रात्रीच्या काळोखात शहाबाजने केला खात्मा ! चाकूच्या घावासह तळमळला सुनिलचा आत्मा!!

जळगाव : अवघा एकविस वर्षाचा शहाबाज शहा फारुख शहा हा तरुण भुसावळ शहरातील द्वारका नगर परिसरात रहात होता. बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणा-या शहाबाजला दाढी वाढवण्याची भारी हौस होती. अंगातील शर्टाचे वरील बटण उघडे ठेवत शिरावर केसांची भलीमोठी जुल्फे मिरवणा-या शहाबाजच्या अंगी इगो अर्थात अहमपणा आलेला होता. त्याच्या अंगी असलेला अहमपणा हा त्याच्या तरुण वयाच्या दोष होता. शहाबाज त्याच्या नावाप्रमाणे केवळ आपलाच एकतर्फी बाज वाजवणारा तरुण होता. मी म्हणजे कोण? आणि मेरी सुनो …..अशी टिमकी वाजवणा-या शहाबाजचा 6 मे रोजी वाढदिवस होता.

शहाबाज शहा याचा सुनिल इंगळे नावाचा मित्र होता. भुसावळ शहरातील आंबेडकर नगर परिसरात सुनिल रहात होता.  शहाबाज आणि सुनिल हे दोघे मित्र मद्याचे शौकीन होते. दोघांच्या मद्याचा ब्रॅंड फार महागडा देखील नव्हता. त्यांच्या वयाच्या आणि उत्पन्नाच्या पातळीप्रमाणे त्यांचा मद्याचा ब्रॅंड होता. शहाबाजच्या अंगी अहंमपणा असल्यामुळे तो सुनिल यास नेहमी वरचढपणा दाखवत असे. त्याचा वरचढपणा कधी कधी सुनिल यास सहन होत नसे. त्यातून दोघात कधी कधी भांडण देखील होत असे.

शहाबाज शहा (आरोपी)

भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन असल्यामुळे या शहरात गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन दररोज शेकडो रेल्वे गाड्या ये – जा करत असतात. भुसावळ हे आशिया खंडातील रेल्वेचे मोठे जंक्शन असल्यामुळे याठिकाणी प्रत्येक रेल्वे गाडी थांबते. त्यामुळे गुन्हेगारांना रेल्वेने येण्या जाण्यासह मुक्कामासाठी भुसावळ हे एक सोयीचे ठिकाण असल्याचे गुन्हेगारी क्षेत्रात म्हटले जाते. भुसावळ शहरातील अनेक पिढ्या रेल्वेच्या अतिक्रमीत जागेतील झोपडपट्टीत खपून गेल्या. रेल्वेच्या शेकडो एकर जागेवर कित्येक वर्ष हजारो अतिक्रमीत झोपडपट्टीधारकांनी जणू मगरमिठीचा विळखा घातला होता. या मगरमिठीतून आपल्या जागेची सोडवणूक करण्यासाठी रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रयत्नांची शिकस्त करावी लागली होती. रेल्वेच्या भल्यामोठ्या शेकडो एकर जागेवरील हजारो अतिक्रमणे तोडल्यानंतर या निर्मनुष्य जागेचा मद्यपी अथवा टवाळखोर रात्रीच्या वेळी गैरवापर करत असल्याचे दिसून येते. रेल्वे हद्दीतील आगवाली चाळ हा असाच एक परिसर म्हटला जातो. आगवाली चाळ परिसरात मोठमोठे खड्डे असून हा परिसर म्हणजे रात्रीच्या वेळी मद्यपी आणि लफडेखोर प्रेमी युगुलांसाठी जणूकाही हक्काची जागा झाली असल्याचे म्हटले जाते.  

शहाबाज याचा 7 मे रोजी वाढदिवस होता. त्यामुळे रेल्वेच्या आगवाली चाळीच्या निर्मनुष्य जागेत रात्रीच्या वेळी त्याने त्याचा मित्र सुनिल इंगळे याला मद्यप्राशनाच्या निमित्ताने बोलावले होते. मद्यप्राशन करण्यासाठी जायचे असल्यामुळे सुनिल सायंकाळपासून तयारीला लागला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास सुनिल घरातून बाहेर पडला. त्यावेळी त्याचा भाऊ अनिलने त्याला “एवढ्या रात्री कुठे जात आहे”? अशी विचारणा केली. मी शहाबाजच्या वाढदिवसानिमीत्त त्याच्या भेटीला जात असल्याचे सुनिलने त्याचा भाऊ अनिल यास सांगितले.

