जळगाव : एमपीडीए कायद्या अंतर्गत राजेश ऊर्फ दादु एकनाथ निकुंभ (धोबी) रा. पारधीवाडा सुभाष चौक, अमळनेर जि.जळगाव यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अॅक्ट, दुखापत असे एकुण अकरा गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
राजेश निकुंभ यास वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर लागलीच भारतीय दंड विधान आणि मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत सराईतपणे गुन्हे करत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत तो त्याच्या साथीदारांसह घातक शस्त्रे बाळगून लोकांवर दहशत व भिती निर्माण करत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती.
दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याच्या विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम सन 1981 नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई आवश्यक होती. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्याविरुध्द चौकशी पूर्ण करुन 20 डिसेंबर 2022 रोजी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षकांनी तो जिल्हाधिक-यांकडे पाठवला होता.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडील आदेशानुसार राजेश ऊर्फ दादु एकनाथ निकुंभ (धोबी) याच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, अमळनेर पो.स्टे.प्रभारी विजय शिंदे आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या संयुक्त पथकातील पोलीस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील, पोना किशोर पाटील, पोना सिध्दार्थ शिसोदे, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे आदींनी त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.