५० हजारांची लाच भोवली, तालुका आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळयात

नंदुरबार: 50 हजार रुपयांच्या लाच मागणी प्रकरणी नवापूरचे तालुका आरोग्य अधिकारी हरीचंद्र टिकाराम कोकणी (42, रा.बटेसिंग नगर, खांडबारा, ता.नवापूर, जि.नंदूरबार) यास गुरुवारी दुपारी नंदुरबार एसीबीच्या पथकाने खांडबारा गावातील घरातून अटक केल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नवापूर पोलिसात आरोपीविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

39 वर्षीय तक्रारदार यांच्या कुटूंबाच्या मालकीचे शासकीय मान्यताप्राप्त सोनोग्राफी सेंटर नवापूर येथे आहे व त्याची कायदेशीर नोंद झाली आहे. शासकीय योजनेंतर्गत 18 सप्टेंबर 2018 पासून गरोदर मातां-पेशंट कडून तपासणी केल्यानंतर मोबदला न घेता शासकीय दर प्रति पेशंट 400 या मानधनावर तपासणी करण्याचा करार करण्यात आला होता शिवाय एकूण एक हजार 513 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे नमुद कार्यालयाचे लोकसेवक तथा आरोपी डॉ. हरीचंद्र कोकणी यांनी प्रत्येक रुग्णामागे 50 रुपयांप्रमाणे एकूण 76 हजार 650 रुपयांची मागणी 28 मे 2020 रोजी नवापूर येथे केली होती व 50 हजारात तडजोड झाल्यानंतर त्यावेळी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. अखेर गुरुवार, 25 जून रोजी नवापूर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व खांडबारा येथील घरातून आरोपीला एसीबीच्या पथकाने दुपारी अटक केली.

सदर कारवाई नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील आदींच्या पथकाने केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here