रेल्वेच्या निर्मनुष्य जागेतील आगवाली चाळ परिसरात शहाबाज आणि सुनिल हे दोघे मित्र मद्यप्राशन करण्यासाठी बसले. रात्रीचा सर्वत्र पसरलेला काळोख व त्याच्या जोडीला गार वारा आणी सोबतीला मद्याची चढत जाणारी झिंग असे एकंदरीत दोघा मित्रांमधील वातावरण होते. सरत जाणारी रात्र आणि चढत जाणारी मद्याची झिंग दोघा मित्रांमधील संभाषणाला धार आणत होती. सुरुवातीला चांगल्या संभाषणाने झालेली सुरुवात नंतर मात्र बघता बघता कटू होण्यास सुरुवात झाली. मद्याची झिंग दोघा मित्रातील जुन्या वादाला आमंत्रण देऊ लागली. जुन्या उखाळ्यापाखाळ्या निघण्यास सुरुवात झाली. बघता बघता अतिशय सुमार दर्जाच्या वाणीचे दोघा मित्रातील संभाषणात आगमन झाले.

शहाबाजच्या अतिशय सुमार दर्जा असलेल्या संभाषणाचा सुनिल यास राग आला. सुनिल हा शहाबाजपेक्षा वयाने थोडा मोठा होता. तरीदेखील त्याने शहाबाजचे सुमार बोलणे सहन केले. मात्र शहाबाजचे दर्जाहिन बोलणे ऐकून सुनिलच्या रागाचा पारा देखील चढू लागला. शब्दामागे शब्द वाढत होता. मेरी सुनो….. अशी एकेरी लाईन चालवणा-या शहाबाजचा अहंभाव दुखावला गेला. शहाबाज नेहमी आपल्यासोबत चाकू बाळगत होता. संतापाच्या भरात शहाबाजने सुनिलच्या अंगावर, छातीवर व गळ्यावर चाकूचे ठिकठिकाणी वार करण्यास सुरुवात केली. या निर्मनुष्य जागी सुनिलचा बचाव करण्यास कुणी नव्हता. त्याची किंकाळी देखील ऐकण्यास या निर्मनुष्य जागी कुणी नव्हता. त्यामुळे चाकूचे घाव बसल्यामुळे काही क्षणातच सुनिलने आपला जिव सोडला. सुनिल यास जिवे ठार केल्यानंतर शहाबाजला जणू काही विजयी झाल्यासारखे वाटले. आज सुनिलच्या जिवनाचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र होती. घरातून निघतांना भाऊ अनिलसोबत त्याची अखेरची भेट व अखेरचे बोलणे झाले होते. सुनिलची तडफड शांत झाल्यानंतर शहाबाजच्या तन व मनावरील मद्याचा अंमल ब-याच प्रमाणात कमी झाला. या निर्मनुष्य जागी बरेच खड्डे पडले होते. यापैकी एका खड्ड्यात शहाबाजने सुनिलचा मृतदेह टाकला. जवळच पडलेल्या एका सिमेंटच्या पत्र्याने शहाबाजने तो खड्डा झाकला. मृतदेह कुणाला दिसणार नाही असा शहाबाजने मनाशी समज केला.

रात्र बरीच झाली तरी अद्याप सुनिल घरी परत आला नव्हता. त्यामुळे त्याचा भाऊ अनिल हवालदिल झाला. त्याने सुनिलच्या मोबाईलवर वारंवार फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. अखेर रात्री बारा वाजता त्याने शेवटचा फोन करुन पाहिला. मात्र त्याची निराशाच झाली. अखेर सुनिलची वाट बघत बघत अनिल झोपी गेला. सकाळ झाली तरी सुनिल घरी परत आला नसल्याचे बघून अनिल मनातून घाबरला. आपला भाऊ सुनिल घरी का आला नाही याविषयी त्याच्या मनात शंकेचे काहुर माजले. आपला भाऊ सुनिल कुठे असेल? काय करत असेल? हे प्रश्न त्याच्या मनात घोंघावत होते.

घरातून निघतांना आपण शहाबाजच्या वाढदिवसानिमीत्त त्याला भेटण्यासाठी जात असल्याचे सुनिलने भाऊ अनिल यास सांगितले होते. त्यामुळे तो शहाबाजचा शोध घेण्यासाठी घरातून बाहेर पडला. शहाबाजचा शोध घेण्यासाठी सुनिल कंडारी येथे गेला. मात्र सुनिल आता कंडारी येथे रहात नसल्याचे त्याला समजले. वाटेत द्वारकानगरजवळ असलेल्या आंबेडकर शाळेजवळ सुनिल यास शहाबाजचा भाऊ भेटला. त्याच्याजवळ सुनिलची विचारणा केली असता आम्हाला काहीच माहिती नाही असे त्याला सांगण्यात आले. मी शहाबाजचा तपास करत आहे, तु सुनिलचा तपास कर असे म्हणत शहाबाजच्या भावाने तेथून काढता पाय घेतला. काहीतरी अघटीत घडले असल्याची शंका अनिल यास येऊ लागली.

