नथीतून तीर मारण्याचे राजकारण आणि अर्धसत्याची लढाई

निलंबीत स.पो.नि.सचिन वाझे यांच्या माध्यमातुन दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला. या आरोपानंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. या आरोपामुळे उठलेले वादळ महाविकास आघाडी सरकारचा गळा घोटणारच अशा तऱ्हेने काही सुपारीबाज माध्यम विश्लेषकांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अर्थात सारेच खोटे बोलतात असेही नाही. कदाचित उपलब्ध संधी आणि घरातीलच वृत्तपत्र यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “सामना” दैनिकातून गृहमंत्रीपद सांभाळणारे रा.कॉ.चे अनिल देशमुख यांना ज्या पद्धतीने उपदेशाचे “डोंगरे बालामृता”चे डोस पाजण्याची मर्दुमकी दाखवली, तीच मर्दुमकी त्यांनी सचिन वाझे म्हणजे “ओसामा बिन लादेन आहे का?” असे सुनावणा-यांना तेव्हाच असला जालीम डोस पाजून दाखवली असती तर अधिक बरे झाले असते असे भाजपच्या गोटातून उघडपणे बोलले जात आहे.

“सामना” दैनिकाच्या कार्यकारी संपादक पदावर राहून शिवसेनेच्या राजकीय भुमिकेची अग्रलेखातून मांडणी करण्यासह विरोधकांना फटकेबाजी करत जोरदार चिखलफेक केल्याबद्दलही राऊत यांना टीकेचे धनी व्हावे लागते. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर गृहमंत्र्यांवर शंभर कोटींच्या वसुली टार्गेटचा आरोप करणारे परमबीर सिंग यांनी कोणत्या मोठ्या हस्तीच्या संरक्षणाखाली हिंमत केली? त्यांनाही उघडे पाडण्याची जबाबदारी आता राज्याच्या पोलिस महासंचालकांनी पार पाडायला हवी असे म्हटले जात आहे.

स.पो.नि. दर्जाच्या सचिन वाझे यांना क्राइम ब्रॅंच मध्ये अमर्याद अधिकार देण्यात आले होते. याप्रकरणी गृहमंत्र्यांना जबाबदार धरण्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या सर्वोच्च अधिकाराच्या जबाबदारीचे काय? असा प्रश्न का विचारला जात नाही? काहीच महिन्यापूर्वी राज्याच्या गृहखात्याने बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या “माय पॉवर” अधिकारात रद्द केल्या होत्या. म्हणजेच मुख्यमंत्र्यांची रीतसर मंजुरीची मोहर लागत नाही तोपर्यंत कोणतीही बदली – बढती – निर्णय असलेली फाईल क्लिअर होत नाही हे उघड आहे. खरे तर एका एन्काऊंटर प्रकरणात निलंबित वाझे यांचे शिवसेनेत सक्रिय होणे, सता काळात पोलीस दलात पुनरागमन होणे, क्राइम ब्रॅंच मध्ये मोठे अधिकार मिळवणे या बाबी आजवर परमबीर सिंग यांना दिसल्या नाहीत का? ते त्यांच्या पदाचा वापर करून वाझे यांना इतरत्र पाठवू शकत नव्हते का? मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या गुंडांचा शार्प शूटर म्हणून एन्काऊंटर केल्याबद्दल प्रसिद्धीस आलेल्या वाझे यांच्या याच प्रतिमेचा आपल्या पक्षाच्या आर्थिक बाळसेदार वाढीसाठी उपयोग करून घेण्याची कुणाची काय नेपथ्य रचना होती? भाजपचे सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ज्यांच्याकडे वाझे यांचे “सत्तेत बसलेले मालक” म्हणून उल्लेख करत होते ते मालक कोण? शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून ज्या एकनाथराव खडसे यांच्या भाजपातील राजकीय कोंडीबद्दल गळा काढला जातो त्याचा मतितार्थ काय? अंबानी यांचे ॲन्टीलिया स्फोटक प्रकरण, वाझे प्रकरणाची आग आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच दिवसेंदिवस सशक्त होत चाललेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार करण्यासाठीच तर “परमबीर” अस्त्राचा वापर करण्यात आला नाही ना? कंगना रणौतने सिनेसृष्टीतील ड्रग्ज वापराबद्दल आणि त्या सुमारे दोन – पाच हजार कोटी च्या कथित व्यापाराला संरक्षण देणारे म्हणून तापवलेल्या हवेवर ज्यांच्याकडे अंगुलीनिर्देशाची शक्यता दिसली त्यांच्या बचावासाठी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांकडे धाव घेऊन शिष्टाई कुणी केली ते अद्याप महाराष्ट्र विसरला नाही.

दगडा खाली हात अडकल्यावर सारेच नरमतात. विरोधकांसोबत संवादाचे सेतू बांधतात, कार्यभाग साधतात. नव्या “बिग – डील” च्या दिशेने निघतात. हा खेळ महाराष्ट्राला नवा नाही. सध्याच्या गृहमंत्र्यांवर 100 कोटींचा आरोप करणारे वाझे प्रकरण असो की संजय राऊत यांचे “रोखठोक” किंवा शरद पवार – पटेल – अमित शहा कथित अहमदाबाद गुप्त भेट. या सा-या प्रकरणातून कुरघोडीचे, परस्परांमध्ये आगपेटीच्या जळत्या काड्या टाकून फाटाफूट करण्याचे, कालच्या दुश्मनांसोबत पुन्हा दोस्ती करण्याचे, नथीतून तीर मारण्याचे राजकारण दिसते. त्यासाठी अर्धसत्याची लढाई जुंपलेली दिसते. गृहमंत्री देशमुखांवर वार करताना राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस पक्षाच्या टेकूवरच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचा डोलारा उभा आहे हे संजय राऊत विसरले का? रा.कॉ. नेते व अमित शहा यांच्या कथित गाठीभेटीचे वृत्त येताच राऊत यांनी सहकारी राजकीय पक्षांना “आसमान मे उडने वाले पंछीयो – जमीन को देखा करो”चा इशारा का द्यावा?

सत्तेची सारीच खिर एकट्याला “ओरपता” येत नाही म्हणून “भाड मे जाये दुनियादारी – आज से अच्छी है तेरी मेरी यारी” म्हणत पुन्हा नव्या पंगतीत जेवणाची ताटे कुणाकुणाला आजच आरक्षित करुन ठेवायची आहेत? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ कुणाला हवी आहे? शिवसेना नेते संजय राऊत जर यूपीएच्या अध्यक्षपदाची सुत्रे शरद पवार यांना देण्याची मागणी करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये दरी निर्माण करु पहात असतील तर हा त्यांच्या भाजपकडे परतीचा अजेंडा तर नव्हे? रा.कॉ. गृहमंत्र्यांवर शंभर कोटीचा खंडणीचा कथित आरोप हा त्या पक्षावर नथीतून तीर मारण्याची खेळी कुणाची? हे न समजण्याइतके राजकीय अभ्यासक आणि नेते दुधखुळे नाहीत.

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार जळगाव – पुणे)

8805667750

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here