कोरोनाच कोरोना चोहीकडे ! जळगावचे आमदार गेले कुणीकडे!!

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार माजलाय. अर्थात त्याची झळ जळगाव जिल्ह्यालादेखील बसली आहे. जळगावचे वैद्यकीय विश्व ढवळल गेलय. सिव्हील हॉस्पीटल (कोविड) कोरोना रुग्णांनी “ओव्हरफ्लो” केव्हाच झाले आहे. जळगाव जिल्ह्याचा जिव गुदमरु लागला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढला तसा कोरोना रुग्णांचा जिव वाचवण्याचा जिवघेणा संघर्ष वाढला. दुस-या आठवड्यात अंतिम टप्प्यात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर मिळणे अवघड झाले. त्यामुळे अवघा महाराष्ट्र होरपळला. त्याच दरम्यान म्हणजे 12 एप्रिल रोजी भाजपा राज्यभरात पन्नास हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करुन देणार अशी घोषणा झाली. भाजपाच्या काही नेत्यांनी दमण येथे धाव घेऊन रेमडेसीवीर उत्पादक कंपनी मालकाची भेट घेऊन तसे आश्वासन मिळवले. त्यांच्याकडे 50 हजार रेमडेसीवीरचा साठा असल्याची खळबळजनक बातमी मिळाल्यामुळे पोलिसांनी ब्रुकफार्मा कंपनीच्या मालकांना अटक केली. त्यांच्या बचावासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, प्रविण दरेकर आदी मंडळी पोलिस स्टेशनला धाऊन गेली. त्या वादात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार वादाची ठिणगी पडली.

हा वाद गाजू लागला असतांनाच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघात मागच्या पंचवार्षिक अपक्ष निवडणूक लढवून तेव्हा जिंकलेले नंदुरबार कार्यक्षेत्रातले शिरीष चौधरी यांनी म्हणे नंदुरबारात आणी अमळनेरात अत्यल्प म्हणजे केवळ 550 रुपयांना रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. लोकांनी रांग लाऊन ते घेतले. या प्रकाराची तक्रार अमळनेरचे रा.कॉ.आमदार अनिल पाटील यांनी सरकारकडे केली. तशीच तक्रार खासदार हिना गावित यांनी जिल्हाधिका-यांविरुद्ध केल्यानेया वादाच्या आगीत नवेच तेल ओतले गेले. अखेर भडका उडालाच.

नंदुरबारच्या कर्मभुमीत एखादा शिरीष चौधरी यांच्या सारखा माजी आमदार अवघ्या 550 रुपयात गरजेच्या वेळी जनतेला रेमडेसीवीर देत असतांना आमचा जळगावचा आमदार सुरेश उर्फ राजुमामा भोळे कुठे गर्दीत हरवला तर नाही ना? या अशंकेने लाखो मतदारबांधव घायाळ झाले. ते चौधरी बंधू नंदुरबारच्या कर्मभुमीतून खानदेशात पुर्वेकडे अमळनेरात कोरोना रुग्णांची सक्रीय सेवा करतात मग आमचे हक्काचे आमदार काय करतात? अशा प्रश्नाने जळगाव शहर मतदार संघातील जनतेचे डोके भणाणले नाही तर नवलच! राजकीय क्षेत्रात वावरणारी आमदार – खासदार (आजी – माजी) नेतेमंडळी जनसेवेसाठी तत्पर असल्याचे दाखऊन आपल्या अस्तित्वासह सेवादायी सेवाभावाचा परिचय देण्यास विसरत नाहीत.

जळगाव येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता, मणियार बिरादरी, इकरा, रोटरी क्लब, लोकसंघर्ष मोर्चा संघटनेच्या प्रतिभा शिंदे यांच्या सारख्या अनेकांनी गेल्यावर्षी आणी यंदाही कोविड – कोरोना उपचार केंद्रे अशी सेवा उपलब्ध करुन दिली आहे. या मंडळींची आर्थिक ताकद आमदारांच्या ताकदीपुढे शुन्य आहे. तरीदेखील ही मंडळींची गरजू रुग्णांसाठी धान्य- औषधे- रुग्णसेवेच्या तळमळीची धावपळ निश्चीतच वाखाणण्यासारखी आहे. ही छोटी माणसं एवढ मोठ काम करत असतांना शहराचे आमदार काय करतात? तिकडे भाजपाच्या मंडळींनी राज्य सरकारच्या आरोग्य सेवा यंत्रणेला शिंगावर घेतले असतांना जळगावात काय घडतय हे देखील पाहणे आवश्यक ठरते.

मध्यंतरी या आमदार महोदयांनी रुग्णसेवेसाठी नव्हे तर धनसंपत्ती मिळवण्यासाठी एका विरोधी पक्षातल्या नेत्यासोबत साठगाठ करुन हॉस्पीटल काढल्याचे सांगतात. अर्थात पैसे कमवण्याचा नवा उद्योग. तसे मद्यविक्रीची घाऊक एजन्सी, हॉटेलींग क्षेत्रासह अनेक मद्य विक्री क्षेत्रात सक्रीय सहभागाबद्दल त्यांच्याकडे अंगुली निर्देश केला जातो. मध्यंतरी तर विरोधकांनी त्यांच्यावर “दारुवाल्यांचे आमदार” अशी कुटील शेरेबाजी केल्याचे अनेकांना स्मरत असेल. समाजजीवनात वावरणा-या प्रत्येकाचे आवडीचे क्षेत्र असते. तसे त्यांचेही असावे. काही वर्षापुर्वी कॉंग्रेसअतर्फे डॉ. अर्जुन भंगाळे विधानसभा निवडणूकीत असतांना नातेवाईक सुरेशभाऊंनी (राजुमामांनी) भाजपातले तेव्हाचे पद सोडले होते. त्यानंतरच कॉग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता. या त्यांच्या नैतिकतेबद्दल अनेकांनी दादही दिली होती. परंतू ती देखील त्यांच्या स्वार्थाची खेळी असल्याची टीका देखील झालीच. शेवटी जनतेच्या सेवेचे काय? असा प्रश्न विचारला जाणारच! तसा तो आजदेखील विचारला जात आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हजारो नातेवाईकांनी आपल्या अडचणीच्यावेळी आमदार महोदयांची आठवण काढण्यात गैर ते काय? परंतु या आमदार भोळे साहेबांनी रुग्णसेवेऐवजी ट्विटरवरुन “मुख्यमंत्री कसा असावा त्याचा पर्रीकरांकडून आदर्श घ्यावा” असा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाच हितोपदेश करणारा  फुकटचा (फुकाचा) सल्ला दिला आहे. “मनोहर पर्रीकर प्रकृती ठिक नसतांना ऑक्सीजन सुरु असतांना काम करत असल्याचा फोटो शेअर करत घरी बसून प्रकृती सांभाळणारा मुख्यमंत्री जनतेला नको असतो. शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा समाजसेवी मुख्यमंत्री पर्रीकर”  अशा प्रकारची टीका देखील त्यांनी केल्याचे शिवसेनेसह शेकडो जणांना ही टीका चांगलीच झोंबली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांची पत्नी व मुलगा कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट येऊनदेखील मुख्यमंत्री ठाकरे अहोरात्रपणे कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ते यांना दिसत नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.

एकीकडे वाझे – परमबीर सिंग यांचे वादग्रस्त अ‍ॅन्टेलीया, शंभर कोटी, हिरेन हत्या प्रकरण शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत येऊन ठेपल्याची विरोधकांनी घरापर्यंत पोहोचवलेली आग हाताळण्यासोबत पंधरा कोटींच्या महाराष्ट्राचे जिवरक्षण करतांना महाराष्ट्राशी सापत्नभावाने वागणारे, केंद्र सरकारची एनआयए, एटीएस, सीबीआय, ईडी यांना शिंगावर घेण्याची ताकद ठेऊन असलेले मुख्यमंत्री कोरोना, रुग्णांचे बेड, ऑक्सीजन, रेमडेसिवीर यासाठी झुंज देत आहेत. जनतेचे जिव वाचवण्यासाठी सेवाभावी वृत्तीने घरच्या दोनचार बिल्डींग, शेतीवाडी, दुकाने, विकून प्रसंगी कामे करावी लागतात. जामनेरचे गिरीषभाऊ पहा साधे आमदार असतांना पासून थेट मुंबई पर्यंत जामनेर मतदार संघातल्या गरजूंना आरोग्य सेवा देताहेत. महाआरोग्य शिबीरे घेताहेत. लोकच जाहीरपणे याची चर्चा करतांना दिसतात. नाण्याच्या दोन बाजू असतातच. काही नाणी खणखणीत वाजतात तर काही बद्धड आवाज करतात. त्यात आपल्या लोकप्रतिनिधीचा आवाज कोणता? जरा जनतेला ठरवू द्या की!

subhash-wagh

सुभाष वाघ (जेष्ठ पत्रकार – जळगाव)

8805667750   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here