दरम्यान रात्रीपासून गायब असलेला शहाबाज 8 मे रोजी सकाळी अकरा वाजता भुसावळ शहर पोलिस स्टेशनला स्वत:हून एकटाच हजर झाला. त्यावेळी पोलिस स्टेशनला महिला पोलिस हवालदार आशा तडवी आणि शमीना तडवी हजर होत्या. शहाबाजने दोघा महिला कर्मचा-यांना सांगितले की रात्री मी एका तरुणाचा खून केला आहे. तरुणाचा खून केला असल्याचे सांगण्यासाठी स्वत: आरोपी हजर होत सांगत असल्याचे बघून व ऐकून दोन्ही महिला कर्मचारी अवाक झाल्या. त्यांनी ड्युटीवर हजर असलेले सहायक पोलिस निरीक्षक संदिप दुनगहू यांच्या कानावर हा प्रकार टाकला. स.पो.नि. संदिप दुनगहू आपल्या खुर्चीवरुन उठत लागलीच बाहेर आले. त्यांनी पोलिस स्टेशनला हजर झालेल्या तरुणाचे बारकाईने निरीक्षण केले असता त्याच्या अंगाला जखमा झालेल्या दिसून आल्या. स.पो.नि. संदिप दुनगहू यांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव शहाबाज शहा फारुख शहा असे कथन केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स.पो.नि.संदिप दुनगहू यांनी लागलीच आपले वरिष्ठ पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या कानावर हा प्रकार घातला. पो.नि.बाबासाहेब ठोंबे यांनी देखील गंभीर घटना लक्षात घेत डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह स.पो.नि. संदीप दुनगहु यांनी आपले सहकारी पोलिस हवालदार अनिल चौधरी, पो.कॉ. मोहन पाटील, विशाल मोहे, रशिद तडवी, विनोद तडवी,चेतन तांगडे यांच्यासह भुसावळ शहरातील आगवाली चाळ येथील प्रतापगड मशीदनजीक असलेले घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरील वडाच्या झाडाच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात एका तरुणाचा मृतदेह सर्वांच्या नजरेस पडला. मृतदेह असलेला खड्डा एका सिमेंटच्या पत्र्याने झाकण्यात आलेला होता.

दरम्यान आपला भाऊ रात्रीपासून बेपत्ता असल्यामुळे हवालदिल झालेला अनिल इंगळे त्याचा शोध घेत होता. सुनिलचा कुठेही शोध लागत नसल्यामुळे व त्याचा मोबाईल बंद येत असल्यामुळे अनिलने त्याची मिसींग दाखल करण्याचे मनाशी ठरवले. निवडक नातेवाईकांसमवेत तो भुसावळ शहर पोलिस स्टेशनला जाण्यास निघाला. पोलिस स्टेशनला जात असतांना आगवाली चाळ हद्दीत एका तरुणाचा खून झाला असल्याचे त्याला समजले. घटनास्थळावर पोलिसांचा ताफा असल्याचे देखील त्याला समजले. घटनास्थळावर जाऊन मृतदेहाचे निरीक्षण केले असता तो त्याचा भाऊ सुनिल असल्याचे अनिलने ओळखले. रात्रीपासून बेपत्ता भावाचा शोध घेणा-या अनिल यास सुनिलचा मृतदेहच बघण्याची वेळ आली. मयत सुनिलच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसताच अनिल धाय मोकलून रडू लागला. अनिल इंगळे याच्या घटनास्थळी येण्यामुळे पोलिसांना मयताची व त्याच्या भावाची ओळख पटली होती.

या घटनेप्रकरणी  अनिल इंगळे याच्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 73/2021 भा.द.वि. 302, 201 अ.जा.ज.प्रतिबंधक कायदा कलम – 3 (2) (5) प्रमाणे दाखल करण्यात आला.  ताब्यातील शहाबाज शहा फारुख शहा यास अटक करण्यात आली. नेमक्या कोणत्या कारणावरुन मयत सुनिल इंगळे व संशयीत आरोपी शहाबाज शहा यांच्यात शाब्दिक चकमक झाली याचा तपशील समजू शकला नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बाबासाहेब ठोंबे, स.पो.नि. संदिप दुनगहू व त्यांचे सहकारी पोलिस हवालदार अनिल चौधरी, पो.कॉ. मोहन पाटील, समाधान पाटील, विनोद तडवी, इसराईल खाटीक आदी करत आहेत. संशयीत आरोपी शहाबाज शहा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here