जैन इरिगेशनला दिलेला धनादेश अनादर करणाऱ्या आरोपीस कारावास

On: September 8, 2026 7:11 PM

जळगाव/नागपूर – जैन इरिगेशनला उधारीपोटी दिलेला सुमारे १९ लाख ८८ हजार ८८५ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी नागपूर येथील रोशन एग्रो सेंटरच्या संचालिका जयश्री पुरुषोत्तम बावीस्कर यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्याबरोबरच संबंधित जैन इरिगेशन कंपनीस २३ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, जयश्री बावीस्कर यांनी सन २०१४ मध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीकडून घेतलेल्या उधारीच्या व्यवहारापोटी सुमारे रूपये १९,८८,८८५ रकमेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश कंपनीने बँकेत सादर केला असता तो अनादरित होऊन परत आला. त्यानंतर कंपनीने संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यायालयात फौजदारी प्रकरण क्र. ४८६५/२०१४ दाखल केले होते.
या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने निकाल देत आरोपीस दोषी ठरविले.

धनादेश हा उधारीच्या व्यवहारापोटी देण्यात आला असल्याचे कंपनीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तसेच धनादेशाच्या रकमेपेक्षा अधिक म्हणजे २३ लाख रुपये नुकसानभरपाई कंपनीस अदा करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणात कंपनीच्या वतीने अॅड. निशांत अत्रे यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने अॅड. सतीश सी. पाटील यांनी बाजू मांडली.
या निकालामुळे धनादेशाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कायदेशीर जबाबदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, उधारीच्या व्यवहारात दिलेल्या धनादेशाचा अनादर झाल्यास त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment