दोघा भावंडांच्या मनात उसळली संतापाची लाट!! — धारदार चॉपरच्या घावात ज्ञानेश्वर झाला भुईसपाट 

On: October 15, 2025 8:28 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): “निंदकाचे घर असावे शेजारी” असे म्हटले जाते. घराशेजारी अथवा गल्लीत निंदकाचे घर असावे, मात्र भांडखोर आणि त्रास देणा-याचे घर शेजारी नसावे. निंदा करणा-याचे घर शेजारी अथवा गल्लीत असले म्हणजे मनुष्याला आपल्या चुका समजतात. मात्र भांडखोर व्यक्तीचे घर शेजारी असले म्हणजे मनुष्याची आणि त्याच्या परिवाराची मन:शांती कमी होते आणि दोन परिवारात कटूता निर्माण होते. मोठमोठ्या शहरात फ्लॅट मधे शेजारी कोण राहतात हे माहिती असले अथवा नसले तरी त्यांच्यात सहसा कोणतेही वाद होत नाहीत. याचे कारण म्हणजे  मोठ्या शहरात प्रत्येक जण आपल्या कामात गर्क असतो. मनुष्याचा बहुतांश वेळ हा कामाने व्यापलेला असतो. त्यामुळे वाद अथवा भांडण तंटा हा विषय फ्लॅट अथवा अपार्टमेंट मधील रहिवाशांमधे जवळपास नसतो. मात्र संमिश्र अथवा श्रमीक लोकवस्तीमधे शेजारी अथवा गल्लीत राहणा-या काही कुटूंबामधे किरकोळ वाद होत असतात. प्रत्येक गावात अशा प्रकारच्या लोकवस्तीत किरकोळ वाद ठरलेले असतात. कित्येकदा चाळीत राहणा-या महिलांमधे सामायिक नळावरील नंबरवरुन होणारे वाद ठरलेले असतात. मात्र हे वाद क्षणिक असतात. काही वाद उग्र स्वरुप धारण करतात. जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात रोजचे किरकोळ वाद, शिवीगाळ, मिळणारी धमकी, नेहमी दाखवली जाणारी दांडगाई या त्रासाला वैतागून दोघा भावंडांकडून एका तरुणाच्या खूनाचा प्रकार घडला.

जळगाव शहरातील कासमवाडी हा परिसर संमिश्र आणि श्रमिक लोकवस्तीचा परिसर समजला जातो. या भागात मजूर, विक्रेते, कष्टकरी नोकरदार या प्रकारात मोडणारा समाज वास्तव्याला आहे. या भागात जयेश पाटील आणि योगेश पाटील ही भावंडे आपल्या परिवारासह रहात होती. जळगाव शहराच्या सुभाष चौकातील बाजारात भाजीपाला विक्री करणे हा या दोघा भावंडाचा व्यवसाय होता. दररोज सकाळी बाजार समितीच्या लिलावातून भाजीपाला विकत घ्यायचा आणि तो किरकोळ स्वरुपात बाजारात विक्री करणे हा जयेश आणि योगेश या दोघा भावंडांचा व्यवसाय होता. 

जयेश आणि योगेश हे दोघे भाऊ रहात असलेल्या घरासमोरच ज्ञानेश्वर पाटील हा तरुण आपल्या परिवारासह रहात होता. जयेश आणि योगेश तसेच ज्ञानेश्वर पाटील हे अमोरासमोर राहणारे एकमेकांचे नातेवाईक होते. मात्र दोघांच्या परिवारात नेहमी काही ना काही कारणावरुन वाद ठरलेले होते. कधी महिला महिलांमधे वाद होत तर कधी पुरुषांमधे तर कधी लहान मुलांमधे काहीतरी कारणावरुन वाद होत असत. अंगणात टाकलेले सांडपाणी अंगावर उडाले म्हणून वाद, अंगणात वाहन लावल्याने अडथळा झाला म्हणून वाद, गटारीच्या पाण्यावरुन वाद अशा स्वरुपाच्या लहान सहान कारणावरुन दोघा परिवारात वाद ठरलेले होते. दोघे परिवार एकमेकांच्या अमोरासमोर रहात होते. त्यामुळे पाटील परिवारामधे होणारे वाद नित्याचे झाले होते.

