कोरोनासह पत्रकारांनी गाजवले सरते वर्ष 2020

यंदाचे सन 2020 हे वर्ष कोरोना या विषाणूने जसे गाजवले तसे पत्रकारांनी देखील गाजवले. कोरोना या महामारीने संकटात जगभर धुमाकुळ घातला. भारतभरचा  लॉकडाऊन, हातावरचे पोट असणा-या मजुरांचे घराकडे पलायन, रस्त्यातले मृत्यू, विस्थापित – बेसहारांना मदत करणारे सिने अभिनेता सोनु सुद सारखे मसीहा बनून धावून आलेले स्वयंसेवक पहिल्या टप्प्यात दिसले. जूनच्या मध्यावर आणखी एक सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणाने मुंबई सिने सृष्टीसह राजकारण ढवळून निघाले. सुशांतची कथित गर्ल फ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याभोवती ड्रग्ज प्रकरण गाजले. त्यात भरीस भर म्हणून दुसरी अभिनेत्री कंगना रनौतने भाग घेतला. सिने इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेते – अभिनेत्यांवर ड्रग्ज (हेरॉईन – गांजा – एमडी) सेवनाचे आरोप झाले. त्यातून ड्रग्ज माफीयांचा मुद्दा गाजवण्यात आला.

तोंडावर  बिहार विधानसभा निवडणूक असल्याने अर्णब गोस्वामी यांचा रिपब्लिक टीव्ही चॅनल सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या ही हत्या असल्याचे ओरडू लागला. स्वत: पत्रकार अर्णब गोस्वामी भाजपाच्या वतीने सुपारी घेतल्यासारखा राज्यातल्या शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकारप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यासह राज्य सरकारला टार्गेट करतांना दिसून आला. “टाईम्स नाऊ” टीव्ही चॅनल्स विशीष्ट स्टाईलने गाजवणा-या अर्णबने स्वत:चे रिपब्लिक – भारत चॅनल सुरु केल्यावर स्पर्धेतल्या इतर चॅनल्स (उदा. आजतक, एनडीटीव्ही, एबीपी, टाईम्स नाऊ) यांना देखील मागे टाकण्यासाठी शिवसेना आघाडी सरकारवर हल्ले तेज केले. या लढ्यात मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह, गृहमंत्री, मुंबई पोलिस निशाण्यावर घेण्यात आले.

मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणी केलेला तपास आणि काढलेले निष्कर्ष सीबीआयने देखील जवळपास मान्य केले. त्यानंतर या संघर्षाला राज्य – केंद्र असे स्वरुप दिसले. दरम्यान आपल्या कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामीचे टीआरपी घोटाळा प्रकरण जनतेसमोर आणल्याने “आम्हीच जगासमोर सत्य आणतो” असे गळा फाटेपर्यंत ओरडून सांगणा-यांचे पितळ उघडे पडले. आता अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टोळीतील डझनभर मोहरे आरोपीच्या पिंज-यात जावून बसणार आहेत.

“बाबा पेंग्वीन को छोडूंगा नही, बेबी पेंग्वीन को लात मारते मारते जेल पहुचाऊंगा” अशी आक्रस्ताळी बेबंद मग्रुरी – माजोरी भाषा वापरणा-या अर्णबच्या पत्रकारिता स्टाईलच्या पेकाटात सणसणीत लाथ बसली आहे. अर्णब प्रकरणाने पत्रकारीता त्यांचे समर्थक – विरोधक अशी दोन भागात विभागली गेली. पत्रकारीतेतील सभ्यता – सभ्यतेचे मापदंड चर्चेत आले आहेत. त्यामुळे पत्रकारीता क्षेत्रातील अनेक प्रकारच्या बदमाशा जनतेसाठी चर्चेचा विषय बनल्या आहेत.

महाराष्ट्रात एक मोठी ताकद असलेला “रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया” हा पक्ष जसा शेकडो नेते, शेकडो गट – तट, शेकडो जिल्हा अध्यक्ष यात विभागलेला दिसतो तशाच पद्धतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात “न्युज प्रिंट लाईन” मधे “संपादक” म्हणून मिरवण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात – गावपातळीपर्यंत “संपादकांचे” तण माजले असल्याचे लोकच बोलू लागले आहेत.

पत्रकार म्हणून मिरवून घेणा-या मंडळींची तुडूंब भाऊगर्दी पाहता त्यात खरे किती आणि बांडगुळे किती याचे संशोधन हाच पीएचडी चा विषय ठरु शकतो. प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यात सोशल मिडीयाची भर पडली आहे. “आमच्याच लेखणीला सत्याची धार” अशा बोंबा ठोकणारे “गावगन्ना पासरी पचास” गल्ली बोळात हिंडताहेत. तलवारी, कु-हाडी, भाजी चिरण्याचे विळे-कोयते , मटण कापणारे सत्तू अशा अवजारांना धार असते असे ऐकीवात होते. “आता आमच्या सत्यालाही धार आणि इतरांचे सत्य बोथट” असे ओरडणा-यांच्या गावगन्ना टोळ्यांचा सामाजिक उपद्रव वाढणार तर नाही ना? असा सवाल केला जात आहे. जो उठतो तो “संपादक” बनू पहात आहे. पत्रकार म्हणून मिरवू बघतोय.

