लग्नाचा झाला खेळ, बसला नाही संसाराचा मेळ —- विवाहीत राजेशने विहिरीत गाठला मृत्युचा तळ 

On: May 29, 2026 8:36 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) :  कधी कधी एखादा गुन्हा रक्ताने नाही, तर शब्दांनी घडतो… जखमा शरीरावर नसतात, पण मनाच्या आत खोलवर कोरल्या जातात. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात घडलेली घटना अशाच अदृश्य जखमांची भयावह कथा सांगून जाते. लग्नाच्या अवघ्या पंधरा दिवसांत एका नवविवाहित तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला आणि संपूर्ण परिसर हादरुन गेला. ज्या घरात पंधरा दिवसापुर्वी सनईचे सुर ऐकू येत होते त्याच घरात आक्रोश ऐकायला मिळाला. प्रेम, विश्वास, फसवणूक, मानसिक छळ आणि आत्महत्येच्या प्रवासाची ही कथा समाजाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडते. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजासाठी देखील एक गंभीर इशारा आहे. “मानसिक छळ हा दिसत नसला, तरी तो माणसाला आतून संपवू शकतो.”

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात राजेश (काल्पनिक नाव) हा तरुण रहात होता. अवघ्या 26 वर्षाच्या राजेशचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. घरात आनंदाचे वातावरण होते. घरात पत्नीच्या रुपात नववधू आल्याने तिचा पती राजेश मनातून सुखावला होता. मात्र त्याचा हा आनंद लवकरच मावळला. त्याची पत्नी त्याला हवा तसा प्रतिसाद देत नव्हती. नवविवाहीता असल्यामुळे नवीन घरात समरस होण्यास तिला वेळ लागेल असे मनाशी गृहीत धरत त्याने धीर धरला. मात्र सत्य समजल्यानंतर जणूकाही त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काही दिवसातच राजेश आणि त्याच्या पत्नीच्या संसारात वादाची ठिणगी पडू लागली. अखेर नजीकच्या एका शेतातील विहीरीत त्याने आपली जीवनयात्रा संपवत जगाचा निरोप घेतला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मयत राजेशच्या पत्नीचे विवाहापूर्वी एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतरही तिचे हे संबंध कायम असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार राजेशच्या लक्षात येण्यास सुरुवात झाली.

राजेशची पत्नी सतत तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती. ती तासनतास  मोबाईलच्या माध्यमातून त्याच्यासोबत बोलत होती. हा प्रकार उघडकीस आल्याने राजेश आणी तिच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. राजेशच्या नवविवाहीत पत्नीने हा प्रकार तिच्या प्रियकराच्या कानावर टाकला. त्यानंतर तिच्या प्रियकराने राजेशला सरळ सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली.

प्राप्त माहितीनुसार मृत्युपुर्वी राजेश पुर्णपणे बदलला होता. तो शांत राहू लागला होता. तो कुणाशी फारसे बोलत नव्हता. सतत विचारात हरवलेला दिसत होता. नवविवाहीत पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून सुरु असलेला मानसिक दबाव, अपमान आणि धमक्यांमुळे राजेश मनातून पार खचून गेला होता.

मानसिक छळ हा अनेकदा डोळ्यांना दिसत नाही. पण तो व्यक्तीच्या मनाला हळूहळू पोखरत राहतो. विश्वासघात, दुर्लक्ष आणि भावनिक वेदना यामुळे एखादी व्यक्ती आतून पूर्णपणे तुटून जाते. राजेशच्या बाबतीतही असेच काहीसे घडत होते.

राजेशने घरात एक चिठ्ठी लिहून सरळ विहीरीत उडी मारत आपली जीवनयात्राच संपवून टाकली. गावानजीकच्या शेतातील विहिरीत राजेशचा मृतदेह आढळून आला. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्याच्या परिवाराचा आक्रोश जीव हेलावणारा होता. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पुढील कारवाईला वेग देण्यात आला. प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे या मृत्यूमागील धक्कादायक पैलू समोर येऊ लागले.

तपासादरम्यान मृत्युपुर्वी राजेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी त्याच्या घरात सापडली. त्यात त्याने आपल्या आत्महत्येचे कारण लिहून ठेवल्याचे सांगण्यात येते. त्या चिठ्ठीत त्याने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. ही चिठ्ठी पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा मानली जात असून तपासाला नवे वळण मिळाले आहे.

यावल पोलिसांनी मयत राजेश, त्याची पत्नी आणि तिचा कथीत प्रियकर अशा सर्वांचे मोबाईल कॉल डिटेल्स, चॅट्स आणि इतर तांत्रिक पुरावे संकलीत करण्यास सुरुवात केली. मयत राजेश हा मानसिकदृष्ट्या कोणत्या अवस्थेत होता, याचाही तपास सुरु असल्याचे समजते.

मयत राजेशच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेशची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य संशयीत आरोपी असलेल्या प्रियकरास अटक करण्यात आली. न्यायालयाने सुरुवातीला त्यास तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आजच्या आधुनिक युगात नात्यांमध्ये संवाद कमी होत असल्याचे दिसून येते. तसेच भावनिक अस्थिरता वाढतांना देखील दिसत आहे. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणावर उभे असलेले नाते जेव्हा फसवणूक आणि मानसिक छळाच्या भोवऱ्यात अडकते, तेव्हा त्याचा शेवट किती भयानक होऊ शकतो त्याचे हे उदाहरण मानले जात आहे.

मानसिक छळ हा देखील हिंसाच आहे. फरक इतकाच की त्याच्या जखमा बाहेर दिसत नाहीत. जर आपल्या आसपास कोणी सतत तणावात, शांत किंवा एकटं राहत असेल, तर त्याच्याशी संवाद साधा. कदाचित तुमचा एक आधाराचा शब्द एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतो.

पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेला संसार इतक्या लवकर मृत्यूच्या विहिरीत का संपला? हा फक्त आत्महत्येचा प्रकार होता, की परिस्थितीने एका तरुणाला मृत्यूकडे ढकललं? या प्रश्नांची खरी उत्तरे पोलिस तपासातूनच समोर येतील. मात्र या घटनेने समाजाला एक कठोर वास्तव पुन्हा दाखवून दिलं आहे. “मन तुटलं… की माणूसही तुटतो.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment