जळगाव : चोरीच्या ऐकून सोळा बक-या खरेदी करुन त्या विक्री करणा-यास 84 हजार रुपयांसह मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. हुसेन समशुभाई खाटीक असे त्याचे नाव आहे. मात्र बक-या चोरी करणारा फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. एकुण सोळा बक-या चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांबाबत मेहुणबारे पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. 53 हजार आणि 89 हजार रुपये किमतीच्या या बक-या होत्या.
या गुन्हयातील बकऱ्या चोरी करणा-या मुख्य आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आले. या बक-या चोरीच्या असल्याचे माहिती असून देखील त्या कमी किमतीत खरेदी करुन त्या 84 हजार रुपयात विक्री केल्याची कबुली अटकेतील हुसेन खाटीक याने दिली आहे. मेहुणबारे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रविण दातरे यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ. गोकूळ सोनवणे, पोहेकॉ सचिन निकम, शांताराम पवार, पोकॉ विनोद बेलदार आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पशुधनाच्या चो-या टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांनी दक्षता बाळगण्यासह कुणाला काही माहिती असल्यास देण्याचे आवाहन मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.