जळगाव – कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसतांना चाळीसगाव शहरात जल्लोषात काढण्यात आलेल्या भव्य स्वागत रॅलीत सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न लावण्याप्रकरणी खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सुमारे पाच हजार नागरीकांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बड्यांसह नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.
जळगाव नजीक महामार्गालगत असलेल्या उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गणपती विसर्जनाच्या वेळी देखील असाच कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार घडला होता. मंत्री महोदय छगन भुजबळ यांच्या जळगाव दौ-यात देखील असाच गर्दीचा प्रकार घडला होता. या दोन्ही घटनेप्रकरणी संबंधीतांवर अद्याप कारवाई झालेली नाही. या दोन्ही घटनेप्रकरणी देखील पोलिस प्रशासनाने रितसर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. या स्वागत रॅलीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाचे पुर्णपणे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न लावणे आदी कारणावरुन खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह तब्बल पाच हजार नागरीकांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.







