शरीरसुखासाठी आसुसलेला शरद होता अशांत — नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीला केले कायमचे शांत

On: April 15, 2026 12:38 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : निसर्गाने या धर्तीवर विविध प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली आहे. पाण्यात, पाण्यावर, जमीनीवर राहणारे आणि हवेत उडणारे असंख्य जीव निसर्गाने निर्माण केले आहेत. मानव आणि प्राणी हे प्रमुख जीव जमीनीवर वास्तव्य करतात. मानवाला लाज-लज्जा आणि कमी अधिक प्रमाणात संस्कार असतात. या उलट प्राण्यांना लाज-लज्जा आणि संस्कार नसतात. कामवासना जागृत झाली म्हणजे मनुष्य चार भितींच्या आड शरीरसंबंध प्रस्थापित करतो. त्यासाठी समाजाने विवाह संस्था निर्माण केली आहे. विवाह संस्कारातून मनुष्याच्या अंगी मर्यादा आणि शालीनता येते. मात्र असे असले तरी काही लोक पशुप्रमाणे आचरण करतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या अंगी निर्माण झालेली अती कामवासना. कामवासनेवरील नियंत्रण सुटले म्हणजे मनुष्य देखील कधी कधी पशु प्रमाणे व्यवहार आणि आचरण करतो. कामवासनेवरील ताबा सुटल्यामुळे एका तरुणाने त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ही घटना नेमकी कशी घडली त्याचा तपशील बघूया.

जळगाव जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर रावेर तालुका वसलेला आहे. या तालुक्यात आदिवासी पावरा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. कामधंद्याच्या निमीत्ताने मध्य प्रदेशातील हा आदिवासी समाज जळगाव जिल्ह्यात स्थलांतरीत झाला आहे. रावेर तालुक्यात निमड्या हे आदिवासी लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. या गावातील सायबुपाडा भागात शरद पावरा आणि त्याची पत्नी लालु पावरा हे दाम्पत्य रहात होते. मोलमजुरी करुन हे दाम्पत्य आपला चरितार्थ चालवत होते. 

शरद मिरलाल पावरा आणि लालु पावरा या दाम्पत्याच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती. या सहा वर्षाच्या कालावधीत त्यांच्या संसार वेलीवर दोन मुली व एक मुलगा अशी तिन अपत्ये फुलली होती. तीन अपत्यानंतर शरदची पत्नी लालु चौथ्यांदा गर्भवती झाली होती. तीच्या गर्भारपणाचा आठवा महिना सुरु होता. आठवा महिना सुरु असल्यामुळे लालुच्या पोटाचा आकार वाढला होता. तिला शरीर संबंध करण्यास त्रास होत होता. त्यामुळे साहजीकच ती आता शरीरसंबंध करण्याचे टाळत होती. मात्र तिचा पती शरद यास तिच्यासोबत शरीर संबंध करण्याची तिव्र इच्छा होत असे. ती नको नको म्हणत असली तरी तो तिच्यासोबत शरीर संबंध करण्यास आतुर होत असे. मात्र तिचे दिवस भरत असल्यामुळे आणि जोखीम घेण्याची तिची इच्छा नसल्यामुळे तिचा नकार योग्यच होता. मात्र तिच्यासोबत शरीरसुखाची चटक लागल्यामुळे शरद बेचैन होत असे. तिचा नकार असला तरी तो तिच्यासोबत शरीर संबंध करण्याचा तगादा लावत होता. 

3 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री शरदला तिच्यासोबत शरीरसंबंध करण्याची तिव्र इच्छा निर्माण झाली. शरीरसुखाशिवाय तो अस्वस्थ झाला होता. तो तिच्याजवळ आला. त्याने पत्नी लालुसोबत शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र मला आठवा महिना सुरु आहे, मला त्रास होतो असे म्हणत तिने त्याला नकार दिला. तिचा नकार ऐकून शरद रागाच्या भरात तसाच झोपून गेला. 

आदिवासी समाजात महिला गर्भवती असली तरी ती शेतात काम करण्यास जाते हे विशेष म्हणावे लागेल. दुस-या दिवशी 4 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारपर्यंत लालु पावरा आणि तिचा पती शरद पावरा या दोघांनी शेतात मजुरीने काम केले. काम आटोपून दोघे पती पत्नी त्यांच्या झोपडीत परत आले. नेहमीप्रमाणे तिने पती शरदला जेवण दिले. शरदचे जेवण सुरु असतांना ती शौचालयास गेली. मात्र शरदच्या मनात तिच्याबद्दल राग कायम होता. तिने आपल्याला तिच्यासोबत शरीरसंबंध करु द्यावे असा त्याचा हट्ट होता. जेवण आटोपून शरद तिच्या मागावर गेला. त्याने तिच्याजवळ जावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र तीने त्याला पुन्हा नकार दिला. झोपडीत गेली तर पुन्हा शरद आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करेन याची तिला कल्पना आली होती. त्यामुळे ती झोपडीत न जाता जंगलातील खोल दरीत जावून बसली. 

