श्रध्दा-अंधश्रद्धेच्या खेळात इंदोरीकर महाराजच टार्गेट का?

इंदोरीकर महाराज

महाराष्ट्रात सध्या ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या किर्तनात ‘ पुत्रसंभावाबाबत’ केलेल्या वक्तव्यावरून उठलेले वादळ अद्याप थांबलेले दिसत नाही. ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यास लिंगभेदाचा मुद्दा बनवताच हवा तापली.

हे महाराज हमखास ‘पुत्रप्राप्तीचा’ मार्ग सांगून समाजातील स्त्री जन्माला कमी लेखतात हा महिलांप्रती अक्षम्य अपराध असल्याचा लागलीच आरडाओरडा झाला. इतका की भूमाता बिग्रेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनीही या वादात उडी घेतली. त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली. त्यांचे वकील मिलिंद पवार यांचे तर्फे नोटीसही दिली. तमाम महिला वर्गाची माफी मागावी म्हणून महाराजांना जाहिरपणे बजावले.

मध्यंतरी परस्परांना काळे फासण्याची भाषा महाराज समर्थक विरोधकातून उमटली. परंतु या प्रकरणाने समाज पुरूष इंदोरीकर महाराज समर्थक आणि विरोधक अशा पध्दतीने वाटला गेल्याचे दिसून आले. खरे तर श्रध्दा आणि अंधश्रध्दा या दोन वर्गात आधीच समाजाची विभागणी झाली आहे.

त्यातल्या त्यात किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक गुणदोषांचा उल्लेख करत विनोदाच्या अंगाने महाराज समाज प्रबोधन करतात. ह.भ.प.इंदोरीकर महाराजांवर सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून वावरणारी मंडळी तटून पडली. त्यामुळे काही नवे प्रश्न उभे राहीले आहेत.  त्याचाही अवश्य विचार व्हायला हवा.

तसे पाहिले तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटली जायची. आता या मुद्दयावर मतभिन्नता व्यक्त होतांना दिसते. निदान चारित्र्य, सामाजिक सभ्यता, महिलांचा आदर यावर तरी मतैक्य असायला हरकत नाही. संस्कृती रक्षणाचा विचार  पुण्यापासून राज्यभर पसरला जातो असे मानणारा एक कालखंड होता.

त्याच पुण्यात’ ओशो ‘ यांचा राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय आश्रम आणि विचार गाजला. सन १९८० च्या दशकात त्याच विचारधारेवर आधारित ‘भोगसम्राट’ या नाटकाचे प्रयोग राज्यभर झाले. तथापि या नाटकाची ‘भोगवादी संहिता’ बघता संस्कृती रक्षकांनी मोर्चे काढण्याचे इशारे देवून नाटकांचे प्रयोग प्रारंभी हाणून पाडले.

नंतर काही वर्षांनी टोकाच्या विरोधाची धार बोथट झाली हा भाग वेगळा. ‘ओशो’ विचार आणि त्यांच्या तथाकथित ‘कम्युन’ ची संकल्पना त्यांच्या बरोबरच संपली. त्यापुढे राज्यात स्त्री मुक्ती चळवळीने कसा जोर धरला हेही महाराष्ट्राने पाहिले आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचारही महाराष्ट्रात रूजला आणि वाढला.

शिक्षणासह जीवनाच्या अनेक क्षेत्रात महिलांनी अनेक विक्रमही प्रस्तापित केले. तरीही समाज मनावर शेकडो वर्षापासून रूढीप्रियतेचा पगडा घट्ट बसल्याने “वंशाचा दिवा” म्हणून मुलगाच हवा असा विचार-मानसिकता आपली पाठ सोडायला तयार नाही. आजच्या काळात हा विचार कालबाहय समजायला हवा.

