे भाऊ जळगाव जिल्ह्याच्या सिमेलगत रावेर या तालुक्याच्या ठिकाणी मोलमजुरी करण्यासाठी स्थायिक झाले. या ठिकाणी जमालसिंग, मेहताबसिंग व जवानसिंग या भिलाला परिवारातील तिघा भावांनी आपला संसार थाटला.

बघता बघता 25 वर्षाचा काळ लोटला. तिघा भावांनी वेगवेगळा संसार थाटून आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढण्यास सुरुवात केली होती. आपल्या नातेवाईकांच्या सुखदुखा:त तिघे  भाऊ आपल्या मुळ गावी गढी येथे अधूनमधून जात होते. काही दिवस तेथे राहिल्यानंतर ते पुन्हा रोजगारासाठी रावेर येथे येत होते. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते.

भिलाला परिवारातील मेहताबसिंग व त्याची पत्नी रुमलीबाई यांच्या संसारवेलीवर संजय, सविता, राहुल, अनिल व सुमन उर्फ नानी अशी पाच अपत्ये अवतरली होती. पती – पत्नी व पाच मुले असा भिलाला परिवाराचा सुखाचा संसार सुरु होता.

रावेर शहरानजीक बोरखेडा रस्त्यावरील शेतमालक शेख मुस्तफा शेख यासीन यांच्या शेतातील पत्र्याच्या घरात हे कुटूंब रहिवास करत होते. याच शेताच्या रखवालदारीचे काम भिलाला परिवार करत होता. रखवालदारी व मोलमजुरी करुन या कुटूंबाचा चरितार्थ चालत होता. खावून पिवून सुखी असलेल्या मेहताबसिंग भिलाला यांच्या जवळच्या नातेवाईकाचे गढी येथे निधन झाले होते. त्या मयत नातेवाईकच्या दशक्रिया विधीसाठी त्यांना आपल्या मुळ गावी गढी  येथे जाणे क्रमप्राप्त होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे सर्वांनाच जाणे शक्य नव्हते.

गुरुवार दि. 15 ऑक्टोबर रोजी मेहताबसिंग भिलाला, त्यांची पत्नी रुमलीबाई व मोठा मुलगा संजय अशा तिघांनी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी सोबत दुचाकीवर जाण्याचे ठरवले.  सविता, राहुल, अनिल व सुमन उर्फ नानी या चौघा जणांना एकटेच घरी रहावे लागणार होते. एका दिवसात सायंकाळी घरी परत येण्याचे नियोजन असल्यामुळे चौघा लहान मुलांना एकटे घरी सोडून तिघे जण मध्य प्रदेशात जाण्यास निघाले. घरी एकटे असलेले चोघे जण अगदीच लहान होते. त्यातील सविता ही 14 वर्षाची, राहुल 11 वर्षाचा, अनिल 8 तर सुमन उर्फ नानी ही केवळ 6 वर्षाची बालिका होती. अशा चौघा बालकांना घरी एकटे सोडून तिघे जण आपल्या मुळ गावी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी जाण्यास रवाना झाले.

भिलाला परिवार रहात असलेल्या  शेतापासून काही अंतरावर रावेर या गावापासून जवळच के-हाळे हे गाव आहे. के-हाळे या गावी मेहताबसिंग भिलाला यांचा मुलगा संजय व राहुल यांचा मित्र महेंद्र सिताराम बारेला हा रहात होता.

महेंद्र हा गेल्या काही दिवसापासून के-हाळे गावानजीक असलेल्या सुकी नदीच्या किनारी त्याच्या आजोबाच्या घरी राहण्यास आला होता. 19 वर्षाचा महेंद्र बारेला हा संजय व राहुल या दोघा भावांचा मित्र होता. दोघा भावांचे महेंद्रच्या घरी तसेच महेंद्रचे देखील दोघा भिलाला बंधूंकडे नेहमी येणेजाणे होते. महेंद्र व संजय हे दोघे वयाने जवळपास सारख्या वयाचे अर्थात अठरा – विसच्या घरातील होते. भिलाला व बारेला या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती.

