निलंबित कर्मचारी नव्हता सदाचारी, पत्नीला म्हणायचा व्यभिचारी !खूनाच्या आरोपाखाली गजाआड जाण्याची केली त्याने कामगिरी!!

जळगाव : अरुणाचे वडील परशुराम ठाकरे हे जळगाव पोलिस दलात नोकरीला होते. पोलिस दलाची सेवा बजावत असतांना त्यांचे अकाली निधन झाले. परशुराम ठाकरे यांचे निधन झाले त्यावेळी त्यांची मुलगी अरुणा हिचे वय जवळपास अठरा वर्ष होते. अठरा वर्षाची अरुणा लग्नायोग्य झाली होती. मुलगी अरुणा हिच्यासाठी वर संशोधन करणे, तिचे लग्न करुन देणे आदी जबाबदा-या परशुराम ठाकरे यांना त्यांची लाईफलाईन संपुष्टात आल्यामुळे  पुर्ण करता आल्या नाही. नियतीने त्यांच्या जीवनावर घाला घातला होता. वडील गेल्याची खंत अरुणाच्या मनाला बोचत होती. मात्र नियतीपुढे कुणाचेच काही चालत नसते. 

त्यानंतर काळ पुढे पुढे सरकत गेला. कॅलेंडरच्या तारखा बदलत होत्या, घडयाळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. वडील परशुराम ठाकरे यांची पुण्याई आणी शासनाची कृपा फळाला लागली. तिचे वडील परशुराम ठाकरे यांच्या निधनानंतर चार वर्षांनी सन 2004 मधे अरुणाला अनुकंपा तत्वावर महसुल खात्यात नोकरी मिळाली. ती तलाठी झाली. तलाठी झालेल्या अरुणाला वेळोवेळी बदलीनिमीत्त नियुक्तीच्या जागी जावे लागत होते. दरम्यान अरुणाचा भाऊ प्रल्हाद हा देखील मुंबई पोलिस दलात दाखल झाला. अरुणाला महसुल खात्यात  व तिचा भाऊ प्रल्हाद याला मुंबई पोलिस दलात नोकरी तसेच तिच्या आईला सुरु झालेले पेन्शन आदी बाबी जुळून आल्यामुळे परिवारात एकंदरीत सुखा समाधानाचे वातावरण होते.

मात्र सन 2016 मधे अरुणाचा मुंबई पोलिस दलातील भाऊ प्रल्हाद याचे अकाली निधन झाले. त्यामुळे भुसावळ येथील अष्टविनायक कॉलनीत राहणा-या ठाकरे परिवारावर चार वर्षापुर्वी पुन्हा आभाळ कोसळले. भाऊ प्रल्हाद याच्या मृत्यूच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याकामी तलाठी अरुणाला वेळोवेळी मुंबईला जावे लागले. कारण घरात तिच एकमेव शिकलेली अर्थात सज्ञान होती. तिचा लहान भाऊ भागवत यास सरकारी कामकाजाच्या चालीरितीचे हव्या त्या प्रमाणात ज्ञान नव्हते. त्यामुळे वेळोवेळी अरुणाला मयत भाऊ प्रल्हाद याच्या मृत्यूच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याकामी मुंबई पोलिस दलात जाण्याचा योग आला.

वारंवार मुंबई पोलिस दलाशी संपर्क आल्यामुळे नितीन मोतीराम पवार या पोलिस कर्मचा-यासोबत तिची ओळख झाली. “लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट” अर्थात पहिल्याच नजरेत नितीन पवारच्या मनात अरुणा भरली. नितीन पवार हा एक घटस्फोटीत कर्मचारी होता.  

सन 2008 च्या बॅचचा कर्मचारी असलेल्या नितिन पवारचे लग्न सन 2010 मधे झाले होते. लग्नानंतर त्याचे पत्नीसोबत काही जमेना. त्याचे पत्नी सोबत रोज काहीना काही कारणाने वाद सुरु झाले. दरम्यानच्या काळात लग्नानंतर त्याच्या संसार वेलीवर एका पुत्ररत्नाचे आगमन झाले. नितीन पवार सोबत होणा-या रोजच्या वादाला त्याची पत्नी वैतागली होती. तिने त्याच्यापासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अवघ्या तिन वर्षातच सन 2013 मधे पती – पत्नीचा  घटस्फोट झाला.

kisanrao najanpatil (police inspector- IO)

घटस्फोटानंतर नितीन पवार याच्या जीवनात एक होमगार्ड महिला आली. त्याने त्या होमगार्ड महिलेवर मोहिनी घातली. ती  महिला होमगार्ड त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली. आपण दोघे लवकरच लग्न करु असे म्हणत त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली व ती देखील त्याच्या जाळ्यात कळत नकळत ओढली गेली. माझा घटस्फोट झाला असल्यामुळे मी आता एकटाच असून माझ्यावर कुणाचे बंधन नसल्याचे त्याने त्या होमगार्ड महिलेला सांगत तिच्याशी अजून संपर्क साधला. या संपर्कातून दोघांचा सहवास वाढला. या सहवासातून दोघात प्रेमसंबंध अजून घट्ट झाले. त्यामुळे दोघांनी सर्व प्रकारचे संबंध प्रस्तापित केले.

