जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : ही दुनिया श्वासावर चालत नसून विश्वासावर चालत असते. श्वासापेक्षा विश्वासाला अधिक महत्व असते. ही दुनिया पावलांवर चालत नसून प्रेमावर चालत असते. प्रेम आणि विश्वास बळकट असल्यास या जगाचा आणि पती – पत्नीचा संसार गुण्या गोविंदाने चालत राहतो. पती पत्नीत कमी अधिक प्रमाणात मतभेद होत असतात. मात्र ते क्षणिक असावेत. प्रेम आणि विश्वासाची कमतरता असल्यास पती पत्नीच्या नात्यात कटूता निर्माण होते. जळगाव तालुक्यातील निमखेडी या गावी पतीने पत्नीची विट आणि विळ्याच्या मदतीने हल्ला करुन हत्या केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली. या घटनेत पती पत्नीतील प्रेम आणि विश्वास या दोन घटकांचा अभाव दिसून आला. मात्र या अभावामुळे झालेल्या अप्रिय घटनेत पती जेलमधे तर पत्नी देवाघरी गेली. त्यामुळे तीन मुलांचे मातृ पितृछत्र हिरावले गेले. या घटनेबाबत प्राप्त माहीतीच्या आधारे सविस्तर वृत्त.

दिपाली आणि नितीन हे दोघे पती पत्नी होते. दोघांचा विवाहसोहळा सन 2016 मधे संपन्न झाला होता. या विवाहाच्या माध्यमातून ठाकरे आणि सोनवणे हे दोन परिवार एकत्र आले. जळगाव तालुक्यातील कानळदा येथील ठाकरे परिवाराची कन्या दिपाली ही यावल तालुक्यातील शिरसाड येथील सोनवणे परिवारात सून म्हणून नांदण्यास आली. पुर्वाश्रमीची दिपाली ठाकरे विवाहानंतर दिपाली सोनवणे झाली. लग्नानंतर साधारण तिन वर्षांनी दिपाली आणि नितीन हे दाम्पत्य जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे राहण्यास आले. मोलमजुरी करुन नितीन आपला संसाराचा गाडा ओढत होता. बघता बघता दोघांच्या संसार वेलीवर दोन पुत्र आणी एक कन्या अशा तीन रत्नांचे आगमन झाले.

सुरुवातीच्या काळात दिपाली आणि नितीन या दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरु होता. मात्र काही वर्षातच नितीनला दिपालीच्या चारित्र्यावर संशय येण्यास सुरुवात झाली. तिचे कुणातरी पर पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा नितीन यास संशय येण्यास सुरुवात झाली. त्यातून दोघा पती पत्नीत वादाची ठिणगी पडू लागली. या वादाचा परिणाम असा झाला की एके दिवशी ती तिच्या लहान मुलास सोबत घेऊन अचानक माहेरी निघून गेली. घरात कुणाला काही न सांगता माहेरी निघून आलेली दिपाली तेथून देखील कुणाला न सांगता अजून कुठेतरी निघून गेली. त्यामुळे इकडे तिचा पती नितीन आणी तिकडे तिचे माहेरचे सदस्य हवालदिल झाले. त्यामुळे तिच्या माहेरच्या सदस्यांनी ती बेपत्ता झाल्याबाबत जळगाव तालुका पोलिस स्टेशनला मिसींग दाखल केली. त्यानंतर साधारण एक महिन्याने ती स्वत:हून जळगाव तालुका पोलिस स्टेशनला हजर झाली. आपण शिर्डी येथे गेल्याचे तिने पोलिसांना, माहेरच्या लोकांना आणि पती नितीन यास कथन केले.

तिच्या अशा वागण्याचा आणी अचानक बेपत्ता होण्याचा नितीनला राग आला. त्यामुळे तीला घरी घेऊन जाण्यास त्याने नकार दिला. तिच्या अशा विचीत्र वागण्याचा तिच्या माहेरच्या सदस्यांना देखील राग आला. त्यांनी देखील तिला माहेरी नेण्यास नकार दिला. त्यामुळे ती तिच्या मोठ्या बहिणीच्या घराजवळच भाड्याच्या खोलीत लहान मुलाला सोबत घेऊन राहू लागली. त्यानंतर तीने दोनवेळा आपले मुक्कामाचे ठिकाण बदलले. जवळपास एक वर्षापासून ती पतीशिवाय एकटी विभक्त रहात होती.

पत्नी दिपालीचे कुणाशी तरी नक्कीच प्रेम संबंध असावे असा नितीनला दाट संशय येऊ लागला. त्यामुळे तो तिची माहिती घेऊ लागला. नात्यातील एका तरुणासोबत तीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण नितीनला लागली. आपल्या प्रेमसंबंधाची कुणकुण पती नितीनला लागल्याचे दिपालीस समजले. त्यामुळे आपली चुक मान्य करत तीने त्याच्यासोबत पुन्हा संसार करण्याची तयारी दर्शवली. झाले गेले विसरुन आपल्या तिघा मुलांचा विचार करत त्याने तिला संसार करण्यास व परत येण्यास होकार दिला.

काही दिवस दिपाली त्याच्यासोबत व्यवस्थित वागली. मात्र पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्याचा पाढा सुरु झाला. घरात कुणाला काही न सांगता ती अचानक कुठेतरी निघून गेली. पंधरा दिवसांनी ती घरी परत आली. त्यानंतर काही महिने ती व्यवस्थित राहिली. पुन्हा एके दिवशी ती अचानक कुठेतरी निघून गेली. हैरान झालेल्या नितीनने तिचा शोध घेतला. मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. ती अचानक निघून जाते व अचानक घरी परत येते हा प्रकार नितीनला जवळपास अंगवळणी पडला होता. त्यामुळे त्याने यावेळी तिचा शोध घेतला नाही. तसेच ती बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिस स्टेशनला मिसींग सुद्धा दाखल केली नाही.

एके दिवशी नितीनला त्याची पत्नी दिपाली एका नातेवाईक तरुणासोबत दुचाकीवर डबलसीट जातांना दिसली. एमआयडीसी परिसरात त्याने तिचा आणि त्या तरुणाचा पाठलाग सुरु केला. दिपालीचा पती नितीन आपला पाठलाग करत असल्याचे बघून तो तरुण तिला तेथेच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र हाती आलेल्या दिपालीस त्याने जागेवरच चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. घटनास्थळी जमलेल्या काही महिलांनी तिची सोडवा सोडव केली. दिपालीस नितीन सोबत जावू दिल्यास तो तिला अजून मारहाण करु शकतो अशी शक्यता गृहीत धरुन त्या महिलांनी तिला त्याच्यासोबत जावू दिले नाही. अशा प्रकारे दिपालीच्या चारित्र्याविषयी नितीनच्या मनात शंका निर्माण झाली होती.

दिपाली व तो नातेवाईक तरुण हे दोघे जळगाव शहरात सोबत रहात असल्याची माहिती नितीनला एका नातेवाईकाच्या माध्यमातून समजली. त्या माहितीची खात्री करण्यासाठी नितीन त्या ठिकाणी गेला. मात्र नितीन आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच तो तरुण यावेळी देखील तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र दिपाली त्याच्या हाती लागली. त्यामुळे तो तिला घेऊन जळगाव तालुका पोलिस स्टेशनला आला. माझी पत्नी माझ्यासोबत रहात नाही, माझ्यासोबत संसार करत नाही. त्यामुळे मला तिच्यापासून घटस्फोट हवा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. घटस्फोटासाठी न्यायालयात जावे लागेल असे त्याला पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र मी यापुढे असे वागणार नाही असे म्हणत ती नितीनसोबत घरी येण्यास तयार झाली. आपल्या तिन मुलांचा विचार करत नितीनने तिला निमखेडी येथे घरी आणले.




आपल्या तिन मुलांचा विचार करत नितीनने दिपालीसोबत नव्याने संसार सुरु केला. मात्र ती त्या तरुणासोबत काढलेले फोटो सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ठेवत असल्याचे नितीनला समजले. त्याचा नितीनला राग आला. एके दिवशी मध्यरात्री नितीनला अचानक जाग आली. त्यावेळी तो तरुण घराचा दरवाजा उघडून दिपालीला भेटण्यास येत असल्याचे नितीनच्या नजरेस पडला. नितीनने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. नितीनने त्याच्या दिशेने विट फेकून मारली. मात्र यावेळी देखील तो मोटार सायकलने पळून जाण्यात यशस्वी झाला.


