अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहात रवाना

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेतील रिपब्लिक भारत वृत्त वाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्यांची रवानगी अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. रायगड न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी अलिबाग येथील मराठी शाळेच्या उपकारागृहात होते.

अर्णब गोस्वामी जामीनासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी प्रलंबीत आहे. अधिक तपासासाठी रायगड पोलिसांकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी सुरु आहे. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात नेण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोझ शेख व नितेश सारडा यांना देखील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

आपल्या जिवीताला धोका असून अटकेत आपल्याला मारहाण झाली असून वकिलांसोबत बोलू दिले जात नाही असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अजून दोन दिवस कोठडीत रहावे लागेल. आता ९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. अर्णब गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगड जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी झाली.

आरोपी नितेश सारडा यांच्या वकिलांनी सरकार पक्षातर्फे दिलेला पुनर्निरीक्षण अर्ज व स्थगिती अर्ज, तसेच पोलीस कोठडीबाबतचा मराठी भाषेतील आदेश इंग्रजी भाषेत रुपांतरीत करुन मिळण्यासाठी अर्ज केला. सारडा हे मारवाडी असून पश्‍चिम बंगालचे रहिवासी आहेत. त्यांना मराठी भाषा समजत नाही. त्यामुळे अर्ज इंग्रजी भाषेत देण्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here