15 ऑक्टोबर रोजी मेहताब भिलाला हे त्यांची पत्नी रुमलीबाई व मुलगा संजय अशांसह मध्य प्रदेशातील गढी येथे जाण्यास निघाले. त्यावेळी योगायोगाने महेंद्र व संजय यांचे फोनवर बोलणे झाले. त्यावेळी चर्चेदरम्यान महेंद्र यास समजले की संजय हा त्याच्या आईवडीलांसह नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गावी गेला आहे. तसेच त्याच्या घरी त्याचे लहान बहिण भावंडे एकटीच असल्याचे त्याला समजले.

या दिवशी महेंद्र सकाळीच पायी पायी के-हाळे या गावापासून रावेर येथे पायी पायी आला. गेल्या दोन महिन्यापासून तो त्याच्या आजोबाच्या घरी मुक्कामी होता. दुपारी साधारण अकरा वाजेच्या सुमारास तो रावेर येथे आला.

काही काम नसल्यामुळे तो रावेर शहरात सहज फिरत राहीला. सायंकाळी अंधार पडल्यावर तो घराकडे जावू लागला. त्यावेळी त्याला वाटेत बुरहानपुर रस्त्यावर संजय भिलाला याचा भाऊ राहुल भेटला. अकरा वर्षाचा राहुल हा निरागस बालक होता. त्याने महेंद्र याची विचारपुस केली. दोघे रस्त्यात थांबून गप्पा करु लागले.

गप्पा करत असतांना निरागस राहुलने भोळ्या मनाने महेंद्र यास म्हटले की एवढ्या रात्री कुठे पायी पायी घरी जातो. माझ्या घरी कुणी नाही. आम्ही चौघे भावंडे एकटेच आहोत. तु आमच्याकडेच रात्रभर थांब आणी सकाळी परत निघून जा. अकरा वर्षाच्या भोळ्या राहुलने महेंद्र यास चांगल्या मनाने घरी आणले व हेच त्याच्यासह त्याच्या बहिण – भावंडांच्या मृत्यूला कारण ठरले.

रात्र झाली असल्यामुळे माणुसकीच्या भावनेतून राहुलने महेंद्र यास त्याच्या घरी आणले. घरी त्याची बहिण सविता (14 वर्ष), अनिल (8 वर्ष) व सुमन उर्फ नानी (6 वर्ष) असे होते. राहुलच्या घरी गेल्यावर  त्यांनी जेवण वगैरे केले. काही वेळाने महेंद्रने त्याचा मोबाईल चार्जींगला लावला. त्यानंतर पुन्हा महेंद्र व राहुल असे दोघे जण गावात फिरायला आले. थोडा वेळ फिरुन आल्यावर पुन्हा घरी परत आले. त्यावेळी रात्रीचे साधारण आठ वाजले असतील. घरी आल्यावर सर्व मुलांनी सोबत बसून टीव्ही पाहिला. रात्र झाल्यामुळे चोघे भिलाला भाऊ – बहिण व महेंद्र बारेला असे पाचही जण झोपी गेले.     

मध्यरात्री अचानक महेंद्र बारेला यास जाग आली. त्यावेळी त्याचे लक्ष गाढ झोपेत असलेल्या चौदा वर्षाच्या सविताकडे गेले. त्यावेळी सविताचे अंग काही प्रमाणात उघडे पडले होते. सविताचे काही प्रमाणात असलेले उघडे अंग बघून महेंद्रची वासना जागृत झाली. वास्तविक ती त्याचा मित्र संजय व राहुल यांची बहिण होती. हे सर्व खरे असले तरी महेंद्र बारेला याची वासना जागृत झाली होती. समोरचे दृश्य बघून त्याच्या मनात वासनेचा आगडोंब उसळला होता. त्याची वासना जागृत होण्याची व नियत फिरण्याची दुर्दैवी वेळ नियतीने आणली होती.

