जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : कित्येक तरुणांच्या अंगी मुद्दाम नडून बसण्याची वृत्ती असते. तारुण्याचा जोश हे त्यामागचे कारण असते. ज्यावेळी त्यांच्याकडे जोश असतो त्यावेळी त्यांचा होश बेपत्ता झालेला असतो. जोश आणि होश या दोघा घटकांचा संगम योग्य वेळी योग्य प्रमाणात झाला म्हणजे कोणत्याही कामात अडचण येत नाही. मात्र दुर्दैवाने कित्येक तरुणांच्या बाबतीत असे घडत नाही. आपल्याला नेहमीच नडणा-या, आपल्यासोबत नेहमीच वाद घालणा-या तरुणाचा इतर समदुखी: मित्रांनी गोळी झाडून, दगडाने ठेचून तसेच चाकूचे वार करुन निर्दयी खून केल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा या तालुक्याच्या गावी घडली. या घटनेमुळे नेहमी अडून बसणारा व त्रास देणारा तरुण जीवानिशी गेला. त्याचा खून करणारे तिघे संशयीत तरुण आरोपी गजाआड गेले आणि त्यांच्या नशिबी गुन्हेगारीचा शिक्का बसला. याशिवाय त्यांच्या परिवाराला मोठा मानसिक धक्का बसून त्यांची सामाजिक हाणी झाली.

जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सिमेवर चोपडा हे तालुक्याचे गाव वसले आहे. या गावातील तारामती नगर परिसरात राजेंद्र सोमा महाजन आणि त्यांचा परिवार वास्तव्याला आहेत. वयाची साठी पार केलेले राजेंद्र महाजन व त्यांची मुले जिनींग मधे मजुरी करुन परिवाराचा प्रपंच चालवतात.

राजेंद्र महाजन यांचा लहान मुलगा प्रदीप हा आडंदाड वृत्तीचा तरुण होता. त्याच्या मनाविरुद्ध वागणा-यास तो प्रसंगी शिवीगाळ देखील करत असे. त्यामुळे सहसा त्याच्या नादी कुणी लागत नव्हते. त्याला मद्य पिण्याचे व्यसन होते. मद्याची तल्लफ लागली म्हणजे समोर जो कुणी ओळखीचा दिसेल त्याच्याकडे तो मद्याची मागणी करत असे. समोरच्या व्यक्तीने मद्यासाठी पैसे दिले नाही म्हणजे तो त्याच्यासोबत वाद घालत असे. त्यामुळे सहसा त्याच्या नादी कुणी लागत नव्हते. तो कित्येकदा रात्री अपरात्री उशिरा घरी परत येत असे. त्यामुळे घरात सहसा त्याची कुणी वाट देखील बघत नव्हते.

विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दोघे तरुण मित्र चोपडा शहरात रहात होते. एके दिवशी मद्याच्या नशेत प्रदीप महाजन याचा एका रिक्षा चालकासोबत वाद सुरु होता. तो वाद सोडवण्यासाठी विजय वैदकर त्याठिकाणी आला. विजयने मध्यस्ती करत संबंधीत रिक्षा चालक आणि प्रदीप महाजन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या वादात विजय वैदकर मध्यस्ती करण्यासाठी आलाच कसा याचा प्रदीपला राग आला. आमच्या वादात बोलणारा तु कोण? असा प्रश्न करत प्रदीप याने विजय वैदकर याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. केवळ वादच घातला नाही तर प्रदीप याने विजय वैदकर याला मारहाण देखील केली. आपल्याला प्रदीपने केलेल्या मारहाणीचा प्रसंग विजयने चांगल्याप्रकारे लक्षात ठेवला. विजयने हा प्रसंग त्याचा मित्र निर्मल बडगुजर याला सांगितला. विजयसोबत घडलेल्या घटनेमुळे निर्मल बडगुजर हा देखील व्यथीत झाला होता. एके दिवशी प्रदीपला चांगला धडा शिकवायचा असे विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या दोघा मित्रांनी मनाशी ठरवले.
काळ पुढे पुढे सरकत होता. प्रदिपची आडंदाड वृत्ती दिवसेंदिवस वाढतच होती. जिनींगमधील मजुरीचे काम सोडून व्यवसाय करण्याचा विचार एके दिवशी प्रदीपच्या मनात आला. चोपडा शहर नगरपरिषदेच्या मागच्या बाजुस असलेल्या हॉटेल समोरच त्याने पान टपरी सुरु केली. त्या पान टपरीत त्याने डिप फ्रिज आणून त्यात पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. पान टपरीत थंड पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्यामुळे हॉटेल मालक चेतन कानडे याच्या व्यवसायावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. ग्राहक हॉटेलमधून पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याऐवजी बाहेरच्या बाहेर पान टपरीतून त्या विकत घेऊ लागले. अशा प्रकारे ज्याला त्याला नडण्याचा उद्योग प्रदीप करत होता. प्रदीप आणि हॉटेल मालक चेतन कानडे यांच्यात देखील वादाची ठिणगी पडली होती. चेतन त्याच्या पान टपरीतून पाण्याच्या बाटल्यांची विक्री बंद करण्यास तयार नव्हता. त्यातून दोघातील वाद शिगेला पोहोचला होता.