शरीरसुखासाठी आतुर झालेला शरदने तिचा तेथेही पिच्छा पुरवला. कामातुर श्वानाप्रमाणे तो तिच्या मागे मागे गेला. तो तिला पुन्हा पुन्हा शरीरसुखाची मागणी करु लागला. तिने त्याला पुन्हा पुन्हा नकार दिला. कामातुर झालेल्या शरदला तिचा राग आला. संतापाच्या भरात त्याने तिला जमीनीवर झोपवून तिचे दोन्ही हात पायाने दाबून ठेवले. तिच्या छातीवर बसून त्याने दोन्ही हातांनी तिचा गळा दाबला. दोन्ही हात शरदच्या पायाखाली असल्याने व तिचा गळा त्याच्या दोन्ही हातांनी दाबून धरल्यामुळे तिचा प्रतिकार संपुष्टात आला. तिची हालचाल कायमची थांबली.      

पत्नी लालु मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिच्या अंगातील शेतात काम करण्यासाठी वापरला जाणारा शर्ट काढला. तो शर्ट फाडून त्याने त्याने त्याची एक बाजू तिच्या गळ्यात बांधली. शर्टाची दुसरी बाजु जवळच असलेल्या उंच काटेरी झाडाला वरच्या बाजुस बांधली. एवढा प्रकार केल्यानंतर तो साळसुदपणे सायंकाळी घरी परत आला. 

घरी परत आल्यानंतर त्याने त्याच्या भावाला सांगितले की लालु शौचालयास गेली असून अद्यापही घरी परत आलेली नाही. तिचा शोध घेतला असता ती कुठेही दिसली नाही. लालु कुठे गेली असेल याचा विचार करत शरदच्या इतर भावांनी देखील तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्र झाली तरी तिचा तपास लागला नाही. त्यामुळे रात्री सर्वजण झोपी गेले. 

5 एप्रिलचा दिवस उजाडला. शरदचे सर्व भावांनी तिचा पुन्हा शोध सुरु केला. शरद देखील तिचा शोध घेण्याचे नाटक करु लागला. दरम्यान शरदचा भाऊ भारत यास लालुचा मृतदेह जंगलातील खोल दरीत आढळून आला. मात्र शरद त्याठिकाणी न जाता झोपडीत परत आला. आदिवासी समाज बांधवांनी लालुचा मृतदेह शोधून काढत त्यांनी या घटनेची माहिती रावेर पोलिस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्रात कळवली. 

मयत लालुचे वडील पातल्या जुवानसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीनुसार या घटनेप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. या अकस्मात मृत्युप्रकरणी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली. मयत लालु हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आला. वैद्यकीय तपासणीअंती मयत लालु पावरा ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गळा आवळून तिची हत्या झाल्याचे देखील निष्पन्न झाले. 

पोलिस पाटील रमजान अहमद तडवी यांनी 12 एप्रिल रोजी शोकाकुल पावरा समाज बांधवांची भेट घेत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगी मयत लालुचा पती शरद मिरलाल पावरा याने पोलिस पाटील रमजान तडवी यांना म्हटले की मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. घराच्या मागील बाजूस शांत ठिकाणी दोघेजण गेल्यानंतर शरद पावरा याने रमजान तडवी यांना सत्य घटना कथन केली. 3 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी शरद कामातुर झाला होता. त्याला त्याची पत्नी लालुसोबत कामक्रिडा करण्याची इच्छा झाली होती. मात्र ती आठ महिन्याची गर्भवती होती. त्यामुळे तिने अशा प्रसंगी कामक्रिडा केल्यास त्रास होतो असे त्याला बजावत नकार दिला होता. त्यामुळे संतापाच्या भरात शरद तसाच झोपी गेला होता. दुसर-या दिवशी 4 एप्रिल रोजी दिवसभर दोघा पती पत्नीने मिळून शेतात मजुरी केली. लालु शौचालयास गेली असता त्याने तिचा पाठलाग करत पुन्हा तिच्यासोबत शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र यावेळी देखील तिने आपण आठ महिन्याची गर्भवती असल्याचे सांगून त्याला नकार दिला. त्याच्या या मागणीला वैतागून ती घरी परत न येता खोल दरीत जावून बसून राहिली. संतप्त शरदने तिच्या दोन्ही हातांवर पाय ठेवून तिचा दोन्ही हातांनी गळा दाबून धरला. त्यात ती मरण पावली. त्यानंतर त्याने तिच्या अंगातील शेतात काम करण्यासाठी वापरला जाणारा शर्ट काढून फाडला. त्या शर्टाचे एक टोक तिच्या गळ्याभोवती तर दुसरे टोक जवळच असलेल्या काटेरी झाडाच्या उंचावर बांधले. त्यानंतर साळसुदपणे शरद घरी परत आला. शौचालयास गेलेली पत्नी लालु अद्याप घरीच आली नसल्याचा कांगावा त्याने केला. या सर्व घटनेची माहिती शरदने पोलिस पाटील रमजान तडवी यांना कथन केली. 

पोलिस पाटील रमजान तडवी यांनी रावेर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार शरद पावरा याच्याविरुद्ध पत्नी लालुच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शरद पावरा यास पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या समक्ष हजर करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला.  या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन तसेच पोलिस हेड कॉन्स्टेबल इश्वर जुलालसिंग चव्हाण, जगदीश लिलाधर पाटील, पोलिस नाईक कल्पेश मुरलीधर आमोदकर व पोलिस कॉन्स्टेबल इस्माईल दगेखा तडवी करत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment