जळगाव : दहा हजार रुपयांच्या लाचेच्या सापळ्यात सापडलेला जिल्हा परिषदेचा लाचखोर उप विभागीय अभियंता सतिश शिसोदे याच्या घर झडतीदरम्यान कोट्यावधीचा मुद्देमाल एसीबी पथकाला आढळून आला आहे. शिसोदे याच्या स्वामी विवेकानंद सोसायटी मधील आदर्श नगर परिसरातील राहत्या घरात व जळगाव जनता सहकारी बॅंक खात्यातील लॉकरमधे 5 कोटी 16 लाख 88 हजार 389 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, प्लॅटीनम असा मौल्यवान मुद्देमाल झडती दरम्यान आढळला आहे. शिसोदे याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं.351/2026, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
घरझडती दरम्यान 7 लाख 97 हजार 920 रुपयांची रोकड, अनुक्रमे 45 लाख व 65 लाख रुपये किमतीची आदर्श नगरात दोन घरे, 24 लाख 39 हजार रुपये किमतीच्या घरातील वस्तू असा एकुण 1 कोटी 41 लाख 97 हजार 959 हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. याशिवाय जनता बॅंकेतील लॉकरमधील सोन्या चांदीचे दागिने व इतर वस्तूंची किंमत 3 कोटी 74 लाख 90 हजार 430.4 एवढी आहे. रोख रक्कम, घरे, बॅंक लॉकरमधील वस्तू अशा सर्वांची एकुण किंमत 5 कोटी 16 लाख 88 हजार 389 एवढी आहे. शिसोदे सध्या 5 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत आहे.
लॉकर झडती पथकात उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्यासह पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलिस उप निरीक्षक सुरेश पाटील, हे.कॉ. किशोर महाजन, महिला हे.कॉ. संगिता पवार, पो.कॉ. राकेश दुसाने, सचिन चाटे आदींनी सहभाग घेतला. घर झडती पथकात पोलिस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे यांच्यासह हे.कॉ. सुनिल वानखेडे व प.कॉ. मनोज महाजन आदींनी सहभाग घेतला.