दिपाली आपल्यासोबत रहात असली तरी अद्यापही तिचे मन त्या तरुणात गुंतले असल्याचे नितीनच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याच्या मनात दिपालीविषयी चिड होती. दिनांक 19 मार्च रोजी सकाळी याच विषयावरुन दोघा पती पत्नीत सकाळी वादाची ठिणगी पडली. हा वाद त्यावेळी तात्पुरत्या स्वरुपात कसाबसा मिटला. दुपारी पुन्हा दोघात याच कारणावरुन वादाला सुरुवात झाली. केवळ आपल्या तिघा मुलांच्या भवितव्याचा विचार करुन नितीन तिच्यासोबत संसार करण्यास तयार होता. मात्र दिपालीच्या वागण्यात त्याला बदल दिसून येत नव्हता.


दिनांक 19 मार्चच्या सकाळपासूनच नितीन आणि दिपाली यांच्यात वादाला सुरुवात झाली. या दिवशी दोघातील वाद काही केल्या शमण्याची चिन्हे दिसत नव्हती. दिपाली व त्या तरुणाच्या प्रेमसंबंधाचा संशय नितीनला स्वस्थ बसू देत नव्हता. दुपारी तिन वाजता वाद झाल्यानंतर दिपाली झोपी गेली. दिपाली झोपली असली तरी नितीन अस्वस्थ होता. भर दुपारी साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान नितीन मनातून अशांत होता. मनातून अशांत आणि अस्वस्थ नितीनने सिमेंटची वीट हातात घेतली. त्याने पत्नी दिपालीचे तोंड दाबून तिच्या डोक्यात सिमेंटच्या विटेचा जोरदार हल्ला केला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तिची हालचाल मंदावली. ती मरण पावल्याचे समजून तो घरुन थेट जळगाव तालुका पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यासाठी निघाला. घराबाहेर पडल्यानंतर त्याला त्याच्या मोबाईलची आठवण झाली. मोबाईल घरीच विसरल्याची त्याला जाणीव झाली. मोबाईल घेण्यासाठी तो पुन्हा घरी गेला. घरी गेल्यावर दिपाली काही प्रमाणात हालचाल करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याचा संताप पुन्हा उफाळून आला. त्यामुळे घरात पडलेला विळा उचलून त्याने तिच्या गळ्यावर आणि पोटात प्राणघातक हल्ला केला. आता दिपालीची हालचाल कायमची बंद झाली होती.
त्यानंतर मोबाईल ताब्यात घेत त्याने तडक जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठले. आपण आपल्या पत्नीचा खून केल्याचे त्याने कर्तव्यावरील पोलिसांना कथन केले. या घटनेची माहिती समजताच उपस्थित पोलिस देखील काही वेळासाठी अवाक झाले. पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी लागलीच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी भयावह चित्र सर्वांना दिसून आले. दिपाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या डोक्यावर, गळ्यावर आणि पोटावर हल्ला झालेला होता. तिच्या डोक्यावर सिमेंटच्या विटेचा तसेच पोटावर आणी गळ्यावर विळ्याचा हल्ला झाल्याचे दिसून आले. दिपालीच्या मृतदेहाच्या जवळच एक लोखंडी विळा आणि दोन सिमेंटच्या विटांचे तुकडे पडलेले होते. पोलिस अंमलदार धनराज पाटील यांनी या घटनेची माहिती मयत दिपालीचा भाऊ जयेश ठाकरे याला फोनद्वारे दिली. माहिती मिळताच मयत दिपालीचा भाऊ जयेश ठाकरे याने काही नातेवाईकांसह निमखेडी येथील घटनास्थळ असलेले दिपालीचे घर गाठले. घटनास्थळावरील कायदेशीर सोपस्कार आटोपल्यानंतर दिपालीचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी दिपालीस मयत घोषित केले. त्यानंतर जयेश पांडुरंग ठाकरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला नितीन कोळी (सोनवणे) याच्याविरुद्ध पत्नी दिपालीचा चारित्र्यावर संशय घेत खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे, हे.कॉ. प्रदीप राजपूत, धनराज पाटील गुलाब माळी, पोलिस नाईक कैलास इंगळे, ज्ञानेश्वर कोळी, विजय निकम, पो.कॉ. प्रशांत पाटील व गणेश पाटील आदी पुढील तपास करत आहेत.






