शरद पवारांचे मौन – वादळापूर्वीची शांतता?

एखाद्या रहस्यमय चित्रपटात मुख्य कथानका सोबत उपकथानकाची जोड स्टोरी दाखवली जाते. त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात गत फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकयुक्त बेवारस कार आढळणे, त्या  कार मालकाचा (मनसुख हिरेन) मित्र सचिन वाझे असणे, हिरेन यांचा खून,  मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उचलबांगडी नंतर त्यांनी कथीत हायप्रोफाईल  पाठिंब्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांवर शंभर कोटी दरमहा वसुलीबाबत सचिन वाझेंना दिलेल्या टार्गेटची मेन स्टोरी गाजत होती.

देशमुख गृहमंत्रीपदावर असताना त्यांनी एटीएसला तपासाचे आदेश दिले. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या की हत्या? अशा गाजलेल्या गदारोळात सिने अभिनेत्री कंगना रणौतने फिल्म इंडस्ट्रीतील ड्र्ग्ज रॅकेट व त्यातून होणारी सुमारे तीन ते पाच हजार कोटीची उलाढाल आणि यामागे ड्रग्ज माफियांना संरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेत्यांवर शरसंधान केल्याचे महाराष्ट्राला स्मरत असेलच. दरम्यान अ‍ॅन्टेलीया जिलेटिन स्फोटक कांडाच्या तपासात केंद्रीय तपास यंत्रणा म्हणून एनआयए, सीबीआय यांची झालेली एन्ट्री, आधीपासूनच ठाण मांडून असलेली “नारकोटिक्स ब्यूरो” आणि सोबतीला येऊ घातलेली “ईडी” या गदारोळात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि केवळ त्यांनाच रिपोर्टिंग करणारा सचिन वाझे या दोघांच्या लेटर बॉम्बने खळबळ उडवली नसती तर नवलच घडले नसते.

याच प्रकरणात शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे माजी एन्कांऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची एंट्री,  वाझे याने खंडणी वसुली प्रकरणात शिवसेना मंत्री अनिल परब यांना लपेटण्याचा केलेला प्रयत्न इथपर्यंतचा घटनाक्रम महाराष्ट्राने पाहिला आहे.  उद्योगपती अंबानी यांच्या बंगल्यापुढे स्फोटके का ठेवावी? त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न का व्हावा? वाझे यांचा मास्टरमाईंड कोण? त्यांना अंबानी यांच्याकडून किती हजार कोटींची खंडणी हवी होती? शिवसेना नेतृत्वाचे सरकार आल्यापासून कोणा कोणा नेत्याने दरमहा शेकडो कोटीच्या हप्ता वसुलीसाठी कुणाकुणाची नियुक्ती कशी केली? कोणी किती कमाई केली? मलाईदार पदावरुन उचलबांगडी करताच परमबीर सिंग यांची थेट गृहमंत्र्यांवर आरोप करण्याची हिम्मत कशी झाली? होमगार्ड महासंचालक पदावर पाठवलेले परमबीर सिंग आणि तसल्याच अडगळीच्या पदावर साईड पोस्टींगला टाकलेले संजय पांडे या दोघांनी स्वेच्छानिवृत्तीचा इरादा जाहीर केल्याच्या बातम्या झळकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वजनदार गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याकामी भाजपने लावलेली ताकद आणि त्याकामी शिवसेनेच्या पंखाखाली वापरलेल्यांनी केलेली पोषक वातावरण निर्मिती ही कोणाच्या बचावासाठी होती? यावर आधी आवाज उठवणाऱ्या भाजपने रा.कॉ.च्या दिशेने मोर्चा वळवला. परिणामी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घडून आला. आता ते सीबीआय चौकशीला तोंड देत आहेत.

 म्हणजेच महाराष्ट्रातील तीन राजकीय पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे “हप्ता वसुली” सरकार असल्याचा विरोधकांनी मारलेला शिक्का घेऊन आता व्हिलनच्या भूमिकेत जाऊन पोचल्यावर देखील महाराष्ट्राचे “महाभ्रष्टाचारी सरकार” असा भाजप आघाडीचा मारा होत असताना राज्यकारभार हाकण्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसणा-यांनी  “कोरोना” वादळाचा लाभ घेत “क्वारंटाईन” राहून केंद्राच्या मुख्यमंत्री परिषदेत जवळपास “यस सर” पालुपद आवळून महाराष्ट्रातील कोरोना आपत्ती राष्ट्रीय संकट घोषित करण्याची केलेली मागणी ही शेकडो हजारो कोटी रुपये केंद्राकडून अपेक्षा करण्यात आल्याने आता पत्ते खुले झाले आहेत.

 राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्भवलेल्या विचित्र कोंडीत देखील रा.कॉ.चे चाणक्य शरद पवार यांनी ज्या चतुराईने शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यासोबत त्यांच्या तरुण पुत्राला देखील मंत्रीपदाची बक्षिसी बहाल केली. त्याचे कौतुकाचे नऊ दिवस केव्हाच संपले आहेत. विरोधात बसण्यापेक्षा सत्तेत बसलो यात काँग्रेस समाधान पावली. परंतु सत्ता शिल्पकाराच्या भूमिकेत असलेली रा.कॉ. यांच्यावरच “वाघ” पंजा उगारु लागल्यामुळे आता या सत्तेवर बसलेल्या वाघाचाच ऑडिटेड हिशेब का करु नये? अशा विचारापर्यंत काही नेते आल्याचे सांगितले जाते.

राज्य सरकारची आजवर कोंडी होत असताना रा.कॉ. नेते शरद पवार मदतीस धावून गेले होते. अगदी मातोश्रीवर सुद्धा गेलेत. परंतु आता मात्र ते शांत बसून आहेत. त्यांच्या प्रकृतीची अडचण आहेच. दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. परंतु “हे सरकार केव्हा पाडायचे ते माझ्यावर सोपवा” एवढे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगूनही ते मौन पाळून आहेत. महाभारतातही राज्यकारभार आंधळ्या धृतराष्ट्रच्या नावाने तेव्हाचे पदाधिकारी करत होतेच. सिंहासनावर बसवलेला राजा जेव्हा आता मीच राज्यकारभार माझ्या मर्जीप्रमाणे हाकणार अशा विचारापर्यंत येतो तेव्हा काय होते याचे महाभारत उत्तम उदाहरण ठरावे.

राजे – महाराजे, मांडलिक राजे, सरदार, सैन्य, सेनापती असे हजारो लाखोचे संख्याबळ एखाद्या निशस्त्र श्रीकृष्णापुढे व्यर्थ ठरते. आता काळ खुपच पुढे आला आहे. आता कर्ण नाही. सिंहासनाचा दास भिष्म नाही, अर्जुन तर नाहीच नाही. भक्तीभावाच्या तराजूत श्रीकृष्णाला तोलणारी रुक्मिणी नाही. आता अब्जावधी रुपयांच्या डोंगरांच्या डोळे दिपवणा-या राशी दाखवून देऊन घेऊन कुणीही कोणताही सौदा करु शकतो असे अनेकांना वाटू लागले आहे.  कलियुगात उपकाराची फेड अपकाराने कुणी करु पहात असेल तर त्यांचे बुडते तारु का वाचवावे? हा विचार प्रबळ ठरतो. राज्य सरकार बाबत तेच होताना दिसते. भाजपवाले म्हणतात आम्ही सरकार पडणार नाही, त्यांच्या कर्माने ते घरी जातील. बहुदा आता रा.कॉ. नेते शरद पवार हे देखील दुसऱ्या “पुलोद” प्रयोगाला कंटाळले असावेत. बहुदा सरकारसाठी साथ दिली की खंडणीखोरीला? “चोरांच्या उलट्या बोंबा” अशीही म्हण सांगतात. त्यामुळे त्यांच्या मौनात भावी चक्रीवादळाची ताकद दिसते. सध्या कोरोना काळात कुणालाच निवडणुका नकोत. 2 मे नंतर हवा बदलेल.  पावसाळी ढगासोबत राष्ट्रपती राजवटीचे काळे ढगही गडगडाट करतील. पश्चिम बंगाल, पाच राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोना महामारी संपेल. शंभर कोटी ऐवजी शंभर टक्के सत्ता मिळण्याची खात्री झाली तर दिवाळीच्या आसपास निवडणुकीचा धमाका होऊ शकतो. ते ही न करता गोवा, पुदुचेरी, कर्नाटक, मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रावर दिल्लीचे शिकारी जाळे फेकतील. शेवटी लोकशाही आहे. हा खेळ देखील पाहूया!

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव) 880 566 77 50

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here