जळगाव : धुळे येथून पसार झालेल्या प्रेमीयुगलास अमळनेर रेल्वे स्टेशनवर आरपीएफच्या सतर्कतेने अटकाव करण्यात आला. हे प्रेमीयुगल रेल्वेने सुरतला पळून जाण्याच्या बेतात होते. आपली मुलगी बेपत्ता झाल्यामुळे प्रेमीसोबत पळून जाणा-या आईने धसका घेतला होता. अवघ्या दोनशे रुपयांच्या बळावर प्रेमी युगल सुरतला पळून जात होते. ताब्यातील प्रेमी युगलास रविवारी दुपारी त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
अमळनेर रेल्वे स्टेशनवर रविवारच्या दिवशी हे प्रेमी युगल बसले असतांना त्यांची हालचाल गस्तीवरील आरपीएफचे सहायक पोलिस निरीक्षक कुलभूषणसिंग चौहान, कॉन्स्टेबल सुभाष कुमार, कॉन्स्टेबल नीलम बैरागी यांना संशयास्पद वाटले. चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्या बघून आपण धुळे येथील असल्याचे सांगत पळून आल्याचे दोघांनी कबुल केले. आरपीएफ पथकाने धुळे पोलिसांसोबत संपर्क साधला असता तरुणी बेपत्ता असल्याची माहिती दिली. बेपत्ता तरुणीच्या पालकांना धुळे पोलिस स्टेशनला बोलावून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ओळख पटवण्यात आली. तरुण व तरुणीच्या पालकांना बोलावून ओळख पटवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.