वासनेच्या आहारी गेलेला महेंद्र हळूच जागेवरुन उठला. तो सविताच्या अगदी जवळ गेला. त्याने तिच्या अंगावरुन हळूच हात फिरवला. तिच्या कोमल अंगाचा स्पर्श झाल्यामुळे त्याची वासना भडकली होती. ती जागी होवून आरडाओरड करेल याची त्याला कल्पना आल्यामुळे त्याने तिचे तोंड दाबले. तोंड दाबून धरत त्याने तिला निर्वस्त्र केले. तिचे अंग बघून महेंद्र जास्तच चेकाळला. त्याने नको ते कृत्य तिच्यासोबत केले.

या प्रकारामुळे जागी झालेली सविता जोरजोरात ओरडू लागली. त्याने तिचे तोंड दाबून तिचा आवाज दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र ती जोरजोरात ओरडू लागली. त्यामुळे घाबरलेल्या महेंद्रचे लक्ष जवळच पडलेल्या कु-हाडीकडे गेले. त्याने ती कु-हाड उचलून थेट तिच्या अंगावर चालवली. काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. सविता काही क्षणातच कु-हाडीच्या घावात ठार झाली.

या आवाजामुळे राहुल जागा झाला. आपला मित्र आपल्या बहिणीला ठार करत असल्याचे बघून अवघा अकरा वर्षाचा राहुल घाबरला. त्याने देखील जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आता राहुल आपल्या कृत्याचा भांडाफोड करेल या भितीने त्याने राहुलवर देखील कु-हाडाचे घाव घातले. काही क्षणातच राहुलने देखील या जगाचा निरोप घेतला.

दरम्यान या आवाजाने आठ वर्षाचा अनिल जागा झाला. एका मागून एक असे दोन खून केल्यानंतर महेंद्रने अनिल याला देखील ठार केले. सहा वर्षाची सुमन उर्फ नानी हिला तर त्याने झोपेतच ठार केले. तिला जागे होण्याची संधीच मिळाली नाही. ती जेवण करुन टीव्ही बघून झोपली ती कायमचे हे जग सोडून जाण्यासाठीच झोपली होती. या जगातून जाण्यासाठीच  तिची कायमची झोप नियतीने जणू काही लिहून ठेवली होती.

चोघांना ठार केल्यानंतर आता पलायन करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे लक्षात आल्यानंतर कु-हाड तेथेच टाकून खिडकीतून उडी मारुन महेंद्र बारेला तेथून पसार झाला. दरवाजा तसाच लावलेला राहिला.

दरम्यान मध्य प्रदेशात गेलेले चोघा मयत बालकांचे आई वडील व मोठा भाऊ संजय यांना परतीच्या प्रवासात रात्र झाली होती. त्यामुळे वाटेत मेहताब भिलाला यांच्या नातेवाईक साडूने त्यांना मुक्कामी राहण्याचा आग्रह केला. हा आग्रह जणू काही या चौघा बालकांचा महेंद्रच्या माध्यमातून जीव घेवून गेला. रात्री आपल्या चौघा मुलांसोबत काय प्रकार झाला याबद्दल ते अनभिज्ञ होते. सकाळ झाल्यावर लगेच आपल्या घरी परत जावू असा विचार करत ते नातेवाईकाकडे रात्रभर मुक्कामी थांबले. 

झालेल्या सामुहीक खून सत्रानंतर महेंद्र बिथरला होता. आपल्या हातून आज एक नव्हे तर चार खून होणार आहेत याची त्याने कल्पना देखील केली नव्हती. सर्व प्रकार घडून आला होता. झाला प्रकार सांगून मन हलके करण्यासाठी महेंद्रने रात्रीच त्याच्या वडीलांसह इतरांना फोनद्वारे कळवले.

रसलपूर रस्त्याने पलायन करत असतांना त्याला भुक लागली होती. त्याचे हातपाय रक्ताने माखलेले होते. तशाच अवस्थेत तो रस्त्याने मार्गक्रमण करत होता. वाटेत महेंद्र यास वाटेत दुर्गोत्सव मंडळासमोर पताका लावणारा एक कार्यकर्ता दिसला. तो त्याच्या परिचयाचा निघाला. दुर्गोत्सव मंडळाचे पताका लावणारा तो ग्रामपंचायत सफाई कामगार होता. दोघे एकमेकांना परिचीत होते. त्या सफाई कामगारास महेंद्रने भुक लागली असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या सफाई कामगाराने त्याच्या पत्नीला महेंद्रसाठी काही खायला आणण्यास सांगितले. सफाई कामगाराच्या पत्नीने गावातून महेंद्र साठी चिकन व पाव आणून दिले. दरम्यान हात धुत असतांना रक्ताचे लाल पाणी वाहू लागल्याने दारुच्या नशेतील सफाई कामगाराने त्याला त्याच्या हाताला लागलेल्या रक्ताबद्दल विचारणा केली. त्यावर मार डाला……मार डाला असे महेंद्र बडबडला. मात्र सफाई कामगार दारुच्या नशेत असल्यामुळे त्याने महेंद्रच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही.  त्यानंतर आणलेल्या चिकन व पाव या जेवणावर उपाशी असलेल्या महेंद्रने जोरदार ताव मारला.

16 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी आठ वाजता  शेतमालक शेख मुस्तफा हे त्यांच्या शेतात पोहोचले. त्यांना रखवालदार मेहताब भिलाला यांच्या घराचा दरवाजा बंद दिसला. त्यामुळे त्यांनी घरातील मुलांना बाहेरुन आवाज दिला. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यामुळे मुस्तफा यांनी दरवाजा ढकलून पाहिले असता त्यांना आत अतिशय भयावह आणि अंगावर काटे आणणारा प्रकार दिसला. त्यांना चौघे बहीणभाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यामुळे मुस्तफा यांनी तात्काळ रावेर पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सविता मेहताब भिलाला (14), राहुल  (11), अनिल (8) व सुमन उर्फ नानी (6) या चौघा बहिण भावांची हत्या झालेली दिसून आली. मृतदेहाच्या जवळच कुऱ्हाड व दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्या पोलिसांनी तपासकामी जप्त केल्या. या कुऱ्हाडीनेच चौघा बहीण भावंडांचा खून करण्यात आल्याचे जवळपास निश्चीत झाले होते.

एकाच वेळी चौघा बहिण भावंडाच्या खूनाची खळबळजनक घटना समजताच पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलिस उप अधिक्षक नरेंद्र पिंगळे , स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

मयत चौघा मुलांचे आई वडील व मोठा भाऊ असे तिघे जण गावाहून परत येईपर्यंत ते रहात असलेले पत्र्याचे घर पोलिसांनी सिल केले होते. घरात चौघे मृतदेह पडलेले होते.

शुक्रवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भिलाला पती – पत्नी व त्यांचा मोठा मुलगा संजय असे तिघे जण घरी परत आले. त्यांचे घर पोलिसांनी तपासकामी सिल केलेले होते. पोलिसांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. अघटीत घडल्याची कल्पना आता या तिघांना आली होती. आपल्या मुलांची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच रुमलीबाई भिलाला या मातेने जोरात आक्रोश करत टाहो फोडला.