दुचाकी चारचाकी वाहनांवर “प्रेस” असे लालभडक रंगात रंगवून वाट्टेल तो धुमाकुळ घालता येतो असे काही लोकांना वाटते. त्यामुळेच पत्रकारीतेत गुन्हेगार तर शिरले नाही ना? असाही रास्त संशय व्यक्त होवू लागला आहे. त्यामुळेच खरे पत्रकार आणि मुखवटा चढवलेले अशी शिरपूरच्या यात्रेची गर्दी जमली आहे. त्यातच आणखी भर घातली आहे ती दैनिक “सकाळ” च्या बाळ बोठे नामक पत्रकाराने.

पत्रकारिता क्षेत्रात बरेच विक्रम, पीएचडी पदवी अनेक पुस्तकांचे लेखन अशी विद्वत्ता – सन्मान मिळवणा-या या बाळासाहेब बोठे यांचे नाव अहमदनगरच्या सामाजिक कार्यकर्ता रेखा जरे यांच्या हत्याकांडाच्या माध्यमातून पुढे आले. या हत्याकांडात सुपारी देवून हत्या घडवणारा मुख्य सुत्रधार अशी त्यांची छवी पुढे आली. या घटनेमुळे पत्रकारीता क्षेत्रात नेमक्या कोणत्या प्रवृत्तींचा धुडगुस दिसतो त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

भ्रष्टाचार करणार-यांचे बुरखे फाडले, त्यांचे हितसंबंध दुखावले म्हणजे पत्रकारांवर खंडणीखोरीचा आरोप सर्रास होतोच. त्याचाच पहिला बळी म्हणजे खानदेशातील पत्रकार प्रमोद ब-हाटे यांचे विरुद्ध दाखल झालेला खंडणीचा गुन्हा. एका रेती व्यावसायीकाने हा आरोप केला. पाटबंधारे टेंडर प्रकरणात देखील असेच आर्थिक शोषण केल्याचा दुसरा आरोप लावण्यात आला. वाळू प्रकरणाच्या बातम्यांचा धडाका लावल्याने ब-हाटे यांच्या सारख्या पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रकार घडला.

यानंतर या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात गाजले ते खान्देशचे आणखी एक पत्रकार विवेक ठाकरे. रावेर तालुक्यातील निंभोरा या लहानशा गावातील एक वार्ताहर अशी सुरुवात करुन ग्रामपंचायतीत सरपंच पदापर्यंत पल्ला गाठल्यावर स्वारी जळगावात दाखल झाली. मराठवाड्यातील नांदेड येथील दैनिकाची आवृत्ती, नंतर देशाधार वृत्तपत्र काही काळ चालवून खान्देशात सध्या गाजत असलेल्या पतपेढी ठेवीदारांच्या प्रश्नात उडी घेणारा तरुण जळगाव ते पुणे बीएचआर मल्टीस्टेट पतपेढीच्या “ठेव पावती” घोटाळ्यात लिक्विडेटरसोबत हातमिळवणी कर्ता झाल्याचा आरोप आहे. “The Maharashtra protection of interest of depositors in financial establishments Act 1999” या कायद्यासाठी लढणारा त्याच कायद्याने आरोपी ठरवण्याचा खेळ चालू दिसतो. 

राज्यपातळीवर “सामना” चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे परखड अग्रलेख गाजत आहेत. अलिकडेच त्यांनी फेकूचंद पडळकर म्हणून दणकावले. एखाद्याच्या आरोपाचा तंगडीतोड समाचार कसा घ्यायचा ते संजय राऊतांच्या लेखनीतून दिसते. शंभर वर्षापुर्वी पुण्यातील लोकमान्य टिळकांच्या केसरीने तत्कालीन राज्यकर्त्यांना ठणकावले गेले. नंतर पन्नास वर्षांनी आचार्य अत्रे यांनी दिल्लीश्वरांना असेच ठोकून संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालवला. नंतर निळकंठ खाडीलकर, तरुण भारतचे ग.त्र्य. माडखोलकर, ग.वा.बेहेरे, पु.भा.भावे वैचारीक लेखनातून गाजले आहेत. आता वैचारिक युद्धाची जागा स्वार्थांधतेने घेतल्याचे दिसते.

पत्रकारीतेत बाजारबुणग्यांचा धुमाकुळ सुरु झाल्याने जे म्हटले जाते ते चित्र भयावह आहे. नवे वर्ष 2021 नवी आशा निर्माण करो!

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार) 8805667750

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here