औरंगाबाद : प्रसुतीच्या चोवीस तासानंतर मातेने तिच्या बाळाला सोडून घाटी येथून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिन दिवसापुर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनला त्या मातेविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 ऑगस्ट रोजी सदर मातेने घाटीच्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता. 30 ऑगस्ट रोजी तिने दवाखान्यातून अचानक पलायन करत बाळाला बेवारस सोडून दिले. रुग्ण महिलेने दवाखान्यातून पलायन केल्याने रुग्णालय प्रशासन खळबळून जागे झाले होते.
या प्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनला त्या मातेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. घाटीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण सुखदेवे यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या मातेचा शोध सुरु आहे.







