राजकारण्यांचा बाहेरख्यालीपणा आणि सामाजीक नितीमत्ता

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बाहेरख्यालीपणामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पहिले प्रकरण रा.कॉ.चे धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत आहे. त्यांच्याविरुद्ध एका तरुणीने बलात्काराचा जाहीरपणे आरोप करत राजकारण्यांकडून मदतीची जाहीर याचना केल्याने वादंग माजले. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रामाणीकपणे आरोपकर्त्या महिलेसोबत त्यांचे “लिव्ह इन” चे नाते मान्य करत त्यांनी दोन अपत्ये असल्याचे देखील मान्य केले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य थोडे निवळले. नंतर नेहमीप्रमाणे “लिया दिया”ची पडद्याआड काहीतरी सौदेबाजी करत “प्रकरण” मार्गी लागले. त्यामुळे मंत्री महोदयांच्या मानगुटीवरचे गुलाबी भानगडीचे ओझे खाली उतरल्याचे दिसले.

त्यानंतर काहीच आठवड्यात पुण्यातील वानवाडी भागात कुणा पुजा चव्हाण नामक तरुणीने कथीत आत्महत्या केल्याचे प्रकरण पुढे आले. या प्रकरणात शिवसेना मंत्र्याच्या आवाजाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली. सुशांतसिंह राजपूत या सिने अभिनेत्याच्या गुढ मृत्यू प्रमाणेच हे प्रकरण देखील आत्महत्या की खून? अशा वळणाने पुढे सरकले. राज्यात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या “तीन चाकी रिक्षा” म्हणून हिणवल्या गेलेल्या सरकारमधील शिवसेना मंत्र्यांचा कथीत संबंध जाहीर होताच भाजपाने त्या मंत्र्याच्या राजीनाम्याचा रेटा लावून धरला. विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंध जोडला जाताच शिवसेनेचे वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे वनमंत्री संजय राठोड हे गायब झाले. त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल झाले. राज्यमंत्रीमंडळातील एक मंत्री चक्क आठवडाभर पळून गेल्याचा संदेश जनतेत जावून पोचला. राज्याचे गृहखातेही त्यांचा ठावठिकाणा सांगू शकले नाही. इतकेच काय राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीतही संबंधीत मंत्रीमहोदय गैरहजर राहिल्याचे उघड झाले.

आता या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. तथापी असल्या बदफैलीपणाची चौकशी किती कि.मी. खोलीपर्यंत करणार? असा ओघाने दुसरा प्रश्न येतोच. या प्रकरणात पिडीत तरुणीला न्याय मिळावा म्हणून काही राजकारण्यांनी उर बडवला तर शिवसेनेच्या एका आमदाराने कथीत आरोपीत मंत्र्याच्या समर्थनार्थ मोर्चाही काढला. महिलांच्या प्रश्नावर आंदोलने करणा-या तृप्ती देसाईंनी सीबीआय चौकशीची मागणी करत हा बॉल केंद्राच्या अख्त्यारीत टोलवला.

शिवसेना  मंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधीत या प्रकरणात वृत्तपत्रे व समाजमाध्यमातून जे विचारमंथन झाले त्याच्याशी साधर्म्य दर्शवणारा एक हिंदी चित्रपट येवून गेला आहे. सुमारे विस वर्षापुर्वी उत्तर भारतातील मध्यप्रदेश सारख्या राज्यात एक मंत्री एका साहित्यिक तथा कवयित्रीच्या प्रेमात आकंठ बुडतो. अगदी मंत्रालयातील अ‍ॅंटीचेंबरमधे दोघांचे प्रेमचाळे फुलतात. तिचाही गुढ मृत्यू होतो. त्याचवेळी तिच्या फ्लॅट मधे सर्व प्रथम जाणा-या पोलिस अधिका-याला कुणा राजकारण्याचा आवाज धमकावतो की “सभी कॅसेट्स – सबुत कब्जे मे करलो….वगैरे डायलॉग  आहेच. तो चित्रपट होता. पण सध्याच्या जिवनात लोकांना शुद्ध चारित्र्याचे राजकारणी हवे असतात. फार पुर्वी राजेशाहीत राजे लोकांना शेकडो राण्या असत. जनानखाने ऐकीवात आहेत. गर्भश्रीमंत जमीनदारांच्या “रखेल्या” तत्कालीन लोकांनी स्विकारल्या. श्रीमंत धनदांडग्यांना विरोध करण्याचे सामर्थ्य तेव्हाही नव्हते आणि आजही दिसत नाही. मध्यमवर्गीय आणि त्या खालच्या आर्थिक वर्गाचे विरुद्ध टोक असलेल्या हाय सोसायटी गर्भश्रीमंत, धनदांडग्यांनी त्यांच्या पैशाच्या जोरावर बाहेरख्यालीपणा – बदफैलीपणा करण्याचा अलिखीत नियम दिसतो.

अलीकडे समाजसेवेचे क्षेत्र दर्शवून राजकारणात शिरलेली काही हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी अल्पसंख्येची मंडळी राजकारणात जातात. प्रचंड पैसा कमावतात, रखेल्या ठेवतात. वापरुन झाल्यावर फेकून देतात किंवा त्यांचे बेमालूम मुडदे पाडतात. पुरावे नष्ट करतात आणी शर्टावरील मल झटकावा तसे पुन्हा हात जोडून समाजसेवेची संधी मागतात या प्रकाराला काय म्हणावे?

वरील प्रकरणातील कथीत मंत्री म्हणे 14 दिवसानंतर त्यांच्या आराध्य दैवताच्या धर्मपीठापुढे हजर होणार आहे. पीडीतेचे कुटूंबीय देखील येतील किंवा येणार नाहीत. दोन्ही ही एकाच समाजाचे कथीत धर्मपीठे, कुणाची आराध्य दैवते असतील तर त्यास कुणाचा विरोध नसावा. कोणताही देव – देवी सन्मानाने मनाच्या गाभा-यात ठेवा पण देशात घटनादत्त कायद्याचे राज्य आहे याचे भान निदान राज्यकर्त्यांनी ठेवलेच पाहिजे. बदफैलीपणा किंवा गुन्हा करणा-याचा निर्णय नैतीक, धार्मीक की कायद्याच्या मुशीतून करावा यावर राजकारणी काय म्हणतात यापेक्षा 17 कोटी लोकसंखेच्या महाराष्ट्र समाजमनाकडून निर्णय अपेक्षीत आहे.

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार जळगाव) 8805667750   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here