बांडुक गॅगचा म्होरक्या अटकेत – चोरीच्या तिन मोटारसायकल हस्तगत

जळगाव : पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी सध्या जोर धरुन आहे. मोटार सायकली चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणत उघडकीस आणले जात आहे. याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या संपुर्ण पथकाचे यश म्हणावे लागेल. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकामात झोकून देण्याची हातोटी आणि शिस्त गुन्हे शाखेच्या पथकाने अंगिकारली आहे.

जळगाव शहरातील तिन मोटारसायकल चोरीचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले असून बांडुक गॅंगचा म्होरक्या शुभम शिवराम मिस्त्ररी यास त्याच्या साथीदारासह तसेच चोरीच्या तिन मोटारसायकलीसह अटक करण्यात आली आहे. मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील मास्टर म्हटला जाणारा बांडुक गॅंगचा म्होरक्या शुभम शिवराम मिस्तरी व त्याचा साथीदार राहुल रविंद्र कोळी असे दोघे जण शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकली चोरी करत असल्याची गुप्त माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी स.फौ.अशोक महाजन, पो.हे.कॉ. सुधाकर अंभोरे, पो.हे.कॉ.विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अश्रफ शेख, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, वसंत लिंगायत, उमेशगिरी गोसावी आदींना रवाना केले होते.

या पथकातील सर्व सदस्यांनी आरोपीच्या शोधार्थ जळगाव शहरातील आसोदा रेल्वे गेटकडील हरीओम नगर – कला वसंत नगर परिसरात शोध सुरु केला. दरम्यान त्यांना कला वसंत नगर कडून रेल्वे गेटकडे जाणा-या रस्त्यानजीक दोन विना नंबर प्लेटच्या मोटारसायकली घेऊन जात असतांना दोघे जण नजरेस पडले. पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने अडवले. त्यांच्याकडून अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शुभम उर्फ बांडुक शिवराम मिस्त्ररी (20) रा. वाल्मीकनगर, जळगाव व राहुल रविंद्र कोळी (19) रा.मेस्को मातानगर जळगाव असल्याचे कबुल केले.

त्यांनी शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतून तिन मोटार सायकली चोरी केल्याचा गुन्हा कबुल केला. त्यांच्या ताब्यातून शनीपेठ पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या. शनिपेठ पोलीस स्टेशन भाग 5 नुसार दाखल असलेल्या गु.र.न. 97/21, 85/21 व 81/21 मधील अनुक्रमे होंडा शाईन, पॅशन प्रो आणि बजाज पल्सर या तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अधिक तपासकामी त्यांना शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here