जळगाव : रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहनचालकांची लुट करणा-या दोघांना यावल पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. समशेर शहा सलीम शहा आणि त्याचा साथीदार समीर रहेमान तडवी (दोघे रा. यावल) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापैकी समशेर शहा हा सराईत गुन्हेगार आहे.
दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास रोहित प्रकाश रल हा चालक त्याच्या ताब्यातील पिक अप वाहनाने रावेर ते चोपडा दरम्यान माल वाहतुक करत होता. त्यावेळी यावल येथील बुरुज चौक परिसरात समशेर शहा आणि त्याचा साथीदार समीर रहेमान तडवी या दोघांनी रोहीत रल याचे वाहन अडवले होते. त्याच्या वाहनातील रोख पाच हजार रुपये आणि कागदपत्रांची पिशवी चापटा बुक्क्यांनी मारहाण करत हिसकावून घेतली होती. या घटनेप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजी.नं. 342/2025, भारतीय न्याय संहीता कलम 309(4),309 (6),3 (5) अन्वये जबरी चोरीचा 309(6) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार विजय पाचपोळे, पोहेकॉ वासुदेव मराठे, पोहेकॉ निलेश चौधरी, पोना अमित तडवी, पोकॉ अर्षद गवळी, पोकॉ ऐजाज गवळी, पोकॉ अनिल साळुंखे, पोकॉ सागर कोळी आदींनी या गुन्ह्यातील समशेर शहा आणि समीर तडवी या दोघा गुन्हेगारांची नावे निष्पन्न केली. समशेर शहा यास जळगाव येथील गेंदालाल मिल मधून तसेच समीर तडवी यास यावल येथून शिताफीने अटक करण्यात आली. त्यांच्या कब्जातून त्यांनी चोरी केलेले पाच हजार रुपये हस्तगत करण्यात आले. समशेर शहा सलीम शहा हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला चोरीचे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला जबरी चोरी, घरफोडी, विनयभंग, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत.