हा सर्व एपीसोड सुरु असतांना त्याच्या जीवनात आता तलाठी अरुणा ठाकरे आली. वास्तविक तलाठी अरुणा ही त्याच्यापेक्षा वयाने सहा ते सात वर्षांनी मोठी होती. तो अरुणापेक्षा सहा ते सात वर्षाने लहान होता. ती वयाने मोठी असतांना देखील त्याने तिला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. आपण दोघे एकाच समाजाचे असल्यामुळे आपल्या लग्नाला काही अडथळा येणार नाही असे म्हणत त्याने अरुणाला देखील आपल्या प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या जाळ्यात महिला होमगार्ड प्रमाणे अरुणा देखील आली. नितीन पवार याने होमगार्ड महिलेसोबत देखील संबंध प्रस्थापित केले होते. तसेच समांतर पातळीवर अरुणासोबत देखील प्रेमाची व लग्नाची बोलणी सुरु ठेवली होती.

अरुणाचे वय जवळपास चाळीस वर्ष झाले होते. नोकरीच्या व्यापात व इतर प्रापंचीक जबाबदा-या पार पाडत असतांना तिचे लग्न राहून गेले होते. त्यातच ती आता चाळीशीच्या जवळपास आली होती. आता तिच्या जीवनात तिच्यापेक्षा कमी वयाचा नितीन पवार आला होता. तो तिला लग्नाची मागणी वजा गळ घालत होता. पत्नी नांदत नसून घटस्फोट झाल्याचे सांगून तो लग्न करण्यास तयार असल्याचे तिला म्हणत होता. अखेर एकमेकांच्या सहमतीने दोघांनी निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत सन 2017 मधे लग्न केले. नितीन पवार हा मुळ नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील रहिवासी होता.

नितीन पवार याचे हे दुसरे तर अरुणाचे पहिले लग्न होते. नितीन पवार याचे लग्न झाल्याचे समजताच त्याची महिला होमगार्ड प्रेयसी चिडली. मला प्रेमाच्या आणाभाका देतो आणी लग्न दुसरीशी करतो असे म्हणत तिने त्याला खडे बोल सुनावले. तिने नितीन पवार विरुद्ध मुलुंड पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर  सन 2019 मधे नितीन पवार यास मुंबई पोलिस दलातून निलंबीत करण्यात आले.

पोलिस खात्यातून निलंबीत झाल्यानंतर नितीन पवार हा आर्थिक व मानसिकदृष्ट्या काहीसा हतबल झाला. अरुणा पाचोरा तालुक्यात तलाठी म्हणून काम बघत होती. ती पाचोरा येथे रहात होती. नोकरी हातातून गेल्यामुळे तो अरुणाकडे पाचोरा येथे राहण्यास आला. दरम्यान अरुणा ही तलाठी असल्यामुळे तिला कामानिमीत्त लोकांचे सतत फोन येत होते. महसुलच्या कामानिमीत्त तिला वारंवार येणारे फोन बघून नितीन पवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे म्हटले जात आहे.

नोकरीला असतांना तो सुटीच्या दिवशी अथवा अधूनमधून पाचोरा येथे अरुणाला भेटण्यासाठी येत असे. मात्र नोकरीतून निलंबीत झाल्यापासून तो पाचोरा येथे अरुणाच्या घरी येवून राहू लागला. महसुलच्या कामानिमीत्त  अरुणाला सतत येणारे फोन नितीन पवार याच्या मनात संशय निर्माण करत होते. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेवू लागला. त्यातून वाद होवू लागले. तिला तो अधूनमधून मारहाण व शिवीगाळ करु लागला. हा प्रकार तिला असह्य झाला होता. एके दिवशी अरुणा व नितीन असे दोघे जण अरुणाच्या आईकडे भुसावळ येथे आले होते. त्यावेळी त्याने चारित्र्याचा संशय घेत तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तिच्या आईने केला होता.

29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चारित्र्याचा संशय घेत नितीन पवार याने त्याची पत्नी अरुणा हिच्या डोक्यावर कोणत्यातरी टणक वस्तूने प्रहार केला. या हल्ल्यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली व काही वेळाने ती मृत्युमुखी पडली. तिला दवाखान्यात दाखल केले त्यावेळी ती मयत अवस्थेत होती. तिला मयत अवस्थेत दवाखान्यात दाखल केल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी म्हटले आहे.

या हल्ल्याची माहीती समजताच अरुणाची आई व इतर नातेवाईक भुसावळ येथून लागलीच पाचोरा येथे दाखल झाले. यावेळी नितीन पवार याने अरुणा पायरीवरुन पडल्याचा बनाव केला. ती पायरीवरुन पडून मृत्युमुखी झाल्याचे नितीन पवार याने म्हटले. मात्र तिच्या अंगावर कुठेही खरचटल्याची व्रण अथवा निशानी नव्हती. तिच्या डोक्यावरील खोलवर झालेली जखम बघता तिच्या डोक्यावर टणक वस्तूने प्रहार केला असल्याचे स्पष्ट दिसत होते.

मयत अरुणाची आई  मीराबाई परशुराम ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला नितीन मोतीराम पवार (मुळ रा. लासलगाव – नाशिक हल्ली मुक्काम मोरया नगर पाचोरा – जळगाव ) याच्याविरुद्ध भाग 5 गु.र.न. 418/20 भा.द.वि.302, 498 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नितीन पवार यास अटक करण्यात आली. पुढील तपास पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकरी कैलास पाटील करत आहेत.

,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here