पोलिसांच्या माहितीवर आधारीत बातम्यांमधे कसली बदनामी? – उच्च न्यायालयाचा शिल्पाला प्रश्न

मुंबई : अश्लिल चित्रपटांची निर्मीती व वितरण केल्याप्रकरणी बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सोशल मिडीयासह विविध प्रसार माध्यमातून अवमानकारक माहिती प्रसारीत केल्यामुळे आपली बदनामी झाल्याचा शिल्पा शेट्टीचा आरोप आहे. सोशल मिडीया व प्रसार माध्यमातून आपली होणारी बदनामी थांबावी यासाठी शिल्पाने उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी शिल्पा शेट्टी हिने सोशल मिडीयासह विविध वृत्तपत्रांना प्रतिवादी केले होते.

कनिष्ठ न्यायालयाने शिल्पाचा पती राज कुंद्रा याचा जामीन फेटाळल्यानंतर तिने सदर याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्यांविरुद्ध आव्हान कसे काय दिले जाऊ शकते? असा सवाल उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला केला आहे. शिल्पा शेट्टीविरुद्ध काहीच बोलायचेच नाही असे सांगण्यासारखा हा प्रकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

शिल्पा शेट्टी ही एक सार्वजनिक जिवन जगणारी अभिनेत्री असल्यामुळे लोकांना तिच्या बातम्यांमधे रस असतो. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वृत्त प्रसारीत केल्यास ती बदनामी कशी काय होऊ शकते? असा प्रश्न शिल्पा शेट्टीचे वकील अ‍ॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना विचारण्यात आला.

उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे वकील अ‍ॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना म्हटले की तुमच्या अशीलच्या पतीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यात न्यायालय कुठलाही हस्तक्षेप करु शकत नाही. मात्र बदनामीसाठी कायदा आहे. वर्तमानपत्रांचा खप वाढण्यासाठी या प्रकरणी संबंधित वृत्त अधिकाधिक रंजक करून प्रसिद्ध केले जात असल्यामुळे प्रतिवाद्यांना आपल्याबद्दल चुकीचे, मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून रोखावे अशी मागणी शिल्पाने आपल्या याचिकेत केली होती. तसेच आपल्याबद्दलची चुकीची माहिती वेबसाईटवरुन काढण्यात यावी तसेच माफी मागण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी शिल्पाने केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here