“बीएचआर” घबाडावर डल्ला मारण्याची “साठमारी”

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी(बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कथित  भरभराटीचे भांडे फुटल्यानंतर या संस्थेच्या कोट्यावधी रुपयांच्या घबाडावर आडवा हात मारण्यासाठी टपून बसलेल्या जिल्हा – राज्यस्तरीय राजकीय पुढारी, इस्टेट ब्रोकर्स, दलाल यांच्यात जोरदार साठमारी सुरु झाली आहे. बीएचआर पतसंस्थेचा उगम जामनेर येथून झाला. या पतसंस्थेचा आर्थिक प्रवाह “मल्टीस्टेट” च्या माध्यामातून  सात ते नऊ राज्यात योजनाबद्ध रितीने पोहोचवण्यात आला. या पतसंस्थारुपी समुद्रातील हजारो कोटीचा पैसा व्हाया पुणे गिळंकृत करण्याचा खेळ उघड झाला आहे. अलिकडेच भाजपातून रा.कॉ.वासी झालेल्या एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी पितळ उघडे करण्याकामी दमदार उडी घेतली आहे. खडसे – महाजन यांच्यातील जुने हिशेब चुकते करण्याच्या लढाईला तोंड फुटले असल्याचे वरकरणी दिसत आहे.

बीएचआर चे निमित्त करुन एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा “फडणवीस” सरकारने हा घोटाळा दडपला असा फडणवीस विरोधाचा अजेंडा पुढे चालू ठेवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे “बीएचआर” च्या भ्रष्टाचाराची प्रकरणे राज्यभर आणि केंद्र सरकारच्या पातळीवर आपण लावून धरली, आपली स्नुषा श्रीमती रक्षा खडसे या खासदार असल्याने त्यांच्या माध्यमातूनही सन 2018 पासून तक्रारी पाठवल्याचे खडसे यांनी आवर्जून सांगीतले आहे.

तथापी जळगावची बीएचआर पतसंस्था आणी अशाच काही राज्यस्तरीय दोन पतसंस्थांच्या सन 2005 पासून गाजलेल्या भानगडींशी जिल्ह्यातील राजकीय पुढा-यांचा केव्हाच परिचय झाला होता. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शहरे, निमशहरे यातून पतपेढ्यांच्या दुकानदारीचे पेव फुटले. जनतेच्या पैशांवर समाजसेवेचा बुरखा पांघरुन गल्लीबोळात पुढा-यांचे तण माजले. याचा उपसर्ग आपल्यापर्यंत पोहचू नये म्हणून आमदार – मंत्र्यांनी केलेल्या बंदोबस्ताशी नाथाभाऊ चांगलेच परिचीत होते.

नाथाभाऊंच्या राजकीय वाटचालीत त्यांना जामनेरच्या गिरीशभाऊंनी चारवेळा आमदारकी व नंतर मंत्रीपद मिळवत चांगलीच टक्कर दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात बनलेल्या महाजनांनी नाथाभाऊंचे स्थान महात्म्यासह राजकारण थप्पीला लावण्याचा यशस्वी कार्यक्रम राबवला. अर्थात हे सारे करतांना बरे वाईट फंडे वापरुन हस्तक – समर्थकांची मोट बांधली. मंत्रीपदाच्या ताकदीतून आर्थिक ताकद वाढवली. राज्याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यात ज्यांची संपत्ती अब्जावधीच्या मापाने मोजावी असे अब्जाधिश तयार झाले आहेत. राजकीय स्पर्धेत आजवर गिरीश महाजन, नाथाभाऊ यांच्या संपत्ती बद्दल कुरघोडीच्या राजकारणात बरेच ढोल वाजवण्यात आले. भाजपाच्या अन्यायचक्रातून बाहेर पडत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरणा-या नाथाभाऊंना सध्या नवसंजीवनी मिळाल्याचे दिसते.

तथापी राजकीय स्पर्धक गिरीश महाजन यांच्या आर्थिक ताकदीचे स्त्रोत शोधणा-यांनी आता परस्परांच्या भांडवलशक्तीवर मुष्ठी प्रहार चालवले आहेत. सध्या गिरीश महाजनांसह  फडणवीसांचे राजकारण ठोकून काढण्याचा पहिला डाव नाथाभाऊंनी खेळल्याचे दिसते. तथापी सन 2000 पासून जिल्ह्यात धिंगाणा घालणा-या पतसंस्था चालकांचे उद्योग तत्कालीन सेना – भाजपात आमदार – मंत्री राहिलेल्यांना दिसले नाहीत का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

पतपेढ्यंच्या माध्यमातून हजार – दोन हजार कोटींची घबाडे जमा करण्यापासून अनेक फंडे वापरुन कुणी कुणी किती उखळ पांढरे केले हा पीएचडी स्नातकांसाठी शोध निबंधाचा विषय ठरावा (अशा प्रकारचे बदमाशीचे प्रयोग कुणी कुणी केले या उप कथानकाचा देखील त्यात समावेश करावा) असे बोलले जात आहे.

तुर्तास बीएचआरच्या हजारो कोटीच्या घबाडावर डल्ला मारण्यासाठी शेकडो एकर जमीनी बळकावण्याचा खेळ कोण कोण करतोय, कोणते माजी मंत्री, आमदार खासदार गुंतले आहे? पुढील काळात (की आत्ताच) कशी मांडवली होते? कोण कोण उघड होणार याची प्रतिक्षा आहे.

सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव)

8805667750

subhash-wagh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here