एसटी वाहक महिलेस चालक-वाहकाकडून मारहाण

जळगाव : वाहक महिलेसोबत एकाच ठिकाणी राहणा-या एसटी चालकाने मद्याच्या नशेत एका महिला वाहकास मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पिडीत महिला वाहकाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करणा-या वाहक महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती आपल्या दोघा मुलांसह एस.टी. कॉलनीत राहते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की एस.टी. कॉलनीत राहणा-या महिलेचा 30 मे रोजी वाढदिवस होता. त्यानिमीत्त ती वाहक महिला केक घेण्यासाठी बाहेर गेली होती. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ती महिला घरी आली. त्यावेळी तिच्या दोघा मुलांनी तिला म्हटले की आम्ही जोरात धावत गेल्यामुळे आपल्या इमारतीत राहणारे चालक ललित गायकवाड यांनी आम्हाला जोरात रागावले. आपल्या मुलांना रागावल्याचा जाब विचारण्यासाठी ती महिला त्यांच्याकडे गेली.

ललित गायकवाड व त्यांच्यासोबत राहणारी वाहक महिला अशा दोघांनी मिळून उलट तिलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुला जास्त झाले आहे असे म्हणत गळ्यातील ओढणीसह तिला ओढत चापटाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. यामुळे त्या महिलेचे वस्त्र फाटले. या प्रकरणी पिडीत तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गु.र.न.988/21 भा.द.वि. 323, 504, 506, 510, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here