जळगाव : व्याजाची रक्कम परत केली नाही म्हणून चौघांनी रिक्षा चालकाच्या ताब्यातील रिक्षा हिसकावून त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. उल्हास अरुण जंजाळकर असे मालवाहू रिक्षा चालकाचे नाव असून राज पवार, आकाश पवार, दत्तु कोळी आणि योगेश बडगुजर असे अटक करण्यात आलेल्या चोघांची नावे आहेत.
उल्हास जंजाळकर या रिक्षा चालकाने आकाश कुंभार याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते परत केले नाही म्हणून आकाश कुंभार व त्याचे साथीदार राज पवार, दत्तु कोळी आणि योगेश बडगुजर अशा चौघांनी 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एकलव्य क्रिडा संकुल रस्त्यावर त्याला गाठले. त्याला चौघांनी मिळून शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेत उल्हास जंजाळकर याच्या पायाला दुखापत झाली. याशिवाय उल्हास जंजाळकर याच्या ताब्यातील चार लाख रुपये किमतीचे मालवाहू पिकअप वाहन चौघांनी बळजबरी हिसकावून नेले.
त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता शिव कॉलनी भागातील शंभर फुटी रस्त्यावर उल्हास जंजाळकर व त्याच्या मित्राला मारहाण व शिवीगाळ करत जीवे ठार करण्याची धमकी दिली. तसेच उल्हास जंजाळकर याच्या ताब्यातील वाहनाला दगड मारला. या घटनेत वाहनाची पुढील काच फुटून नुकसान झाले. उल्हास जंजाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला जबरी चोरीसह सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.