तिचा मन हेलावणारा आक्रोश बघून घटनास्थळी हजर  असलेल्या पोलिस पथकाचे देखील मन हेलावले. त्यांनी  केवळ मयत मुलांची माता रुमलीबाई हिला घरात प्रवेश दिला. घरातील चौघा मुलांचे मृतदेह बघून रुमलीबाई काही क्षणातच घराबाहेर आली. तिचा आक्रोश मन हेलावणारा होता. उपस्थित महिलांनी त्यांना शांत करत पिण्यासाठी पाणी दिले आणि बाजूला बसवले. मात्र, त्या मातेच्या हुंदक्यांनी उपस्थित प्रत्येकजण भावूक झाला होता. आक्रोश अनावर झाल्याने रुमलीबाई दोन वेळा बेशुद्ध झाली. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात नेले. दुर्दैवी मयत मुलांचे वडील मेहताब भिलाला हे शून्य नजरेने एकटक घराकडे बघत बसले. कुणाशी काय बोलावे हेच त्यांना समजत नव्हते.

रात्री उशिरापर्यंत नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे संशयितांकडून संपूर्ण घटनेची चौकशी करीत होते.

पोलिसांनी घर सील केल्याने या आदिवासी कुटुंबाला दुसरीकडे राहण्याची वेळ आली. मेहताब भिलाला व त्यांच्या 50 ते 60 नातेवाइकांची व्यवस्था शासकीय आदिवासी वसतिगृहात करण्यात आली. ही व्यवस्था करण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या कुटुंबीयांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली.

कालांतराने जसजसा तपास पुढे सरकत गेला त्यात मिळालेल्या वैद्यकीय तसेच परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे या गुन्ह्यात बलात्काराचे कलम वाढवण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

या गुन्ह्याच्या तपासकामी 54 साक्षीदारांची सखोल चौकशी करण्यात आली. या गुन्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव यांच्याकडून मिळालेला मयताचा शवविच्छेदन अहवाल, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांच्याकडून मिळालेला अहवाल, तांत्रिक व शास्त्रीय पुरावे, घटनास्थळावरील परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा महेंद्र सिताराम बारेला (20) रा.के-हाळा ता.रावेर याने या गुन्ह्यात सहभाग घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा (जळगाव उप विभाग) यांच्याकडे सोपवण्यात आला.

शेत मालकाच्या फिर्यादीनुसार रावेर पोलिस स्टेशनला या प्रकरणी भाग 5 गु.र.न. 188/2020 भा.द.वि. 302  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासा दरम्यान मिळालेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यानुसार 376 (अ), 452, लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,10,12 या कलमांची वाढ करण्यात आली.

या गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना तपासकामी  सुचना देण्यात आल्या होत्या.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी सदर गुन्हयाच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामिण, धुळे व नंदुरबार येथील पथके तसेच सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा ( जळगाव उपविभाग), फैजपूर उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक नरेंद्र पिगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापु रोहोम, नाशिक ग्रामिणचे पो.नि.के.के.पाटील, रावेर पोलिस स्टेशनचे पो.नि. रामदास वाकोडे, स.पो.नि. शितलकुमार नाईक, स.पो.नि. स्वप्निल नाईक, पोलिस उप अधिक्षक मनोज वाघमारे, पोलिस उप निरिक्षक सुधाकर लहारे, पो.उ.नि. अंगत नेमाणे, पो.उ.नि. रोहीदास ठोंबरे , पो.उ.नि. योगेश राऊत (नंदुरबार), स.पो.नि. उमेश बोरसे (धुळे), पो.उ.नि.राजेंद्र पवार, पो.उ.नि.योगेश शिंदे यंचे सह रावेर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामिण, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सायबर पोलीस स्टेशन जळगाव असे सुमारे 70 पोलीस कर्मचारी तपासकामी नेमण्यात आले होते.

या गुन्ह्याच्या तपासकामी 54 साक्षीदारांची सखोल चौकशी करण्यात आली. या गुन्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव यांच्याकडून मिळालेला मयताचा शवविच्छेदन अहवाल, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांच्याकडून मिळालेला अहवाल, तांत्रिक व शास्त्रीय पुरावे, घटनास्थळावरील परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा महेंद्र सिताराम बारेला (20) रा.के-हाळा ता.रावेर याने केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here