ज्ञानेश्वर हा अंगकाठीने मजबुत होता. याउलट जयेश आणि योगेश हे दोघे भाऊ अंगकाठीने नाजुक होते. जयेश आणि योगेश हे दोघे भाऊ विस ते बाविस वयोगटातील अगदी कोवळ्या वयाची मुले होती. ज्ञानेश्वर हा अंगकाठीने मजबुत असल्याने व त्याच्या अंगी रग असल्यामुळे तो जयेश आणि योगेश या दोघा भावांवर नेहमी रुबाब करत होता. फक्त रुबाबच नव्हे तर तो त्यांना चार चौघात अश्लिल शिवीगाळ देखील करत होता. त्यामुळे या दोघा भावांच्या मनात ज्ञानेश्वरबद्दल राग होता. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या दोघा पाटील कुटूंबातील वाद आणि त्या वादाची धुसफुस काही केल्या शमत नव्हती. त्यात ज्ञानेश्वर हा नेहमीच दांडगाई करत होता. कोवळ्या वयाची जयेश आणि योगेश ही दोघे भावंडे त्याची दांडगाई सहन करत होते.

योगेशच्या बालपणापासून ज्ञानेश्वर त्याचा अपमान करत होता. गेल्या वर्षी सन 2024 मधे योगेशचा विवाह झाला. कासमवाडी येथील राहत्या घरासमोरच मंडप टाकून योगेशचा विवाह संपन्न झाला होता. ज्ञानेश्वर हा विवाहीत योगेशचा त्याच्या पत्नीसमोर देखील अपमान करत होता. आपल्या पत्नीसमोर ज्ञानेश्वरकडून होणारा अपमान योगेशच्या जिव्हारी लागत होता. तो योगेशला प्रसंगी घाणेरडी शिवीगाळ करत होता. आपल्या वहिणीसमोर आपल्या भावाचा ज्ञानेश्वरकडून होणारा अपमान जयेशला देखील आवडत नव्हता. दोघे भाऊ अंगकाठीने सडपातळ आणि कोवळ्या वयाचे असल्याचा ज्ञानेश्वर हा जणूकाही गैरफायदा घेत होता. त्यात त्याला मोठा आनंद मिळत होता.

बालपणापासून ज्ञानेश्वरकडून होणा-या अपमानाची धग योगेशच्या मनात पेटली होती. आता ती धग वणव्याच्या रुपात मोठी झाली होती. अपमानाच्या आगीचा मनात पेटलेला वणवा शांत करण्याचा योगेश विचार करत होता. दिवसेंदिवस त्याच्या मनातील बदल्याच्या भावनेचा विचार त्याला शांत बसू देत नव्हता. ज्ञानेश्वरचा बदला घेण्यासाठी योगेशच्या मनात सुडाची योजना आकार घेत होती.

एके दिवशी त्याने एका अ‍ॅपवरुन ऑनलाईन चॉपर बुक केला. किचनमधे वापरली जाणारी सुरी देखील ऑनलाईन मागवण्याची सुविधा आज उपलब्ध झाली आहे. घरात वापरली जाणारी सुरी अथवा चाकू हा आयटम वरवर घरगुती स्वरुपाचा दिसत असला तरी घातक शस्त्र म्हणून देखील वापरले गेले आहेत. घातक शस्त्र कुरीअरने मागवले जाण्याचे प्रकार कमी अधिक प्रमाणात वाढले आहेत. तलवारी देखील कुरिअरने मागवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहेत. गुन्हेगारी वृत्तीचे लोक असे घातक शस्त्र घरगुती वापराच्या नावाखाली ऑनलाईन मागवत असल्याचे दिसून येते. चॉपर ऑनलाईन मागवण्याच्या विचाराने कोवळ्या वयातील योगेशच्या मनात आकार  घेतला. त्याने एका अ‍ॅपवरुन तो बुक केला. त्या चॉपरचे पार्सल घेण्यासाठी तो संबंधीत कुरिअर कार्यालयात स्वत: गेला. अवघ्या साडे पाचशे रुपयात त्याने त्या चॉपरचे पार्सल सोडवले. ताब्यात घेतलेला चॉपर त्याने घरातील बेडच्या खाली लपवून ठेवला.

