चारचाकीसह 7 लाखाच्या लुटीतील दुसरा आरोपी अटक

जळगाव : साखरेच्या व्यापा-याची वसुली करुन घरी परत जाणा-या कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुट करणा-या दुस-या फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास भोपाळ येथून अटक केली आहे. तुकाराम दिनकर पाटील रा. सामनेर ता. पाचोरा (हल्ली मुक्काम बरखळा पठाणी भोपाळ मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दिपक साहेबराव चव्हाण सामनेर ता. पाचोरा हल्ली मुक्काम गिरड ता. भडगाव यास 14 मार्च 2021 रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

7 मार्च 2021 च्या मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास वावडदा ते म्हसावद दरम्यान सदर रस्तालुटीची घटना घडली होती. कारसह रोकड अशी एकुण 12 लाख 50 हजार रुपयांची लुट केल्याप्रकरणी सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.

नाना नथु पाटील (51) हे मारुती स्विफ्ट कारचे (एमएच-02 इआर 5382) चालक एरंडोल येथील रहिवासी आहेत. एरंडोल येथील साखरेचे व्यापारी मनोज गोकुळदास मानुधने आणि कारचालक नाना पाटील एकमेकांचे परिचीत आहेत. मानुधने यांच्या सांगण्याप्रमाणे नाना पाटील हे शेंदुर्णी, सोयगाव, गोडेगाव, उडणगाव, सिल्लोड येथील व्यापा-यांकडील उधारी वसुल करण्यासाठी कारने गेले होते. विविध गावच्या व्यापा-यांकडील साखरेच्या मालाची 7 लाख 90 हजार रुपयांची वसुली केल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले होते. रविवारी मध्यरात्री वावडदा आणी म्हसावद गावाच्या दरम्यान सव्वा वाजेच्य सुमारास त्यांच्या ताब्यातील कारला ओव्हरटेक करत एक कार पुढे गेली. ओव्हरटेक करणा-या कारचालकाने नाना पाटील यांच्या कारच्या पुढे त्याच्या ताब्यातील कार आडवी लावली. त्यामुळे नाना पाटील यांना नाईलाजाने कार उभी करावी लागली.

कारमधून उतरलेल्या चार इसमांपैकी दोघांनी कारचालक नाना पाटील यांना दरवाजा उघडून खाली ओढले. त्यांना खाली पाडून एक इसम त्यांच्या छातीवर व एक त्यांच्या पायावर बसला. इतर दोन इसम पुन्हा कारमधे गेले. छातीवर व पायावर बसलेल्या दोघा इसमांनी नाना पाटील यांच्या ताब्यातील कार घेवून पसार झाले. या घटनेनंतर कारचालक नाना पाटील यांना काहीही समजेनासे झाले.त्यांनी आपल्या नातेवाईकांसह साखरेचे व्यापारी मानुधने यांच्या कानावर सर्व प्रकार घातला. कुणाकडून किती रोकड वसुल केली होती. त्याची जुळवाजुळव केल्यानंतर कारसह लुटून नेलेल्या रोकडप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेतील तुकाराम पाटील यास न्या. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 16 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अमोल मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत. आरोपीस भोपाळ येथून अटक करण्याकामी पोलिस नाईक गणेश शिरसाळे, मुकेश पाटील व हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले. आरोपी गुजरात व पंजाब राज्यात पोलिसांना गुंगारा देत फिरत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here