परंतु प्राचीन परंपरेचा पुरूषप्रधान संस्कृतीचा विचार कुणाच्या बोलण्यातून बाहेर आला तर त्याला महिला वर्गाचा संघटित विरोध होणारच. नेमके तेच इंदोरिकर महाराजांबाबत घडले आहे. परंतु असलाच विचार किंवा “पुत्रसंभव” विषयक वनस्पती-संजीवकबुटी असल्याचा मुद्दा यापूर्वी पतंजलीकार रामदेवबाबा आणि प्रसिध्द डॉ. बालाजी तांबे यांनी काही वर्षापूर्वी मांडला होता.

त्यामुळे देखील गदारोळ झाला. दोघांवर टिकेची झोड उठली. त्यावेळी रामदेवबाबांनी आपण ‘पुत्रसंजीवनबुटी’ च्या माध्यमातून केवळ पुत्र प्राप्तीचा मार्ग सांगत नसून त्या वनऔषधीचे नावच पुत्रसंजीवकबुटी असे असल्याचा खुलासा केला होता. या आणि अशाच मुद्यावर डॉ. बालाजी तांबे यांनाही टिकेचे धनी व्हावे लागले.

कायदेशीर कारवाईचे सोपस्कारही करण्यात आले. शेवटी दोघांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर प्रकरण मिटले. आता रामदेवबाबा हे केवळ योगगुरू एवढयाच मर्यादित भुमिकेत नसून हजारो कोटींच्या उद्योगसमुहाचे संचालक आहेत. ही त्यांची ताकद लक्षात घेता त्यांच्या तोंडाला काळे फासण्याची भाषा करण्याचीही हिंमत कुणी केली नव्हती.

या दोघांची बऱ्यापैकी संघटनशक्ती सांगितली जाते. या दोघांच्या तुलनेत ह.भ.प. इंदोरीकर महाराज समाज प्रबोधन क्षेत्रात अग्रमानांकित असले तरी रामदेवबाबा आणि डॉ. तांबे यांच्या संघटनशक्तीच्या तुलनेत कमकुवत वाटू शकतात.

रामदेवबाबा आणि डॉ. तांबे या दोघांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात योगदान महान समजले जाते. तरी तिघांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर प्रत्येक काळात विरोधाची आग थांबायला हवी होती. आधी त्या दोघांना सामाजिक रोषाचा मारा सहन करावा लागला. भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई या तर आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

महिला हक्कासाठी आंदोलन चालविण्याचा त्यांचा दांडगा व्यासंग आहे. त्यांची भूमिका आक्रमक असली तरी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी “विवेक जपावा” असे सांगितले जाते. अर्थात येथे कुणाला ‘विवेक’ शिकवण्याचा मुद्दा नाही. इंदोरीकरांनी म्हटल्याप्रमाणे एखादया कथीत ‘ प्रमादाबद्दल’ (असलेल्या – नसलेल्या) माणुसच संपवायचा का?” याचे उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची नाही का?

इंदोरीकर महाराजांचे सर्व काही बरोबर आहे यावर सर्वांचे एकमत नसेल. खरतर मतभिन्नता हाच तर आपल्या लोकशाहीचा गाभा आहे. या मतभिन्नतेतून श्रध्दा आणि अंधश्रध्दा असे दोन विचारप्रवाह महाराष्ट्रात दिसून येतात. महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मूलनाच्या बाबतीत चालवल्याबाबत या चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून करण्यात आला आहे.

त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने जादूटोणा अंधश्रध्दा निर्मूलन विषयक कायदाही केला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जिवनातील अनिष्ट विचारावर विनोद- व्यंगातून तीक्ष्ण प्रहार एखादा इंदोरीकर महाराजासारखा किर्तनकार करत असेल तर सामाजिक प्रबोधनाचा विचार करता असले ‘ टार्गेट’ कुणाला किती करायचे? याचे उत्तर समाज पुरूषाने दयायला हवे.

सुभाष वाघ (पत्रकार जळगाव) 8805667750

subhash-wagh

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here