दिनांक 13 मार्च 2026 च्या रात्री प्रदिप महाजन याची पान टपरी जळून खाक झाली. जळून खाक झालेली पान टपरी हॉटेल मालक चेतन कानडे याने जाळल्याची तक्रार प्रदीपने चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल केली. त्यामुळे चेतन कानडे याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रितसर सनदशीर मार्गाने लढण्यास चेतन कानडे तयारीला लागला. मात्र काही दिवसांनी प्रदीप आपल्या जळालेल्या पान टपरीची दिड लाख रुपयांची नुकसान भरपाई मध्यस्तांमार्फत चेतनकडे मागू लागला. नुकसान भरपाई म्हणून दिड लाखांची रक्कम मिळाल्यास आपण पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा मागे घेऊ अशी तो चेतनला ऑफर देऊ लागला. प्रदीपच्या नुकसान भरपाई मागण्याच्या त्रासाला चेतन कानडे वैतागला होता.

दिवसामागून दिवस जात होते. प्रदीपची आडंदाड वृत्ती काही केल्या कमी होत नव्हती. त्यातच समदुखी: असलेले विजय वैदकर, निर्मल बडगुजर आणि हॉटेल मालक चेतन कानडे असे तिघे मित्र एकत्र आले. प्रदीपचा कायमस्वरुपी काटा काढण्याचे तिघांनी ठरवले. “मद्य” ही प्रदीपची कमजोरी असल्याची बाब तिघांनी हेरली. मद्य पिण्यासाठी प्रदीपला बोलावून त्याचा काटा काढता येऊ शकतो हे तिघांच्या लक्षात आले. त्यातून तिघांनी मिळून एक कट रचला आणी त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी निश्चीत केले. अखेर तो दिवसही जवळ आला ज्या दिवशी प्रदीपच्या जीवनातील अखेरचा दिवस नियतीने तिघा मित्रांच्या माध्यमातून निश्चीत केला होता.


दिनांक 19 एप्रिल 2026 हा रविवारचा दिवस अक्षय तृतीया सणाचा दिवस होता. या दिवशी सायंकाळी प्रदीप घरातून बाहेर पडला तो पुन्हा जीवंत परत न येण्यासाठीच. रात्र झाली तरी प्रदीप घरी परत आला नाही. मात्र रात्री दहा वाजता परीसरात राहणारा मयुर भोई नावाचा मुलगा प्रदीपची मोटार सायकल त्याच्या घरी घेवून आला. मयुरने ती मोटार सायकल घरासमोर उभी करुन तिची चावी प्रदीपच्या आईच्या हाती दिली. प्रदीप बाहेर गेला असून त्याने गाडी पाठवली असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर उशिरापर्यंत प्रदीप घरी परत आला नाही. कित्येकदा प्रदीप घरी उशिरा येत असे. अक्षय तृतीये निमीत्त तो पत्ते खेळण्यासाठी कुठेतरी गेला असेल असा समज करत त्याची कुणी वाट पाहिली नाही.
दिनांक 20 एप्रिल 2026 चा दुसरा दिवस उजाडला. सकाळी आठ वाजेच्या सुमारास चोपडा शहराबाहेरील धरणगाव रस्त्यावर असलेल्या पाटचारी नजीक एका तरुणाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेची खबर चोपडा शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नव्याने दाखल झालेले पोलिस निरीक्षक पवन देसले तसेच डीवायएसपी अण्णासाहेब घोलप हे देखील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पाहणी केली असता मृतदेहाचा चेहरा पुर्णपणे ठेचून विद्रुप केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र मयताच्या खिशातील दोन लग्नपत्रिका व त्याच्या अंगावरील टॅटूच्या आधारे त्याची ओळख पटली. त्याचे नाव प्रदीप महाजन असल्याचे निष्पन्न झाले. मयताचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या घरचा पत्ता शोधून काढण्यात आला.


