जळगाव : दारु पिण्याच्या कारणावरुन पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तिची कु-हाडीने हत्या करणा-यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुवरसिंग चतरसिंग पावरा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मेहुणबारे पोलिस स्टेशनला गु.र.न. 59/2022 भा.द.वि. 302 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्या. एस. एन. राजुरकार यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी आपले सहकारी कमलेश राजपूत यांच्या मदतीने हा तपास पुर्ण केला होता.
आरोपी कुवरसिंग पावरा याने त्याची पत्नी निनुबाई पावरा हिची दारु पिण्याच्या कारणावरुन कु-हाडीने हत्या केली होती. या खटल्यात एकुण 26 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. भा.द.वि. 302 अन्वये आरोपी कुवरसिंग यास जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. हे.कॉ. हिरालाल पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून तसेच सरकारी अभियोक्ता एस.जी. काबरा यांनी सरकार पक्षाच्या वतीने या खटल्याचे कामकाज पाहिले.







