मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार टीकेचे धनी झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई क्राईम ब्रॅंचमधे मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचे काम सुरु आहे. मुंबई क्राईम ब्रॅंचमधे नुकत्याच 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमवेत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती पुढे येत आहे. 86 पोलिस निरिक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उप निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्यानंतर दुस-या फेरीतील बदल्यांची चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या फेरीत आयपीएस, डीसीपी, अॅडीशनल सीपी, जॉईंट सीपी यांच्या जबाबदारीत देखील फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणी चौकशीत अडकलेले सीआययु युनीटचे स.पोनि. रियाजुद्दीन काझी यांची सशस्त्र पोलिस दलात तर स.पो.नि. प्रकाश होवाळ यांची मलबार हिल पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.