रा.स्व.संघ पथसंचलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सन २०१८ मधे पथसंचलन करण्यात आले होते. या पथसंचलनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी हातात काठ्या बाळगल्या होत्या. पोलिस परवानगी नसतांना हातात काठ्या बाळगल्या प्रकरणी मोहनीश जबलपुरे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्याची मागणी जबलपुरे यांनी न्यायालयास केली आहे.

२६ मे २०१८ रोजी पोलीस उपायुक्तांनी रा.स्व.संघाच्या पथसंचलनाला विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली होती. या अटींमध्ये नमुद केल्याप्रमाणे कार्यक्रमात काठ्या, घातक शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगायची नाहीत तसेच शस्त्र प्रदर्शन करायचे नाही व आतिषबाजी करायची नाही अशा मुद्द्यांचा त्यात समावेश होता. अटी शर्थीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमातील प्रत्येक सदस्यावर विहीत कायद्याप्रमाणे कारवाईचा उल्लेख करण्यात आला होता. असे असले तरी रा.स्व. संघाने २८ मे २०१८ रोजी सार्वजनिक रस्त्यांवर काठ्या घेवून पथसंचलन केले होते.

याबाबत जबलपुरे यांच्या म्हणण्यानुसार संघाची ही कृती समाजात दहशत पसरवणारी आहे. त्यामुळे दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जावा असेही जबलपुरे म्हणतात.
जबलपुरे यांनी याप्रकरणी सुरुवातीला २९ मे २०१८ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई झाली नसल्यामुळे जबलपुरे यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांची ती तक्रार १२ ऑक्टोबर २०१८ रोजी फेटाळली गेली.

या निर्णयाविरुद्ध त्यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेला रिव्हिजन अर्ज देखील ६ मे २०१९ रोजी फेटाळला गेला. त्यामुळे जबलपुरे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या याचिकेत सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे, पोलीस आयुक्त, विशेष शाखा पोलीस उपायुक्त व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर सुनावणी होईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here