सकाळी नऊ वाजता मयत प्रदीपच्या घरी चोपडा शहर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अमोल पवार दाखल झाले. हेड कॉन्स्टेबल अमोल पवार यांनी प्रदीपच्या आई वडीलांना घटनास्थळावरील मृतदेहाचा आणि त्या शेजारी पडलेल्या चपलांचा फोटो दाखवला. फोटोतील छिन्नविच्छीन्न चेहरा असलेला मृतदेह, चपला आणि कपडे बघून हा मृतदेह प्रदीपचा असल्याचे त्यांनी ओळखले. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा रस्त्यावरील पाटचारी नजीक आढळून आलेल्या प्रदीपच्या मृतदेहाची ओळख पटली होती.
प्रदीपचा मृतदेह चोपडा उप जिल्हा रुग्णालयात ठेवला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुढच्याच क्षणी प्रदीपचे आई, वडील, भाऊ व इतर नातेवाईकांनी चोपडा उप जिल्हा रुग्णालय गाठले. त्याठिकाणी त्यांनी प्रदीपचा मृतदेह निरखून पाहिला असता त्याचा चेहरा पुर्णपणे ठेचून काढण्यात आल्याचे दिसून आले. मात्र त्याची शरीरयष्ठी, त्याच्या शरीरावर शुभांगी हे नाव इंग्रजीत लिहिलेले आढळून आले. तसेच त्याच्या उजव्या हातावर गोंदलेले बाबा साई” असे नाव आणि अंगावरील कपड्यावरुन हा प्रदीपचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.


घटना उघडकीस येण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 19 एप्रिलच्या रात्री प्रदीपची मोटार सायकल त्याच्या घराजवळ राहणा-या मयुर भोई नावाच्या मुलाने आणून दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याने सांगितले की घटनेच्या आदल्या रात्री प्रदीप हा विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या दोघांसोबत त्यांच्या ताब्यातील स्कुटीवर बसून मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. त्यावेळी जातांना प्रदीपने त्याची मोटार सायकल माझ्याकडे दिली होती.
या माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास प्रदीप महाजन हा विजय भास्कर वैदकर आणि निर्मल संजय बडगुजर या दोघा तरुणांसोबत एम.जी. महाविद्यालयाच्या दिशेने जातांना दिसून आला. त्याच रस्त्याच्या दिशेने पुढे पाटचारीजवळ प्रदीपचा मृतदेह आढळून आला होता.


या माहितीच्या आधारे मयत प्रदीपचे वडील राजेंद्र सोमा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 152/2026 भा.न्या.सं. कलम 103(1), 3 (5) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 13 मार्च 2026 रोजी प्रदीपची पान टपरी जाळल्याच्या आरोपाखाली संशयीत आरोपी म्हणून चेतन कानडे याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यासह विजय वैदकर व निर्मल बडगुजर अशा तिघांची नावे संशयीत म्हणून या खूनाच्या घटनेतील फिर्यादीत दाखल करण्यात आली.


घटनास्थळावर पोलिसांना रक्ताने माखलेला एक दगड, मद्याच्या रिकाम्या बाटल्या व एक रिकामे काडतुस अशा वस्तू आढळून आल्या. त्यामुळे हा खून पिस्टलच्या गोळीने तसेच चेहरा दगडाने ठेचून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. पुढच्याच क्षणी डिवायएसपी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी पुढील तपासाला वेग दिला. मयत प्रदीप महाजन याच्या घरी त्याची मोटार सायकल आणून देणा-या मयुर भोई याची चौकशी केल्यानंतर संशयीत विजय वैदकर व निर्मल बडगुजर यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली.
मयत प्रदीप सोबत सीसीटीव्ही फुटेजमधे दिसणा-या विजय वैदकर व निर्मल बडगुजर या दोघांचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेतला असता ते पसार झाले होते. त्यांचे मोबाईल देखील स्विच ऑफ येत होते. त्यामुळे त्यांच्यावरील पोलिसांचा संशय अधिकच बळावला. याशिवाय मयत प्रदीपचे 13 मार्च 2026 रोजी चेतन कानडे याच्यासोबत वाद झाले होते. त्यातून चेतन कानडे याने प्रदीपची पान टपरी जाळून टाकल्याचा आरोप होता. त्यामुळे या खूनात त्याचा देखील सहभाग असू शकतो या आधारे त्याचाही शोध सुरु करण्यात आला.


विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या दोघांचा शोध सुरु असतांना पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चेतन कानडे यास सावखेडा फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दोघे संशयीत घटनास्थळावरुन स्कुटीने अमळनेर येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजली. अमळनेर येथे एका परिचीताच्या घरी स्कुटी उभी करुन ते दोघे रेल्वेने सुरतला पळून गेल्याची अधिकची माहिती पोलिस पथकाला समजली. तांत्रीक माहितीचा आधार घेत दोघांचे लोकेशन तपासण्यात आले. त्यात दोघे सुरत येथून बोरीवली मुंबई परिसरात गेल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक चेतन परदेशी यांना समजली.


वरिष्ठ अधिका-यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर अधिकच्या मदतीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मुंबई येथे रवाना करण्यात आले. दोघे संशयीत त्यांचे मोबाईल कधी चालू तर कधी बंद करत होते. त्यामुळे त्यांचे लोकेशन समजण्यास अडथळा येत होता. अधिक तपासात चोपडा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक या तपासकामी जुंपण्यात आले. दोघे संशयीत आरोपी विदर्भ एक्सप्रेसने जळगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती समजली. या माहितीच्या आधारे दोघांना धावत्या रेल्वेतच ताब्यात घेण्यात संयुक्त पथकाला यश आले. त्यांना चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. यापुर्वी ताब्यातील चेतन कानडे व नव्याने ताब्यात घेण्यात आलेल्या विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर या तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कोठडी दरम्यान तिघांनी आपापले गुन्हे कबुल केले. चेतन कानडे याच्या सांगण्यावरुन संगनमताने तिघांनी हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. विजय भास्कर वैदकर याने कबुल केले की घटनेच्या रात्री दहा वाजता त्याने प्रदीप महाजन आणि निर्मल संजय बडगुजर अशा तिघांच्या सोबतीने घटनास्थळावरील मोकळ्या जागेत मद्यप्राशन केले. त्यात आमचा आणि प्रदीपचा वाद झाला. यापूर्वी देखील आमच्यासोबत प्रदीपने वाद घातला होता. मद्यप्राशन करण्याच्या बहाण्याने प्रदीपला सोबत घेण्यात आले होते.


घटनेच्या वेळी वाद वाढत गेल्यानंतर विजय वैदकर याने त्याच्याकडील गावठी पिस्टलची गोळी प्रदीपच्या डोक्यात झाडली. त्यानंतर प्रदीप जमीनीवर कोसळला. त्यानंतर लागलीच निर्मल बडगुजर याने त्याच्याकडील चाकूने प्रदीपच्या गळ्यावर दोनवेळा सपासप वार केले. जवळच पडलेला दगड दोन ते तिन वेळा प्रदीपच्या डोक्यात हाणण्यात आला. दगडाने ठेचून प्रदीपचा चेहरा विद्रुप करण्यात आला. अशा प्रकारे दगड, चाकू आणि गावठी पिस्टल यांच्या मदतीने प्रदीपला ठार करण्यात आले. प्रदीपची हत्या केल्यानंतर विजय आणि निर्मल या दोघांनी गावठी पिस्टल आणि चाकू स्कुटीच्या डिक्कीमधे ठेवत अमळनेर गाठले. तेथून दोघांनी रेल्वेने सुरत व पुढे मुंबई गाठली.


मयत प्रदीप याने चेतन कानडे याच्या हॉटेलसमोरच पान टपरी थाटली होती. त्याने त्याच्या पान टपरीत डीप फ्रिज ठेवले होते. त्यात तो पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवत होता. त्यामुळे चेतन कानडे याच्या हॉटेलमधील पाणी बॉटल विक्रीवर परिणाम झाला होता. त्यातून दोघात वाद सुरु होता. या वादाची परिणीती पान टपरी जाळण्यात झाली होती. आपली पान टपरी चेतन कानडे यानेच जाळल्याच्या आरोपाखाली प्रदीपने चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. पोलिस स्टेशनला दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी प्रदीप हा चेतनकडे मध्यस्तामार्फत दिड लाख रुपयांची मागणी करत होता. ह्ळूहळू चेतन कानडे, विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे तिघे समदुखी: मित्र एकत्र आले. त्यांनी रचलेल्या कटानुसार आडंदाड वृत्तीच्या प्रदीपचा खात्मा करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, हे.कॉ. रविंद्र पाटील, दिपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बि-हाडे, सुनिल दामोदरे, पो.कॉ. रावसाहेब पाटील, चालक हे.कॉ. रिजवान शेख तसेच चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह त्याचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलिस उप निरीक्षक चेतन परदेशी, सचिन चौधरी, योगेश्वर हिरे, हे.कॉ. ज्ञानेश्वर जवागे, संतोष पारधी, पो.कॉ. निलेश वाघ, योगेश पाटील आदींची या गुन्ह्याच्या तपासकामी मदत झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.