योगेशचा भाऊ जयेश याने देखील ज्ञानेश्वरला संपवण्याचा विचार मनाशी केला होता. त्याने देखील योगेशच्या नकळत भंगार बाजारातून स्वस्तात एक चॉपर विकत घेतला होता. भंगार बाजारातून विकत घेतलेला चॉपर जयेशने तो वापरत असलेल्या स्कुटीच्या डिक्कीत लपवून ठेवला होता. अशा प्रकारे योगेश आणी जयेश हे दोघे भाऊ एकाच विचाराने आणि धैय्याने प्रेरीत  होऊन कामाला लागले होते. ज्ञानेश्वरला संपवणे हे दोघांचे मिशन बनले होते. याचे दुसरे कारण म्हणजे ज्ञानेश्वरपासून आपल्या जीवीताला धोका पोहोचू शकतो याची दोघांच्या मनात एक अनामिक भिती देखील होती. दोघा भावांना ज्ञानेश्वरकडून होणारी शिवीगाळ आणि होणारा अपमान हा नेहमीचा भाग झाला होता.

रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करुन वाईट वृत्तीवर विजय मिळवण्यासाठी दसरा हा सण साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर 2025 हा दसरा सणाचा दिवस उजाडला. या दिवशी ज्ञानेश्वरच्या रुपातील रावणाचा जयेश आणि योगेश या दोघा भावांच्या हातून अंत होण्याचे नियतीने लिहून ठेवले होते. या दिवशी नेहमीप्रमाणे योगेश बाजार समितीमधे लिलावात भाजीपाला विकत घेण्यासाठी गेला. मात्र या दिवशी बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी आला नव्हता. त्यामुळे योगेशला रिकाम्या हाती परत यावे लागले. या दिवशी दोघे भाऊ घरीच होते.  रात्री दहा वाजता योगेश हा परिसरातील दुर्गा मंडळाजवळ उभा होता. त्यावेळी त्याच्याजवळ ज्ञानेश्वर भिकन पाटील हा आला. आल्या आल्या त्याने योगेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ सोबतच त्याने योगेशला जीवे ठार करण्याची धमकी  दिली.

दसरा हा सणाचा दिवस असतांना ज्ञानेश्वरकडून झालेली शिवीगाळ आणि धमकी ऐकून योगेशच्या मनाला दुख: झाले. तो संतापाच्या भरात घरी आला. उसळलेल्या समुद्राच्या लाटेप्रमाणे त्याच्या मनात संतापाची लाट उसळून आली. घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार भाऊ जयेशला कथन केला. बोलता बोलता त्याने बेडखाली लपवून ठेवलेला ऑनलाईन मागवलेला चॉपर बाहेर काढला. तो चॉपर स्कुटीच्या डिक्कीत ठेवत असतांना त्याला त्याठिकाणी अगोदरच एक चॉपर असल्याचे आढळून आले. तो चॉपर जयेशने भंगार बाजारातून विकत आणला होता. हा चॉपर कुणाचा आहे अशी योगेशने जयेशला विचारणा केली. त्यावर जयेशने योगेशला म्हटले की तुला काय करायचे तु फक्त चौकात चल आज ज्ञानेश्वरला सोडायचे नाही.

दोन्ही चॉपर स्कुटीच्या डिक्कीत ठेवल्यानंतर दोघे भाऊ स्कुटीने दुर्गा देवी स्थापन झालेल्या मंडळानजीक चौकात आले. त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. योगेश आणि जयेश हे दोघे भाऊ चौकात स्कुटीजवळ उभे असतांना पलीकडून ज्ञानेश्वर आला. आल्या आल्या त्याने दोघा भावांना बघून शिवीगाळ सुरु केली. आज दस-याच्या रात्री रावणरुपी ज्ञानेश्वरचा खात्मा करायचा असे मनाशी निश्चित करुनच दोघे भाऊ चौकात आले होते. त्याचीच वाट बघणा-या दोघा भावांच्या दिशेने ज्ञानेश्वर दुर्दैवाने आला. त्याने शिवीगाळ केल्याने दोघा भावांच्या मनातील संतापाची लाट अजूनच उसळली. ज्ञानेश्वरला काही कळण्याच्या आत दोघा भावांनी स्कुटीच्या डिक्कीतून आपापले चॉपर बाहेर काढले. योगेशने ज्ञानेश्वरच्या पोटावर चॉपरने जीवघेणा हल्ला केला. जयेशने ज्ञानेश्वरच्या मांडीवर हल्ला केला. पोटावर आणि मांडीवर प्राणघातक हल्ला झाल्याने ज्ञानेश्वरला पळणे कठीण झाले. अनपेक्षीतपणे झालेल्या हल्ल्यात ज्ञानेश्वर रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. या घटनेच्या वेळी तेथून आपल्या पत्नीसह घरी जात असलेले जखमी ज्ञानेश्वरचे नातेवाईक शालिक सुधाकर पाटील यांनी दोघा हल्लेखोर भावांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. उपस्थित जमावातील काही जणांसह शालिक पाटील यांनी जखमी ज्ञानेश्वरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले.

या खूनी हल्ल्याची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ, हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गणेश शिरसाळे, पो.कॉ. राहुल पाटील आदींनी घटनास्थळ व रुग्णालय गाठले. मयत ज्ञानेश्वरच्या नातेवाईकांसह मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

संतापाच्या भरात ज्ञानेश्वरला जखमी केल्यानंतर योगेश घरी पळून गेला. त्याने त्याचे कपडे आणि चॉपर घरातील कोठीमधे लपवले. अंगावरील कपडे बदलून तो अजिंठा चौकात गेला. तेथून एका धावत्या वाहनाला हात दाखवून त्याने ते थांबवले. त्या वाहनात बसून त्याने नशिराबाद गाठले. नशिराबाद येथील एका हॉटेलवर योगेश बसून राहीला. दरम्यान एलसीबी पथकाने फरार योगेशचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत त्याला नशिराबाद येथून ताब्यात घेतले.  

दरम्यानच्या कालावधीत स्कुटीने पळून गेलेल्या जयेशने भुसावळ गाठले. रक्ताने माखलेले हत्यार स्कुटीच्या डिक्कीत ठेवून जयेशने ती स्कुटी भुसावळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभी केली आणि रेल्वेने नाशिक गाठले. नाशिकला गेल्यानंतर त्याने त्याच्या एका नातेवाईकासोबत संपर्क साधला. मात्र त्या जवळचय नातेवाईकाने त्याला भेटण्यास आणि पुन्हा फोन लावण्यास नकार दिला. जवळच्या नातेवाईकाकडून मदत न मिळाल्याने हताश झालेला जयेश पाटील 3 ऑक्टोबर रोजी सकाळी रेल्वेने भुसावळला परत आला. भुसावळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसणा-या लोकांकडून त्याने कपडे घेतले आणि ते परिधान केले. गुन्हा करतांना वापरलेले कपडे जयेशने स्कुटीच्या डिक्कीत ठेवून दिले. 

भुसावळ शहरात जयेशचे कुणी ओळखीचे नव्हते आणि त्याला अजून पळून जाण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे मिळेल त्या पैशात स्कुटी विक्री करण्याचे त्याने ठरवले. त्यामुळे तो स्कुटीने जळगावच्या अजिंठा चौकात आला. त्याठिकाणी एका झाडाखाली त्याने स्कुटी उभी केली. स्कुटीवर फिरल्यास स्कुटीचा क्रमांक बघून पोलिस आपल्याला पकडून घेतील या विचाराने त्याने स्कुटीची चावी फुट मॅटखाली लपवून ठेवली आणि विचार करु लागला. स्कुटीचा कुणी खरेदीदार मिळाला तर त्याला स्कुटीची चावी फुट मॅटखाली असल्याचे सांगून मिळालेले पैसे घेऊन पळून जाण्याचे त्याने मनाशी ठरवले होते. मात्र त्याचवेळी त्याच्या मागावर असलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला तांत्रीक तपासाच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यामुळे त्याचे पळून जाण्याचे नियोजन फसले. ताब्यातील जयेशला एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणले गेले.

ज्ञानेश्वर पाटील याच्या खून प्रकरणी शालिक सुधाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला जयेश पाटील आणि योगेश पाटील या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.न. 706/2025 भारतीय न्याय संहिता 103, 352, 351(2), 305 प्रमाणे हा गुन्हा नोंद करण्यात आला. जयेश आणि योगेश या दोघा भावांना अटक करण्यात आली. संशयीत आरोपीच्या पिंज-यात असलेले दोघे भावंड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ करत आहेत. त्यांना हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गणेश शिरसाळे, पो.कॉ. राहुल पाटील आदींचे सहकार्य लाभत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment